|| अंजली कुलकर्णी-शेवडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्नेह आणि श्रीराम म्हणजे एकदम जानी दोस्त. अगदी लहान असल्यापासून पाळणाघर, बालवाडी आणि आता शाळा, बास्केटबॉल सगळीकडे दोघे बरोबरच असतात. एकाच रिक्षातून शाळेत जातात. त्यामुळे रोज घरीसुद्धा स्नेहला श्रीरामची आठवण होत असते आणि श्रीरामलाही सुट्टीच्या दिवशी स्नेहशी फोनवर बोलायचं असतं! त्यांच्या या मत्रीमुळे दोघांचे आई-बाबाही अधूनमधून एकमेकांच्या घरी जाणं-येणं किंवा एखाद्या कार्यक्रमाला, रेस्टोरंटमध्ये एकत्र जेवायला जाणं असे बेत आखत असतात.

आज गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम आणि त्याचे आई-बाबा स्नेहच्या घरी येणार होते. आज जेवायला मुलांच्या आवडीचा श्रीखंड-पुरी आणि बटाटय़ाच्या भाजीचा बेत होता. आपला आवडता मित्र घरी येणार म्हणून स्नेह नेहमीपेक्षा लवकर उठला. बघितलं तर आईने छान साडी नेसली होती. बाबाने रंगीत झब्बा-पायजमा घातला होता. आईची स्वयंपाकघरात लगबग सुरू होती आणि बाबा झेंडूच्या फुलांचं तोरण करण्याची तयारी करत होता. पटपट आवरून बाबासारखाच झब्बा-पायजमा घालून स्नेहसुद्धा त्याच्या मदतीला गेला. बाबाने दाभण म्हणजे मोठी सुई आणि चांगला जाडजूड मजबूत दोरा दुहेरी करून घेतला होता. जवळच केशरी-पिवळ्या झेंडूच्या फुलांचा ढीग ठेवला होता. झेंडूच्या बाजूला आंब्याच्या पानांची डहाळी होती. स्नेहने केशरी आणि पिवळी फुलं वेगळी करून ठेवली. आंब्याची पानं सुटी करून ठेवली. तोपर्यंत बाबाने बरोबर दाराच्या चौकटीला पुरेल एवढा दोरा सुईत ओवून तयार केला. मग स्नेहला त्याने एक केशरी फूल, एक हिरवंगार पान आणि एक पिवळं फूल अशा क्रमाने फुलं, पानं द्यायला सांगितली. एकेक करून सगळं ओवून झाल्यावर बाबाने गव्हाची ओंबी तोरणाच्या मधोमध बांधून टाकली. आता तोरण अगदी छान दिसायला लागलं. स्वयंपाकघरात बटाटे कुकरला लावत असलेल्या आईला स्नेहने उत्साहाने तोरण बघायला बोलावलं. आई बाहेर आल्यावर तिघांनी मिळून दाराला तोरण लावलं आणि दरवाजावर हळदी-कुंकवाचं स्वस्तिक काढलं.

‘‘कुकरच्या शिटय़ा होईपर्यंत आपण रांगोळी काढूया?’’ आईच्या या प्रश्नाला स्नेह नाही म्हणणं शक्यच नव्हतं! आईने काढलेल्या छानशा रांगोळीत रंग भरायला स्नेहने मदत केली. तोपर्यंत बाबाने एक लांब काठी स्वच्छ धुऊन, पुसून ठेवली. रांगोळी काढून झाल्यावर आईने त्या काठीला हळदी-कुंकू लावलं. बाबाने रेशमी वस्त्र काठीच्या वरच्या टोकाला घट्ट बांधलं. त्यावर कडुनिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधली. वरून एक लखलखीत गडू उपडा ठेवून गुढी तयार केली आणि एका मजबूत दोरीने खिडकीच्या ग्रिलमध्ये बांधली. गुढीची पूजा करायच्या आधी खिडकीच्या कट्टय़ावर आईने छोटीशी रांगोळी काढली आणि लिहिलं- ‘श्रीराम प्रसन्न’. ते बघून स्नेहपण पटकन एक खडू घेऊन आला आणि त्याने बाजूला लिहिलं ‘स्नेह प्रसन्न’! त्याने असं का लिहिलं ते आई-बाबांना कळतच नव्हतं. तेवढय़ात स्नेह फुरंगटून म्हणाला, ‘‘गुढीसमोर तू फक्त श्रीरामचंच नाव का लिहिलंस, माझं का नाही?’’ स्नेहचं बोलणं ऐकून आई-बाबा दोघेही हसत सुटले. आई-बाबा का हसतायत ते स्नेहला समजलंच नाही. तो गोंधळून त्यांच्याकडे बघत राहिला. मग आई म्हणाली, ‘‘अरे, मी श्रीराम प्रसन्न लिहिलं म्हणजे तुझ्या मित्राचं नाव नाही लिहिलं, राम बाप्पा म्हणजेच प्रभू रामाचं नाव लिहिलं. आजच्या दिवशी म्हणजे चत्र शुद्ध प्रतिपदेला रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परत आले. त्यांनी रावणाचा पराभव केला, दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला म्हणून अयोध्येतल्या लोकांनी गुढय़ा-तोरणं लावून आनंद साजरा केला. त्या आनंदाचं, विजयाचं प्रतीक म्हणून आपण सगळेजण दरवर्षी ही गुढी उभारतो. गुढीला ‘श्रीरामांची विजयपताका’ असंही म्हटलं जातं, म्हणून गुढीसमोर ‘श्रीराम प्रसन्न’ असं लिहिलं जातं.’’ आईने सांगितलेली माहिती ऐकल्यावर आपण ‘स्नेह प्रसन्न’ असं लिहून काय गंमत केली ते स्नेहच्या लक्षात आलं आणि त्याला खुद्कन हसू आलं. हे सगळं आठवून गालातल्या गालात हसतच त्याने आई-बाबांबरोबर गुढीची पूजा केली. बाबाने गुढीला नवेद्य दाखवला आणि कडुनिंबाचा प्रसाद स्नेहच्या हातावर ठेवला. नेहमीसारखा गोड प्रसाद असेल असं समजून स्नेहने तो खाल्ला, पण कडवट चव लागल्यावर त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला. बाबाने पटकन त्याच्या हातावर पेढा ठेवला आणि म्हणाला, ‘‘तोंडातला आधीचा प्रसाद संपव आणि लगेच हा पेढा खा, म्हणजे छान वाटेल. आज कडुनिंब, धने, गूळ असा वेगवेगळ्या चवींचं मिश्रण असलेला नवेद्य असतो. आरोग्य उत्तम रहावं म्हणून हे सगळं खायचं असतं. आणि आज आपल्या नवीन वर्षांचा पहिला दिवस म्हणून तोंड गोड करायला तू पेढाही खायला हरकत नाही!’’ बाबाचं म्हणणं ऐकून स्नेहने कडुनिंबाचा प्रसाद खाल्ला आणि वर पेढाही खाल्ला.

आज सकाळपासून स्नेहला फुलांचं तोरण कसं करायचं, रांगोळीत रंग कसे भरायचे, आज गुढी का उभारतात, कडुनिंबाचा प्रसाद का खातात.. अशा कितीतरी नवीन गोष्टी कळल्या होत्या. आता श्रीराम आल्यावर त्याला हे सगळं सांगायचं आणि ‘स्नेह प्रसन्न’ची गंमतही सांगायची, असं मनातल्या मनात ठरवून तो श्रीराम येण्याची आतुरतेने वाट बघायला लागला!

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids