|| भालचंद्र देशपांडे

आजोबांची देवपूजा आटोपली आणि त्यांनी चिनूला आवाज दिला. ‘‘चिनू! बाळ चिनू! ये बाबा आरतीची वेळ झाली आहे.’’ आरतीनंतर मिळणाऱ्या प्रसादावर असायचं चिनूचं लक्ष. आठ वर्षांचा चिनू लगेच देवघरात आला. आदल्या दिवशी आजोबा आणि चिनू जत्रेत भटकत असताना चिनूला गणपती, देवी, हनुमान, सीता, राम इत्यादी देवतांची आकर्षक चित्रे असलेल्या हलक्या पताकांचं तोरण दिसलं. ते त्याला खूप आवडलं. त्यानं ते त्याच्या आजोबांना विकत घ्यायला लावलं. आणि घरी आल्याबरोबर त्यानं ते तोरण लाकडी देव्हाऱ्याच्या दोन टोकांना बांधून टाकलं. त्या आकर्षक तोरणामुळे देव्हाऱ्याला शोभा आली होती. तबकात तेवत असलेल्या निरांजनाच्या वातीच्या प्रकाशामुळे तोरणाच्या पताकांना इंद्रधनुष्याच्या रंगासारखी विलोभनीय झळाळी प्राप्त झाली होती.

‘आपण आजोबांना तोरण विकत घ्यायला लावलं. त्यामुळे देव्हारा खरंच कित्ती कित्ती सुरेख दिसतोय!’ हा विचार चिनूच्या मनात आला.

तेवढय़ात आजोबांनी घंटी उचलली आणि आरतीचं तबक धरून ते खडय़ा आवाजात आरती म्हणू लागले. ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची..’’ चिनूदेखील आजोबांच्या स्वरात आपला स्वर मिसळत आरती म्हणू लागला. त्याचं लक्ष मात्र त्यावेळी तोरणाकडेच होतं. आणि ओह हो होऽऽ!  चिनूला चमत्कारच दिसला. आरती सुरू होण्यापूर्वी स्थिर असलेल्या तोरणाच्या पताका आरती सुरू झाल्यानंतर चक्क हलू लागल्या. चिनूनं देवाकरिता केलेल्या तोरण खरेदीमुळे देव एवढा खूश झाला की आजोबा आरतीचं तबक वरखाली हलवताना ते जेव्हा पताकांजवळ नेत होते, तेव्हा त्या पताका चक्क मागेपुढे हलत होत्या.

ते दृश्य पाहिल्यावर चिनू थक्क झाला. आणि न राहवून तो आजोबांना म्हणाला, ‘‘आजोबा! आजोबा!! ती बघा गंमत. तुम्ही जेव्हा आरतीचं तबक तोरणाच्या पताकांजवळ नेता, तेव्हा त्या आपोआप चक्क मागेपुढे हलतात. बघा, बघा, माझ्या तोरण खरेदीवर देवबाप्पादेखील किती खूश झाला आहे ते.’’ आजोबा मिस्कीलपणे हसले खरे; पण त्यावेळी ते बोलले मात्र काहीच नाही.

दुसऱ्या दिवशी आजोबांनी चिनूला त्यांच्या खोलीत बोलावलं. चिनू त्यांच्या खोलीत गेला तेव्हा आजोबांनी एक वेगळ्याच प्रकारचं खेळणं तयार केल्याचं दिसलं. आजोबांनी त्याच्या खोलीतील टेबलाच्या दोन पायांना उंचावर एक दोरा बांधला होता. दोऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी पातळ पत्र्यापासून तयार केलेला एक गोल अशा प्रकारे लटकवून ठेवला, की तो जमिनीपासून पुरेशा उंचीवर राहील. गोलाला पृष्ठभागावर तीन छिद्रे पाडली होती. त्यापैकी तळाजवळचे एक छिद्र आकाराने काहीसे मोठे होते, तर इतर दोन छिद्रं लहान आकाराची होती. ते खेळणे पाहिल्यावर चिनू उत्सुकतेने आजोबांना म्हणाला, ‘‘आजोबा! हे कसलं खेळणं आहे?’’ आजोबांनी त्याला खेळण्याची माहिती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘चिनू! आता मी तुला एक गंमत दाखवतो. प्रथम सांग बघू, हा गोल आता स्थिर आहे की नाही ते?’’

‘‘आजोबा! गोल स्थिर आहे.’’

‘‘बरोब्बर सांगितलंस. आता गंमत बघ.’’ आजोबांनी एक मेणबत्ती पेटवली आणि मेणबत्तीची ज्योत सावकाश तळाजवळच्या छिद्राजवळ नेली. त्याबरोबर तो गोल आपोआप हलू लागला. (पत्र्याऐवजी कागदाचा गोल केला असता तर तो मेणबत्तीच्या ज्योतीमुळे जळला असता.)

आपोआप हलणारा तो गोल पाहिल्यावर चिनू विस्मयचकित झाला आणि आनंदाने टाळ्या वाजवू लागला आणि म्हणाला. ‘‘आजोबा! हे कसं झालं?’’

‘‘सांगतो. चिनू! या रिकाम्या गोलात हवा आहे. मी जेव्हा मेणबत्तीची ज्योत खालच्या छिद्राजवळ नेली त्यावेळी ज्योतीच्या उष्णतेमुळे गोलामधली हवा गरम झाली. गरम हवा थंड हवेच्या तुलनेत हलकी असते. त्यामुळे ती दोऱ्याजवळ केलेल्या गोलाच्या दोन छिद्रांपैकी एका छिद्रातून बाहेर पडली. तिची जागा भरून काढण्याकरिता आजूबाजूची थंड हवा दुसऱ्या छिद्रातून गोलात घुसली. गरम हवेचं एका छिद्रातून बाहेर पडणं आणि थंड हवेचं दुसऱ्या छिद्रातून गोलात शिरणं यामुळे हवेची घुसळण झाली आणि त्यामुळे गोल हलू लागला.’’ चिनू हुशार होता. आजोबांनी हा प्रयोग का दाखवला, ते त्याच्या लक्षात आलं. तो आनंदानं टाळ्या पिटत म्हणाला, ‘‘आजोबा! तुम्ही आरती करत होता. त्यावेळी तोरणाच्या पताका का हलत होत्या ते आता माझ्या लक्षात आलं.’’

‘‘अरे व्वा ऽऽ! सांग बघू.’’

‘‘आजोबा, तुम्ही जेव्हा आरतीचं तबक तोरणाच्या पताकांजवळ नेत होता तेव्हा आरतीच्या ज्योतीच्या उष्णतेमुळे पताकांजवळची हवा गरम आणि हलकी होत असे आणि आजूबाजूची त्यामानाने थंड आणि जड हवा तिची जागा घेण्याकरिता हलक्या हवेला ढकलून देत असे. थंड-गरम हवेच्या या कृतीमुळे त्या पताका हलत होत्या.’’

‘‘बरोब्बर सांगितलंस चिनू. अरे ऽऽ! आपण ज्याला चमत्कार समजतो त्याच्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असते, हे लक्षात ठेव.’’

‘‘हो आजोबा! ’’आणि असं म्हणतच चिनू बाहेर धावला.

‘‘अरे हो ऽऽ! पण चिनू निघालास तरी कोठे?’’

‘‘आजोबा! ही गंमत मी माझ्या दोस्तांना दाखवणार आहे.’’

Story img Loader