काही वर्षांपूर्वी फिनलंडमध्ये आर्टिक सर्कल जवळ सांताक्लॉजचं गाव वसवण्यात आलं. त्या गावात सांताक्लॉजचं ऑफिस आणि घर आहे. त्या घरात सांताक्लॉज, त्याची बायको व त्यांचा मुलगा जेरी ऊर्फ छोटा सांता राहत. नाताळ जवळ आला की या गावात सगळे जण नाताळच्या तयारीला लागतात. पण यंदा सांताक्लॉज मात्र खूप आजारी पडला. त्यामुळे या वर्षीच्या नाताळची सर्व जबाबदारी छोट्या सांतावर येऊन पडली. आईच्या सांगण्यावरून तो सगळी कामं करायला तयार झाला; पण तो लाल कपडे न घालता हिरवे किंवा निळे कपडे घालायचा हट्ट करू लागला. त्याच्या आईनं त्याला समजावलं की, ‘‘लाल कपडे हीच तुझी ओळख आहे तर तुला दुसऱ्या रंगाचे कपडे घालून कसं चालेल?’’ छोट्या सांताला काही तिचं म्हणणं पटलं नाही आणि तो चिडून रुसून बसला. रुसलेल्या सांताला खूश करण्यासाठी त्याच्या आईनं चेरी आणि बदामाचा केक करायला घेतला. केक भट्टीत भाजायला ठेवल्यावर सगळ्या घरभर मस्त सुवास दरवळला. त्या वासावरून छोटा सांता स्वयंपाकघरात येईल असं तिला वाटलं, पण बराच वेळ झाला तरी तो काही आत येईना. तिनं त्याला घरभर शोधलं, पण तो तिला घरात कुठेच दिसला नाही. ती खेळण्याच्या कारखान्यात, बाजारात, त्याच्या मित्रांकडे जाऊन आली, पण तिथेही तो तिला सापडला नाही. मग मात्र तिला काळजी वाटायला लागली. ती रूडाल्फकडे जाऊन त्याला म्हणाली, ‘‘रूडाल्फ, छोटा सांता मला सापडत नाहीए रे, त्याला शोधतोस का?’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रूडाल्फ म्हणाला, ‘‘मी आत्ता पळतपळत जातो आणि त्याला शोधून घेऊन येतो.’’ रूडाल्फ गोठलेल्या तळ्याकाठी, जंगलात, बाजारात अशा सगळ्या ठिकाणी त्याला शोधून आला, पण त्याला छोटा सांता काही सापडला नाही. तेवढ्यात त्याला एका उंच पाइनच्या झाडाखाली कोणी तरी बसलेलं दिसलं. रूडाल्फ उड्या मारत तिथे गेला. जवळ जाऊन बघतो तर छोटा सांता अगदी उदास चेहरा करून बसला होता. रूडाल्फनं त्याला विचारलं, ‘‘तू असा एकटा का बसला आहेस? कोणावर नाराज आहेस का?’’

छोटा सांता म्हणाला, ‘‘मी माझ्या लाल कपड्यांवर नाराज आहे. गेली अनेक वर्ष दर नाताळला मी लाल कोट आणि लाल टोपी घालून बाबांबरोबर जातो; पण या नाताळात मी एकटा जाणार आहे आणि त्या वेळी मला दुसऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. लाल कपडे घालून मी अगदी कंटाळलो आहे.’’
रूडाल्फ हसून म्हणाला, ‘‘अरे छोट्या सांता, तुझा चकाकणारा लाल ड्रेस अतिशय सुंदर आणि खास असाच आहे. तसा ड्रेस फक्त तुझ्याकडेच आहे आणि तो तुला खूप शोभून दिसतो.’’

रूडाल्फनं सांगूनही छोटा सांता काही ऐकायला तयार नव्हता. ‘‘या नाताळला मला हिरवे किंवा निळे कपडे घालायचे आहेत. ते नाही मिळाले तर मी काहीही काम करणार नाही आणि मुलांना भेटवस्तू द्यायलाही जाणार नाही.’’ हे ऐकल्यावर रूडाल्फ म्हणाला, ‘‘बरं चल घरी, मी तुझ्या आईला तुझ्यासाठी हिरवा ड्रेस आणायला सांगतो.’’ रूडाल्फच्या या बोलण्यावर छोट्या सांताची कळी लगेचच खुलली. ते दोघं घरी आले. छोट्या सांताला पाहून आईलाही आनंद झाला. ती म्हणाली, ‘‘अरे, तुला हवा तर मी हिरवा ड्रेस घेऊन देते. त्यासाठी चिडून इतक्या दूर जाऊन बसण्याची गरज नव्हती.’’
दुसऱ्या दिवशी छोट्या सांतानं आईनं आणलेला हिरवा ड्रेस घातला. आपलं नवं रूप बघून तो अगदी खूश झाला आणि हिंडायला बाहेर पडला.

वाटेत त्याला कोणीच हॅलो केलं नाही. बाजारात गेला, पण तिथंही त्याला कोणी ओळखलं नाही. हीच गोष्ट खेळण्याच्या कारखान्यात आणि तळ्याकाठी घडली. त्याच्याकडे कोणी वळूनसुद्धा बघत नव्हतं. एरवी त्याला बघून लोक ‘‘सांता आला, सांता आला’’ असं ओरडायचे. त्याच्याशी हस्तांदोलन करायचे, त्याच्याशी बोलायचे, पण त्या दिवशी तसं काहीच घडलं नाही. घरी परतल्यावर त्यानं आईला हा सगळा प्रकार सांगितला. आईनं त्याला खूश करण्यासाठी चेरी आणि बदामाचा केक दिला. म्हणाली, ‘‘बाळा, मी तुला सांगितलं ना की लाल कपडे आणि लाल टोपी हीच तुझी खरी ओळख आहे. ती ओळख बदलायचा प्रयत्न करू नकोस. सांता म्हणजे लाल कपडे हे सर्वाच्या मनात वर्षांनुवर्ष पक्कं बसलं आहे आणि ते बदलणं आता फार अवघड आहे.

नाताळच्या वेळी तर लहान मुलं तुझ्यासारखी लाल टोपी आणि लाल कोट घालतात. त्यांना हिरव्या कपड्यातला सांता कसा आवडेल? छोट्या सांताला आईचं म्हणणं मनोमन पटलं आणि हिरवे कपडे घालण्याचा आपला हट्ट किती चुकीचा होता हे त्याच्या लक्षात आलं. नाताळच्या आदल्या दिवशी रूडाल्फ आणि त्याचे मित्र भेटवस्तूंनी भरलेली घसरगाडी घेऊन सांताच्या घरी आले. सांता आपला नवीन लाल ड्रेस घालून तयारच होता. आई-बाबांना नाताळच्या शुभेच्छा देऊन तो घसरगाडीतून मुलांना भेटवस्तू देण्यासाठी निघाला. आईने रूडाल्फकडे बघून डोळे मिचकावले व सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

mrinaltul@hotmail.com