राजश्री राजवाडे काळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार..’’

‘‘नाही नाही, चुकीचं आहे. अरे ऐका, चारो मिलके साथ उडे तो कर दे चमत्कार, अस्सं हवं नाही का? आपण उडणार आहोत, आपण थोडीच चालणार आहोत.’’ निळय़ा पतंगाची चूक सुधारत लाल पतंग म्हणाला. मग सगळे एका सुरात लाल पतंगानं सुधारलेलं गाणं म्हणू लागले. पिवळा, निळा, लाल, केशरी असे चार पतंग आकाशात उडायची वाट पाहात होते. आता प्रतीक्षा संपली होती. संक्रांतीचा दिवस उजाडला आणि राजस आणि त्याची गँग पतंग आणायला दुकानात गेली. छान छान रंगांचे आणि डिझाइन्सचे भरपूर पतंग दुकानांमध्ये आले होते. त्यातले राजसने हे चार आणले. आज बाबा लवकर येणार होते ऑफिसमधून.

राजसचे मित्र, त्यांचे बाबा, दरवर्षी गच्चीवर पतंग उडवायला जायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. खरं तर पतंग बाबा लोकच उडवायचे आणि ही चिल्ली पिल्ली चक्री पकडायची. राजसची पतंगाची गडबड, तर छोटय़ा पूर्वाला कधी एकदा संध्याकाळ होईल आणि नवीन काळा फ्रॉक घालेन असं झालं होतं. मस्तपैकी गुळपोळीचं जेवण झाल्यावर एकीकडे आईचं तिळगुळाचे लाडू बनवणं चालू होतं. संध्याकाळी सोसायटीमध्ये राजस आणि छोटी पूर्वा, गँगबरोबर दरवर्षीप्रमाणे तिळगूळ वाटायला जाणार होते ना! तर असं मस्त तिळगूळमय आणि पतंगमय संक्रांतीचं वातावरण घरात होतं. दुकानातल्या पतंगांनाही हे घरातलं वातावरण फार फार आवडलं. त्यांच्या गप्पा सुरू होत्याच.

‘‘ किती मज्जा येतेय ना.’’ लाल पतंग म्हणाला.

‘‘अरे हे तर काहीच नाही, आगे आगे देखो होता है क्या.’’ निळा म्हणाला.

‘‘ए आपण आकाशात उडू तेव्हा आपल्याला दुकानातले इतर पतंगही भेटतील.’’ पिवळा म्हणाला.

‘‘हो, पण आपली आणि त्याची कॉम्पिटीशन असेल.’’ केशरी वाईट वाटून म्हणाला.

‘‘अरे वेडय़ा, काटाकाटी म्हणतात त्याला शुद्ध मराठीत, समजलं?’’ निळय़ानं केशरीला टोकलं.

‘‘मग कुणीतरी हरणार.’’ लाल वाईट वाटून म्हणाला.

‘‘अरे खेळात हार-जीत तर असतेच.’’ पिवळा त्याला समजवू लागला. तरी लाल आपला उदास होऊन बोलतच राहिला. ‘‘मग कुणीतरी फाटेल, झाडात अडकेल..’’

‘‘त्याला काही इलाज नाही. अरे, उंच उडायचं तर नंतरचे परिणामही सहन करायलाच हवेत.’’ निळा समजवत होता.

‘‘आणि आपण उंच उडालोच नाही तर काय अर्थ आहे आपल्याला, आपण पतंग उडायलाच तर बनलो आहोत.’’ केशरीही म्हणाला.

‘‘आले आले, बाबा आले, चला उडायला. हो जाओ तय्यार!’’ पिवळा ओरडला.

शेवटी सगळी मुलं, बाबा लोक गच्चीवर जमले. पतंग, चक्री, मांजा सगळी जय्यत तयारी होती. पतंगाला कन बांधायचा कार्यक्रम चालू होता आणि.. नेमका लाल पतंग फाटला. आकाशात उडायच्या आधीच फाटला. बाकीचे पतंग फिसफिसत आपसात हसले.

‘‘हे काय स्पर्धेत भाग घ्यायच्या आधीच हरलास?’’

‘‘अरेरे बिच्चारा, वाया गेलं त्याचं आयुष्य.’’

‘‘वाया कसलं गेलं, संपलं, संपलं त्याचं आयुष्य, उपयोग संपला त्याचा.’’

‘‘आम्ही बघ कसे स्ट्राँग आहोत, आम्ही जातो आता उडायला.’’ इतर सगळे पतंग कुजबुजत होते. लाल पतंग दु:खी झाला होता. आपण ज्यासाठी बनलो तेच नाही करू शकणार आता, या विचारानं केविलवाणा एका बाजूला पडून होता. इतक्यात त्याला छोटय़ा पूर्वाचे शब्द ऐकू आले,

‘‘बाबा, मी हा लाल पतंग घेऊ?’’,

‘‘घे बाळा, तो लाल पतंग तुझा हां.’’ बाकीचे पतंग पुन्हा कुजुबुजु लागले- ‘‘अरे बापरे, ही इतकी छोटी मुलगी या लाल पतंगाचे अजून हाल करणार.’’ लालला तर अक्षरश: गायब होऊन जावं असं वाटू लागलं.

‘‘बाबा, याला दोरा बांधून द्या ना.’’ छोटी पूर्वा हट्ट करत होती. मग बाबांनी त्याला छोटा मांजा बांधला आणि तो पूर्वाला दिला. तिला खूप आनंद झाला. छोटी पूर्वा मांजाचं एक टोक हातात धरून जोरानं धावू लागली, तिच्या मागे तो लाल पतंग थोडा हवेत उडत होता. पिवळा, निळा, केशरी हळूहळू उंच भरारी घेत होते आणि इकडे पूर्वा ‘‘बाबा, माझा पतंग बघा किती उंच उडतोय, माझा पतंग! माझा पतंग, दादा बघ मी पतंग उडवते..’’ म्हणत आनंदानं ओरडत होती.

लाल पतंगालाही हळूहळू मजा येऊ लागली. छोटय़ा पूर्वाच्या चिमुकल्या हातांमध्ये राहून एक वेगळाच आनंद मिळत होता आणि शिवाय आपण पूर्वाला मिळालो याचा तिला झालेला आनंद तर अजून निराळाच होता. छोटय़ा पूर्वाला किती आनंद मिळतोय आपल्या सोबत. आपण जितकं उडत आहोत त्यातच ती खूप खूश आहे या विचारानं त्यानं वर पाहिलं. वर काटाकाटी सुरू होत होती, आता इतर पतंगही फाटणार होते, खाली पडणार होते. बाबा आणि राजसच्या चेहऱ्यावरही पतंग उंच गेल्यानं तोच आनंद होता जो छोटय़ा पूर्वाच्या चेहऱ्यावर होता. हे पाहून लाल पतंगाला जाणवलं की, आपला जन्म वाया गेला नाहीये. आपणही कोणाला तरी आनंद दिलाय आणि हे जाणवल्यावर आकाशात न उडता आल्याचं त्याचं दु:ख केव्हाच नाहीसं झालं होतं.

shriyakale1@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids kite story on makar sankranti happiness should be given and taken dvr