|| डॉ. नंदा हरम
वाळवीची वसाहत (छोटय़ा टेकडीसारखी) ही ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीची परिसीमा आहे, असं म्हणायला हरकत नाही. का मी असं म्हणत्येय? अहो, या वाळवीची लांबी असते साधारण अर्धा ते दीड सेंमी एवढीच. आणि यांची वसाहत काही वेळा ६ मीटर एवढी. काही वेळा याचा व्यास ३० मीटर एवढा प्रचंड!
ही एवढीशी वाळवी एवढी मोठी वसाहत कशी उभी करते? या वाळवीमध्ये कामाची वाटणी झालेली असते. कामगार किंवा मजूर वाळवी आकाराने सगळ्यांत लहान, दृष्टिहीन, पंख नसलेल्या आणि प्रजननाच्या दृष्टीने परिपक्व नसतात. त्यांचं काम म्हणजे पिल्लांना अन्न भरवणे, त्यांना वाढवणे. अन्न-पाण्याचा साठा शोधायचा, वसाहत तयार करण्याकरिता भुयार खणायचं, वसाहतीची देखभाल करायची. रक्षक वाळवीचं काम म्हणजे शत्रूंपासून वसाहतीचं रक्षण, शत्रूवर हल्ला करायचा. प्रजननक्षम नर आणि मादी म्हणजे राजा आणि राणी यांचं काम प्रजा वाढविणे.
एक वाळवी काही वसाहत उभारत नाही. लाखो वाळव्या एकत्रितपणे हे काम करतात. एका वसाहतीत साधारण वर्षांला १५ कि. ग्रॅ. वजनाच्या वाळव्या असल्या तर त्या एक चतुर्थाश टन माती आणि अनेक टन पाणी वसाहतीकरिता हलवतात. वसाहत बांधण्याकरिता वापरले जाणारे मुख्य घटक म्हणजे वाळवींची लाळ, विष्ठा आणि माती. प्राथमिक टप्प्यात वसाहत भूमिगत असून, थोडासा भाग जमिनीच्या वर वाळू आणि माती वापरून बनलेला असतो. वसाहतीची जशी उंची वाढत जाते, त्याप्रमाणे तिची सूक्ष्म रचना व भिंतींची सच्छिद्रता बदलते. घर बांधताना आपण जशा विटा एकमेकांना जोडतो, त्याप्रमाणे वाळवी मातीचे छोटे छोटे गोळे लाळेच्या साहाय्याने एकमेकांना जोडते. वसाहत जराशीदेखील ढासळली तर ती लगेच दुरुस्त करतात. ८-९ मीटर उंचीच्या वसाहती बांधायला त्यांना पाच-पाच वर्षही लागतात.
एवढय़ा मोठय़ा वसाहतीला अन्नाचा मोठा साठा लागतो. त्यांचं मुख्य अन्न म्हणजे लाकूड. ते साठविण्याकरिता वसाहतीत अनेक कक्ष असतात. याशिवाय मुख्य भागात बुरशीची पदास केली जाते. वाळवी ही बुरशी खातात, त्यामुळे त्यांनी खाल्लेल्या लाकडातील पोषक द्रव्य त्यांना काढून घेता येतात. बुरशी वाढविण्याकरिता विशिष्ट तापमान राखावं लागतं. वसाहतीच्या विशिष्ट रचनेमुळे ते स्थिर राहतं. काय कमाल आहे नाही!
nandaharam2012@gmail.com