काम काम काम! आम्ही मुंग्या सतत काम करत असतो म्हणून जरी जगप्रसिद्ध असलो, तरी आम्हालाही कंटाळा येऊ शकतो. मला तर आलाच आहे; पण आमच्या राणीसाहेबांपुढे आमचं काही चालत नाही. मी थकत चालले होते तरी सवयीप्रमाणे कामाव्यतिरिक्त इतर काही विचार करू शकत नव्हते.
परवाचीच गोष्ट. राणीसाहेबांच्या आज्ञेवरून माझी नेहमीची रांग सोडून मी अन्नाच्या शोधात एका साध्याशाच बागेत शिरले. तिथे बरेच कावळे कलकलाट करत होते. त्यांनी नुकत्याच पळवून आणलेल्या एका पापडासारख्या पदार्थावरून त्यांचं भांडण चालू होतं; आणि त्या भांडणात तो पापड एका कावळय़ाच्या तोंडातून खाली पडला. मी मुंगीच. झरझर तो पापड पटकवायला गेलेच. राणीसाहेबांना खुशीत ठेवण्यासाठी मला उत्तम संधी मिळाली होती आणि ती सोडून चालणार नव्हतं.
पापडाजवळ पोहोचले आणि मी चकितच झाले. तो पापड आम्ही स्वयंपाकघरातून चोरून नेतो तसा नव्हता. त्या पापडाला एक वायरसारखी शेपटी होती. थोडं लक्षपूर्वक पाहिल्यावर दिसलं, त्या पापडाला एक तोंड होतं, दोन दात, दोन इवलेसे कान आणि चार पायही होते. ‘‘अरे वाह! असाही पापड असतो का!’’ माझ्या मनात आलं. हा मी वारुळात नेला तर राणीसाहेब खूश होणार. पापडाच्या जरा जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की तो पापड उंदराचा होता. त्याच्या चवीच्या विचारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. त्या पापडाची बातमी बऱ्याच पक्ष्यांपर्यंत पोहोचली होती आणि सर्वच पक्ष्यांत तो मिळवायची चुरस लागली होती.
तो कावळ्याच्या तोंडातून खाली पडलेला पापड भारद्वाज उचलणार इतक्यात एका शिक्रा पक्ष्याचं लक्ष त्या पापडावर गेलं आणि त्यानं तो उचलला. त्या पापडाला डोक्याकडून खाऊ का शेपटीकडून, असा विचार करत असताना सगळय़ा कावळय़ांनी कलकलाट करून शिक्रा पक्ष्याला हकलून लावलं आणि त्या गडबडीत तो पापड त्याच्या तोंडातून पुन्हा खाली पडला. एका भारद्वाजाचंही लक्ष त्या पापडावर गेलंच. जसा भारद्वाज एकटाच होता तसाच शिक्राही एकटाच होता. आठ- दहा कावळय़ांपुढे या दोन्ही शिकारी पक्ष्यांचं काही चाललं नाही.
ही सगळी गंमत शेरू कुत्रा पाहत बसला होता. त्याने तो पापड उचलला खरा, पण त्याला काही त्याचा वास आवडला नसावा. त्यानेही तो तोंडात धरून मान इकडेतिकडे हलवून टाकून दिला आणि तो निघून गेला.
पापड मातीत पाल्यापाचोळय़ात लपला. तोपर्यंत मी रांगेतून अन्न शोधत फिरणाऱ्या आमच्या कामकरी मुंग्यांना संदेश पाठवून बोलावून घेतलं. ‘‘पटपट या. हा पापड वारुळात घेऊन जायचा आहे.’’ माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोचायचीच खोटी, ५० मुंग्या हजर झाल्या. तेवढय़ात एक लबाड कावळा तिथे पोहोचला आणि त्यानं तो पापड उचललाच; पण तो पापड कडक झाला होता, त्यामुळे त्याचा तोंडाकडचा भाग तेवढाच कावळय़ानं नेला. उरलेला भाग पुन्हा खाली पडला.
तात्काळ आमच्या सैन्यानं चार पाय आणि शेपटी असलेला पापडाचा भाग उचलला आणि आमच्या वारुळाकडे कूच केलं. काही क्षणात आम्ही तो पापड नेऊन राणीसाहेबांना अर्पण केला आणि आरोळी ठोकली- ‘‘राणीसाहेबांचा जयजयकार! मुंगी साम्राज्य आगे बढो!’’
पण आमच्या राणीसाहेब काही खूश दिसल्या नाहीत. त्यांनी लगेच विचारलेच, ‘‘याचं डोकं कुठे आहे?’’
मी पटकन म्हणाले, ‘‘कावळय़ाने डोकं आधीच नेलं होतं.’’
‘‘ठीक आहे. पुन्हा ही चूक होता कामा नये. टाका नेऊन कोठारात.’’ राणीसाहेब कडाडल्या.
सर्व कामकरी मुंग्या त्या पापडाला घेऊन कोठाराकडे रवाना झाल्या. मी मात्र राणीसाहेबांसमोर हुजऱ्यासारखी त्यांनी ‘जा’ म्हणेपर्यंत उभी राहिले.
राणीसाहेब पुन्हा कडाडल्या, ‘‘नुसती काय उभी राहिली आहेस, लाग कामाला. समोरच्या घरात झुरळं, पाली मारायचा कार्यक्रम आहे, कोठारात पापड टाकून झाला आहे तर सर्व सैन्य घेऊन त्या घरातून झुरळं आणि पाली आण. कोठारात तसूभरही जागा रिकामी राहता कामा नये. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर!’’
ताबडतोब मी आणि माझ्या सैन्यानं झपझप चालत समोरच्या घराकडे कूच केलं. थोडय़ाच वेळात घरात मरून पडलेली झुरळं गायब झाली हे तुम्हाला सांगायलाच नको. त्या घरातल्या काकू म्हणत होत्या, ‘‘खूप छान काम केलं हो त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांनी! सगळं स्वच्छ करून गेले.’’ आमचं कोठार भरलं. राणीसाहेब खूश झाल्या, पण थोडाच वेळ.
vidyadengle@gmail.com