‘‘आई, खरं सांग ना, कुठे जायचंय?’’ अजयने विचारलं.
‘‘कुठे म्हणजे काय? आजीकडे चिपळूणला. या वेळी इतर कुठे बाहेर फिरायला जायचं नाहीए. त्या महागडय़ा थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा कोकणातल्या उबदार घरी जरा राहून तरी बघा.’’ आई म्हणाली.
‘‘शी! बोअरिंग. आई, तू जा ना गं एकटी. मी आणि आर्चिस राहतो बाबांबरोबर इथेच..’’ अजय म्हणाला.
‘‘मुळीच नाहीऽऽ मी आणि बाबांनी हे आधीच ठरवलंय.
यावेळी व्हेकेशन प्लॅन कोकणचाच आहे!’’
‘‘पण किती उकडेल तिथे?’’ अजय म्हणाला.
‘‘ते पाहू तिथे गेल्यावर.’’ आई विषय तोडत म्हणाली. एव्हाना आईची बॅग भरून झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचच्या गाडीने आई, अजय आणि आर्चिस चिपळूणला निघाले. सकाळचं प्रसन्न वातावरण होतं. दोन्ही बाजूला गच्च झाडीने डवरलेला प्रदेश पाहत पाहत प्रवास चालला होता. दुपारी बरोबर साडेबारा वाजता गाडी वालोप्याला पोहोचली. मामा, आजोबा न्यायला आले होते. तिथून, पुढे अध्र्या तासाचा प्रवास करत मंडळी घरी पोहोचली. आजोबांचं घर थोडं उंचावर होतं. दारापर्यंतचा चढाचा रस्ता लाल चिऱ्याच्या दगडांनी बांधून काढला होता. या रस्त्याला म्हणायचं ‘पाखाडी’. पाखाडीच्या दोन्ही बाजूला बैठी घरं होती. दाराच्या अंगणात स्वाऱ्या पोहचताच मामीनं सगळ्यांवरून भाकरतुकडा ओवाळून टाकला. अंगणापलीकडे विहीर होती. विहीरसुद्धा चिऱ्याच्या दगडांनी बांधून काढलेली होती.
‘‘रखमा, पाणी दे गं शेंदून सर्वाना, हात-पाय धुवा आणि सगळेजण माजघरातच या,’ असं म्हणत मामी आजी आत वळली.
रखमाने भराभर विहिरीतून पाणी काढलं. त्या थंडगार पाण्याचा स्पर्श आर्चिसला खूप आवडला. हातपाय, तोंड स्वच्छ धुऊन सगळे माजघरात आले. माजघरात थोडा अंधार वाटत होता, पण छान गारेगारही होतं.
एवढय़ात मामीआजी कोकम सरबताचे ग्लास घेऊन आली. जिरं घातलेलं ते सरबत आर्चिसला इतकं आवडलं, की त्याने चक्क दोन ग्लास सरबत प्यायलं आणि मग एक मोठी ढेकरसुद्धा दिलीन. अजयला तर हसूच आलं त्याच्या हावरटपणाचं. नवीन वातावरणामुळे मुलं थोडी बावरल्यासारखी झाली होती. पण त्यांची कुरकुर नव्हती. सगळं कसं शांत आणि निवांत चाललं होतं. तोवर पानं घेतल्याचं सांगत सुंदरी बाहेर आली. अजय, आजोबा आणि आर्चिस अशी छोटीशीच पंगत बसली.
केळीच्या हिरव्या आगोतल्यांवर भात वाढला होता. वर पिवळंधम्मक वरण होतं. चटण्या, कोशिंबिरी आणि भाज्यांनी पान सजलं होतं. मामाआजोबांच्या पानाशेजारी गायमुखी कावळा होता. मुलांच्या पानापाशी पाण्याची फुलपात्रं होती.
‘‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे..’’ मामांनी श्लोक सुरू केला तसे आपोआपच दोन्ही मुलांनी हात जोडले. श्लोक संपताच त्यांनी गायमुखी कावळ्यातलं पाणी ताटाभोवती फिरवून चित्राहुती घातल्या. एकवार पुन्हा हात जोडले आणि जेवायला सुरुवात केली. मुलं कुतूहलाने त्यांचं निरीक्षण करत होती. पहिला भात संपत नाही तोच आजी पोळी वाढायला घेऊन आली. सोबत आमरसाच्या वाटय़ा होत्या. रेषेदार पातळ आमरस
पाहून आर्चिसने तोंड वाकडं केलं. मामीआजीच्या नजरेतून ते निसटलं नव्हतं.
‘‘खा रे बाळा, पायरीचा रस आहे म्हणून थोडा पातळ आहे. थोडय़ा रेषाही असतील, पण रायवळ आंब्यासारख्या दातात अडकायच्या नाहीत. साखरेला मागे टाकेल असाऽ गोड आहे, खाऊन तर बघ.’’ मामीआजीने वाढता वाढता त्याची समजूत काढली. आर्चिसने हळूच रसात बोटं बुडवली. भीत भीतच चव घेतली. रस खरंच गोड होता. अंगतपंगत करत मुलांची जेवणं झाली. मागचा ताकभात खाऊन आजोबांनी जेवण संपवलं आणि ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणत ते हात धुवायला उठले. मुलंही अर्थात त्यांच्यामागे होती. मागीलदारी दगडी डोणी होती. तिच्यात पाणी साठवलं होतं.. कडेला तांब्या ठेवलेला होता. हात धुतलेलं पाणी अळूच्या बेटातून वाहत होतं. अजयला पाण्याच्या वापराची ही युक्ती फार आवडली. त्याने आणि त्याच्या मित्रांनी केलेला save water project त्याला आठवला.
आर्चिसला कधीपासून आजोबांना प्रश्न विचारायचे होते. आजोबा निवांत आहेत म्हटल्यावर त्याने आजोबांचा ताबाच घेतला. आवळीच्या अंगणात आजोबा बसले होते. दोन्ही मुलं तिथे पोहोचली. आजोबा कसल्याशा पानांच्या शिरा खुडत होते.
‘‘आजोबा, काय करताय?’’ अजयने विचारलं.
‘‘नागवेलीच्या पानांच्या शिरा काढतोय.’’
‘‘आजोबा म्हणजे काय हो?’’ आर्चिसने विचारलं.
‘‘अरे, नागवेलीचं पान म्हणजे तुमचं खाण्याचं पान-विडा. विडा खाता ना तुम्ही?’’- इति आजोबा.
‘‘हा, लग्नात देतात तो ना? हो, मी खाल्लाय. मस्त लागतो.’’ आर्चिसला आठवलं.
‘‘त्याचाच विडा करतोय. ही पानं फार औषधी असतात. तुमच्या आजीने एक वेल इथे लावलीय. मी कधीमधी सहज एखादं पान खातो. तेवढीच पचनशक्ती सुधारते.’’- असं म्हणत आजोबांनी लवंग, वेलदोडा, सुकं खोबरं आणि इवला गुलकंद घालून पानाची त्रिकोणी घडी केली आणि आर्चिसला दिली.
‘‘वा आजोबा, मस्त आहे हो!’’ आर्चिस म्हणाला. आतापर्यंत त्याने इतक्या आवडीनं पान कधी खाल्लंच नव्हतं.
‘‘आजोबा, तुम्ही मघाशी जेवताना श्लोक म्हटल्यावर पानाबाहेर भात का हो काढून ठेवलात?’’ शेवटी अजयने विचारलंच.
आजोबा हसले. मुलं हा प्रश्न विचारणार हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं.
‘‘अजू, त्याला म्हणतात चित्राहुती घालणं. ही आपली एक वाडवडिलांनी घालून दिलेली रीत आहे. चित्राहुती घालणं म्हणजे पानातील अन्नाचे इवले घास छोटय़ा कीटकांना खाण्यासाठी ताटाबाहेर ठेवणं. आपल्या कोकणात जमिनी शेणाने सारवलेल्या असतात. फरशी किंवा कोबा घालण्याची पद्धत ही अलीकडची. या सारवलेल्या जमिनीवर कीटक, मुंग्या फिरतात. चुकून अन्नाच्या वासाने त्या आपल्या ताटातही येतात. तसं होऊ नये म्हणून ताटाबाहेर त्यांच्यासाठी घास ठेवतात. त्याला चित्राहुती घालणं म्हणतात. अन्नावर सगळ्यांचाच अधिकार असतो ना?’’ आजोबांनी समजावले. बरंच काही समजल्यासारखं आर्चिसने मान हलवली.
‘‘पण आजोबा, तो आंब्याचा रस पायरीचा, रायवळचा नाही, असं काहीतरी आजी म्हणत होती ते नाही समजलं.’’ आर्चिसने विचारलं. आजोबांना अपेक्षित असलेला हा दुसरा प्रश्न होता. मालूने- आपल्या भाचीने मुलांना कोकणात आणण्याची युक्ती बरोबर लागू पडतेय हे पाहून त्यांना समाधान वाटलं.
‘‘हं.. तर आंब्याचं विचारताय ना तुम्ही? त्याचं असं आहे मुलांनो, आंबे हे खरं तर वेगवेगळ्या रंगरूपाचे आणि चवीचे असतात. प्रत्येक प्रदेशातले आंबे चवीला वेगवेगळे असतात. पायरी, रायवळ, हापूस हे कोकणात आढळणारे सर्वसाधारण सगळ्यांना माहीत असणारे आंबे. पण याव्यतिरिक्तही आंब्याच्या अनेक जाती असतात. या स्थानिक जातीचे आंबेही खूपच चवीचे असतात. तुम्हा मुलांना, म्हणजेच शहरातील मुलांना माहीत असतो तो एकच आंबा- ‘हापूस आंबा’- ज्याला तुम्ही Alphanso mango म्हणता.’’
‘‘हो आजोबा. आंब्याच्या खोक्यावर पण असंच लिहिलेलं असतं.’’ आर्चिस म्हणाला.
बोलता बोलता आजोबा मुलांना मागील दाराच्या पडवीत घेऊन आले. पडवीत आंब्याच्या अढय़ा लावलेल्या होत्या. ओळीने लावलेल्या त्या हिरव्यागर्द आंब्यांकडे पाहून मुलं हरखून गेली. आजोबांनी कोपऱ्यातल्या अढीतला एक आंबा अलगद उचलला. आंबा चांगला मोठा होता. देठाकडे थोडा लाल होता. आणि गंमत म्हणजे या आंब्याच्या कैरीला चक्क टोक होतं.
‘‘हा पायरी आंबा. आणि याला ओळखायची खूण म्हणजे..’’
‘‘याचं हे टोक.’’ अजयने आजोबांचं वाक्य पुरं केलं. अजून एका अढीकडे बोट दाखवत आजोबा म्हणाले, ‘‘हा तुमचा हापूस.’’
‘‘वाव! पण आजोबा हा तर पूर्णच हिरवा आहे.’’ अजयने विचारलं.
‘‘अरे, म्हणूनच तर अढीत घातलाय ना पिकायला!’’ आजोबांनी माहिती पुरवली.
‘‘अढी म्हणजे काय हो आजोबा?’’ आर्चिसचा आता पूर्ण गोंधळ उडाला होता.
‘‘आंबा झाडावर साधारण तयार झाला, त्याच्या देठाकडचा भाग खोलगट झाला की तो झाडावरून उतरवतात आणि मग असा ओळीने गवतात मांडून पिकवतात. त्याला म्हणायचं अढी लावणं किंवा आंबा अढीत घालणं.’’ आजोबांनी उत्तर दिलं.
‘‘पण त्याचा काय उपयोग?’’ अजय म्हणाला.
‘‘उपयोग तर असतो अजू. आंबा अढीत घातल्यावर हळूहळू, पण उत्तम पिकतो.’’ आजोबांनी समजावलं.
‘‘पण मग झाडावर का नाही ठेवायचा? तिथे तर तो आणखी चांगला पिकेल.’’
आर्चिसने मनातील शंका तत्क्षणी विचारलीच.
‘‘तुझं म्हणणं बरोबर आहे बाळा. पण त्याचं असं आहे, की कोकणातलं हवामान आहे उष्ण. कधी कधी ऊन फार वाढतं. मग झाडावरच्या आंब्याला हे ऊन सहन होत नाही. तो भाजून निघतो आणि मग पिकल्यावर खराब होतो. कधी तर अवेळी पाऊस पडतो. शिवाय बरीचशी फळं पाखरं दातलतात. वानर पाडतात. मग फार नुकसान होतं.’’ आजोबांनी समजावलं.
‘‘मग यावर उत्तम उपाय म्हणजे अढी लावणं. झाडावर पक्षी, माकडं आणि कीटकांसाठी काही फळं राखून इतर फळं तोडतात, त्याला म्हणतात आंबा उतरवणं. उतरवलेल्या आंब्याच्या मग या अशा अढय़ा लावायच्या.’’ आजोबांनी आपलं म्हणणं पटवून दिलं. मुलांना नवी माहिती मिळत होती आणि गंमतही वाटत होती. आजोबा त्यांना तिसऱ्या अढीकडे घेऊन आले.. त्या अढीकडे बोट दाखवत ते म्हणाले, ‘‘हा रायवळ. याचा रस थोडा रेषेदार असतो, पण गोड असतो.’’ पुढे उभ्या जागेवरूनच हात दाखवत आजोबांनी इतर फळंही दाखवली.
‘‘तो लोणच्या आंबा. फक्त लोणच्यासाठी वापरतात. पलीकडचा शेपू. त्याचा रस किंचित गुळमट लागतो. त्यापलीकडचा साखऱ्या, म्हणजे साखरेसारखी चव असलेला.’’ आजोबा माहिती देत होते. मुलं कुतूहलाने पाहत होती. त्यांच्या मनातले प्रश्न संपले नव्हते, तर उलट वाढले होते. आजोबा दोघांना घेऊन पडवीतून ओटीवर आले. झोपाळ्यावर टेकले. मुलंही होतीच दोन बाजूला.
‘‘आजोबा, आई घरी आणते ते सगळे आंबे पिकलेलेच असतात. शिवाय आमच्या सोसायटीखालच्या दुकानात तर आंब्याच्या तयारच पेटय़ा विकायला असतात.’’ अजयने एक भलामोठा प्रश्न केला.
‘‘हे खरं आहे तुमचं!’’ आजोबांनी एक सुस्कारा सोडत म्हणाले, ‘‘ती एक समस्याच आहे बाबा. शहरात आंबा असा अढीत पिकवत नाहीतच. त्यासाठी सरसकट रसायनांचा म्हणजे केमिकलचा वापर करतात. त्यामुळे कृत्रिम उष्णता निर्माण होते आणि आंबे चटकन पिकतात. शिवाय सगळे एकसारख्या पिवळ्या रंगाचेही होतात. पण असा आंबा खाणं हे शरीराला मात्र फार अपाय करणारं असतं, बरं का!’’
‘‘पण मग अढीत का पिकवत नाहीत सगळे जण?’’ आर्चिसने अगदी भाबडेपणानं विचारलं.
‘‘याचं उत्तर फार सरळ आहे राजा. अढीत आंबा पिकायला वेळ लागतो. शिवाय तो एकदम पिकतही नाही. केमिकल लावले तर तो चटकन पिकतो आणि फळातले दोषही लपतात. किंमतही चांगली येते. मग फळ पिकवण्याचा हा सोपा मार्ग सोडून कोण बरं अढी लावील?’’ आजोबांनी मुलांना प्रश्न केला.
मुलं विचारात पडली होती. आजोबांनी दिलेल्या नवीन माहितीमुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण अजूनही काही प्रश्न त्यांच्या मनात होते.
एवढय़ात शेताला पाणी सोडल्याचं सांगत परशुराम ओटीवर आला आणि मुलांच्या चौकस प्रश्नांमधून आजोबांची सुटका झाली. मुलं परशुरामबरोबर शेताकडे पळाली.
मैत्रेयी केळकर – mythreye.kj kelkar@gmail.com

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”