अलकनंदा पाध्ये
ईशानकडे राहायला आलेली आजी त्याला रोज शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग छान गोष्टीरूपात अगदी रंगवून सांगायची. त्या गोष्टी ऐकता ऐकता ईशान शिवाजी महाराजांच्या काळात पोहोचून जाई. हा हा म्हणता त्याच्या डोळय़ासमोर शिवनेरी किल्ला, प्रतापगड, सिंहगड सगळं सगळं दिसू लागे. हळूहळू शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून ईशान त्यांचा भक्त झाला म्हणायला हरकत नाही. गणेश चतुर्थीला त्यांच्याकडे गणपतीची धातूची मूर्ती मखरात बसवताना तो आजवर बघत आला होता. त्याप्रमाणे त्याने शिवजयंतीला त्याच्याकडल्या शोकेसमधली शिवाजीराजांची छोटीशी मूर्ती देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी आजीकडे सोपवली होती, तिथून तिला कधीही हलवायची नाही या अटीवर.. रोज सकाळ-संध्याकाळ त्या मूर्तीला नमस्कार करण्याचा त्याचा नियम ठरून गेला होता. आजकाल त्याला टी.व्ही.वरची कुठलीच कार्टून चॅनेल्सही आवडेनाशी झाली होती. दिवसरात्र तो सतत शिवाजी महाराजांबद्दल बोलायचा. प्रश्न विचारून सर्वाना भंडावून सोडायचा. तशातच गेल्या आठवडय़ात तो आई-बाबा आणि इतर काका-मावश्यांसह रायगड किल्ला पाहून आला. तिथं पुन्हा महाराजांच्या शौर्यकथांची उजळणी झाल्यावर तर ईशान पूर्णपणे शिवकाळातच रंगून गेला. परवाच्या वाढदिवशी केक कापून औक्षण झाल्यावर सगळय़ांना नेहमीप्रमाणे वाकून नमस्कार न करता, प्रत्येकाला कमरेत लवून मावळय़ांप्रमाणे मुजरा केल्यावर सगळे चकित होऊन पाहातच राहिले.
परवा ईशानकडे नवीन एसी बसवल्यावर त्याचा रिकामा खोका बाबाने बाल्कनीत नेऊन ठेवला. तो खोका पाहून ईशानचे डोळे चमकले. त्याच्या डोक्यात एका नाटकाची भन्नाट कल्पना आली. खोका रद्दीवाल्याकडे पोहोचायच्या आत काही तरी हालचाल करणं गरजेचं होतं. लगेचच त्याने शेजारच्या जय, मल्हार, क्रिश, स्वरा या सगळय़ांना नाटकाची कल्पना सांगितली. रविवारी सगळय़ांनी नाटकासाठी त्याच्या घरी जमायचं ठरलं. तसंही ईशानला खूप लहान असल्यापासून एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून सांगायला, दुसऱ्यांसारखं हुबेहूब बोलायला छान जमायचं. शाळेच्या स्पर्धेतही त्याने एक-दोन वेळा झकास कार्यक्रम केला होता.
ठरल्याप्रमाणे रविवारी सगळी मित्रमंडळी शिवाजी महाराजांवर नाटक करायला ईशानकडे जमा झाली. नाटकासाठीचं लेखन, संवाद आणि इतर जबाबदारी अर्थातच ईशानकडे होती. ईशानने तो मोठा खोका सर्वासमोर ठेवून आपली नाटकाची कल्पना मांडली. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्राला कैदेत ठेवलं, पण महाराजांनी युक्ती करून पेटाऱ्यात बसून स्वत:ची सुटका कशी करून घेतली ही त्याने मित्रांना आजवर अनेकदा सांगितलेली गोष्ट पुन्हा एकदा सांगितली.
‘‘हा साधा खोका नाही तर हा मोठा पेटारा आहे आणि यात बसून महाराज स्वत:ची आग्य्राहून सुटका करणार.’’ खोक्याकडे बोट दाखवत ईशानने सगळय़ांना नाटकाची कल्पना दिली. एकेकाला त्यांची कामं सांगू लागला. स्वराला महाराजांच्या जागी पांघरूण घेऊन झोपलेल्या मदारी मेहेतरची भूमिका करायला सांगितलं. जय आणि मल्हार थोडे उंच असल्यामुळे ते पेटाऱ्यात बसलेल्या महाराजांना उचलणार होते. क्रिश आणि आर्यन दोघे पहारेकरी होऊन बैठकीच्या खोलीत इकडे तिकडे फिरणार असं ठरलं.. आणि सर्वात मुख्य आणि महत्त्वाची भूमिका ईशानशिवाय कोण करणार? ईशानने प्रत्येकासाठी २-२ वाक्यांचे झटपट संवाद रचून दिले. बाल्कनीत चटई पसरून महाराजांच्या अंथरूण-पांघरूणाची सोय झाली. आता फक्त पेटाऱ्याची तयारी बाकी राहिली. त्याने कपाटातून नाडय़ांची दोन बंडल्स आधीपासूनच आणून ठेवली होती. सगळय़ांनी मिळून खोक्याला खालपासून नाडीचे वेढे घालून व्यवस्थित बांधाबांध केली. खोक्याच्या वरच्या बाजूला कपडे वाळत घालण्याची काठी त्या नाडय़ांमध्ये घालून जय आणि मल्हारने आपल्या खांद्यावर तो खोका उचलून बघितला.
‘‘ए ईशान, बघ ना.. मी या खोक्यात नीट बसू शकतो तुझ्यापेक्षा.. मी शिवाजी महाराज होऊ का?’’ क्रिशने विचारलं. त्याबरोबर ‘‘नाही.. अजिबात नाही. महाराज फक्त मीच होणार. ते काही तुझ्यासारखे बारकुडे नव्हते काही. ते खूप ताकदवान होते, शक्तिमान होते. म्हणूनच ते शत्रूला नेहमी हरवून टाकायचे. तू आधी त्यांच्या मावळय़ांसारखी खूप मेहनत कर. तानाजी, बाजीप्रभूंसारखा खूप व्यायाम कर. शक्तिमान हो.. मग नंतर पुढच्या वेळी बघू. आता तू राजांच्या तुरुंगाबाहेरचा पहारेकरी होऊन आर्यनबरोबर इकडून तिकडे फेऱ्या घालायचे काम कर.’’ ईशानचा हुकूम मोडणे कुणालाच शक्य नव्हते.
खरं तर क्रिशची सूचना थोडी योग्यच होती. कारण खोक्यामध्ये ईशान जेमतेमच बसू शकत होता. पण ईशानची आज्ञा त्यांच्या मावळे मित्रांसाठी अखेरचा शब्द असायची. ईशानने खोक्याकडे बघून सर्वत्र ठीकठाक असल्याची नीट खात्री करून घेतली आणि मग त्यांच्या नाटय़प्रवेशाला सुरुवात झाली. बरेचसे संवाद ईशानच्याच तोंडी होते. जय, मल्हार आणि स्वरा मधूनच एक-दोन वाक्यं बोलत किंवा ‘जी महाराज..’, ‘जशी आज्ञा महाराज’ वगैरे म्हणून वारंवार मुजरा करायचे. अखेर मावळय़ांना सर्व सूचना देऊन आजारपणाचे नाटक करणारे ईशान महाराज पेटाऱ्यात बसण्यासाठी उठल्याबरोबर स्वराने पटकन त्यांच्या चटईवर झोपून अंगावर पांघरूण ओढून घेतले. ईशानला पेटाऱ्यात सहजपणे बसणं थोडं कठीणच होतं. म्हणून जय, मल्हार या मावळय़ांच्या मदतीला मुघलांचे पहारेकरी म्हणजेच आर्यन आणि क्रिश यांनीसुद्धा महाराजांना पेटाऱ्यात बसण्यासाठी मदत केली.
‘‘ए.. लवकर लवकर आटपा ना.. मला इथं पांघरुणात खूप उकडतंय, गरम होतंय.’’ मदारी मेहतर म्हणजे स्वराने तक्रार केली. त्यावर ‘‘एवढय़ाने काय होतंय? तुला अजून खूप संकटांना तोंड द्यायचंय.. महाराजांचे सेवक होणं म्हणजे सोप्पी गोष्ट नसते हे आता समजेल तुला.’’ ईशानने तिला पेटाऱ्यातून दटावलं. त्यावर बिचाऱ्या स्वराने पुन्हा डोक्यावरून पांघरूण ओढून घेतलं. पण फटीतून मात्र सर्व बघत होती. पेटाऱ्याचा बंदोबस्त झाल्याबरोबर आर्यन आणि क्रिश म्हणजे मुघलांचे पहारेकरी पुन्हा पहारा द्यायला खोलीभर फिरू लागले. जय, मल्हारने पेटाऱ्याकडे बघून पुन्हा एकवार आतल्या ईशान महाराजांना मुजरा केला आणि दोघांनी दोन्ही बाजूंनी एकाच वेळी पेटाऱ्याची दांडी आपापल्या खांद्यावर उचलली. त्याबरोबर ‘‘आई गं.. ओय ओयोय..’’ असे ईशानचे ओरडणे ऐकता क्षणी घाबरलेल्या जय, मल्हारने पटकन पेटारा जमिनीवर ठेवला. क्रिश, आर्यन पहारेकरी दचकून उभे राहिले. स्वरा पांघरूण फेकून उठून बसली आणि आतल्या खोलीतून आजीसुद्धा बाहेर धावत आली. घडलं असं होतं की, खोका उचलताक्षणी गुटगुटीत ईशानच्या वजनाने खालून फाटला आणि ईशान दाणकन् जमिनीवर आदळला. अर्थात त्यांच्या मावळय़ांची उंची फार नसल्याने प्रकरण फारसं गंभीर नव्हतं. परंतु अचानक ओढवलेल्या प्रसंगाने थोडीफार गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नक्की. तरीही दुसऱ्या क्षणी ईशान महाराज भानावर येऊन पॅंट झटकून उभे राहिले आणि भांबावलेल्या मित्रांना नव्हे, मावळय़ांना हात उंचावत म्हणाले, ‘‘मावळय़ांनो, डरना नही. अरे.. कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती. चलो रायगड.’’ ईशान राजांची ती आवेशपूर्ण घोषणा ऐकल्याबरोबर एवढा वेळ काहीशा भेदरलेल्या मावळय़ांनी ‘‘शिवाजी महाराज की जय.. हर हर महादेव’’ घोषणांनी ईशानचं घर दुमदुमून टाकलं.
alaknanda263 @yahoo.com