दरवर्षी १५ ऑगस्टला मल्हारच्या सोसायटीत झेंडावंदनानंतर कार्यक्रम केले जात. यावर्षी मल्हार आणि त्याचे मित्र एक छोटे नाटुकले करणार होते, त्याच्या प्रॅक्टिससाठी रविवारी दुपारी सगळी मुले मल्हारच्या घरी जमली होती. प्रॅक्टिस झाल्यावर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. तेव्हा मल्हार पटकन म्हाणाला, ‘‘ए, आपण आई-बाबांना यावर्षी नवीन आयडिया देऊ या का?’’
‘‘कोणती रे?’’- जय.
‘‘आपल्या सोसायटीत गुढीपाडव्याला सगळेजण कसे प्रत्येक घरी गुढी लावतात ना.. तसेच तळमजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत सगळ्यांनी १५ ऑगस्टला आपल्या घरापुढे तिरंगा झेंडा लावला तर.. सगळीकडे सेम सेम झेंडे फडकताना मस्त दिसतील ना!’’ मल्हारच्या आवाजात उत्साह होता.
मल्हारचे आजोबा बाल्कनीत पुस्तक वाचत बसले होते, पण त्यांचे एकीकडे मुलांच्या बोलण्याकडे लक्ष होतेच. ते पटकन पुस्तक बंद करून म्हणाले, ‘‘अरे मल्हार, तुझी आयडिया छान आहे, पण..’’
‘‘पण काय आजोबा?’’- मल्हार.
‘‘तुमची प्रॅक्टिस संपली असेल तर बसा इथे. आपल्या तिरंगा झेंडय़ाबद्दल थोडी माहिती देतो,म्हणजे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
‘‘आजोबांकडे कुठल्याही विषयाच्या माहितीचा मोठ्ठा खजिना होता. मल्हारच्या कुठल्याही शंकेचे त्यांच्याकडे उत्तर असायचेच. सगळी मुले त्यांच्याभोवती बसली.
‘‘अरे बाळांनो, १५ ऑगस्टला तुम्ही झेंडावंदन करणार ना, त्या झेंडय़ाला खूप मोठा इतिहास आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला हे तुम्हाला माहिती आहेच. पण इंग्रज भारतात येण्यापूर्वी आजच्यासारखा भारत काही एक संपूर्ण देश नव्हता. तेव्हा इथे अनेक छोटी-छोटी राज्ये होती. त्या प्रत्येक राज्याचा स्वतंत्र झेंडा असायचा. म्हणजेच पूर्ण भारतात तेव्हा असंख्य झेंडे होते. इंग्रज लोक प्रथम इथे व्यापारासाठी आले. पण हळूहळू त्यांनी इथल्या राजांच्या आपसातल्या भांडणांचा फायदा घेतला. कधी त्यांच्याशी लढून, कधी आपसात भांडणे लावून तर कधी कपटाने इथल्या बहुसंख्य राज्यांवर त्यांनी विजय मिळवत अखेरीस ते स्वत:च इथले राज्यकर्ते बनले. संपूर्ण देशच त्यांच्या गुलामीत अडकला. परंतु ज्यांना ही गुलामी मान्य नव्हती त्या राजांनी, त्यांच्या सैनिकांनी १८५७ साली इंग्रजांविरुद्ध उठाव केला. परंतु दुर्दैवाने त्यात आपण अपयशी ठरलो. आणि मग इंग्रज भारताचे पूर्णत: सत्ताधीश बनले. मग भारतावरचे आपले वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांनी स्टार ऑफ इंडिया नावाचा झेंडा तयार केला. ज्यावर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात इंग्लंडचा झेंडाही दिसत असे. जरी इंग्रजांची भारतावर सत्ता चालू झाली तरीही अनेक राज्यांतील भारतीय मनातून अस्वस्थ होते. त्यांच्या मनात एकसंध आणि स्वतंत्र भारताची कल्पना मूळ धरत होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकजुटीने सर्वाचे प्रयत्न सुरू होते. ही एकजूट मोडण्यासाठी इंग्रजांनी १९०५ मध्ये मुद्दामच बंगाल प्रांताची विभागणी करायचे ठरवले. अर्थातच सर्व भारतीयांनी त्याला कडाडून विरोध केला. सर्वानी आपली जात, पंथ, धर्म विसरून एकजुटीने स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला, तेव्हा त्या लढय़ासाठी एकजुटीचे प्रतीक म्हणून भारतीयांचा स्वत:चा झेंडा तयार करायचे ठरवले. त्यानुसार, प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे वेगवेगळ्या रंगसंगतीचे सूर्य, चंद्रकोर, कमळ आणि वंदेमातरम् लिहिलेले झेंडे तयार केले गेले. मॅडम कामांनी बनवलेला झेंडा तर त्यांनी स्वत: पार जर्मनीतच फडकावला. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांनीसुद्धा एक झेंडा बनवला त्यात एका कोपऱ्यात इंग्रजांचा झेंडाही दिसत असे. काही वर्षांनंतर भारतातील अनेक जाती, धर्म, पंथांची ज्यात एकजूट दिसेल असा झेंडा असावा असे गांधीजींनी सुचवले. त्या सुचनेनुसार पिंगली वेंकय्या नावाच्या कल्पक स्वातंत्र्यसैनिकाने १९३१ साली भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा तयार केला, ज्यावर मधोमध चरख्याचे चित्र होते. हा झेंडा तेव्हाच्या कॉंग्रेस कमिटीमध्ये सर्वानुमते नक्की झाला. आपला स्वातंत्र्यलढा दिवसेंदिवस जोर धरू लागला आणि अनेक देशभक्तांच्या, क्रांतिकारकांच्या त्यागाचे फळ म्हणून आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झाले.
स्वातंत्र्यदिनापूर्वी स्वतंत्र देशाच्या अस्मितेचे प्रतीक असणारा भारताचा झेंडा पुन्हा नव्याने नक्की करायचे ठरले. त्यानुसार डॉ. राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या समितीने पूर्वीच्याच तिरंग्याचे रंग व रचना मान्य केली. फक्त चरख्याऐवजी निळ्या २४ आऱ्यांचे धर्मचक्र मध्यभागी ठेवण्याचे निश्चित केले.’’
‘‘आपल्या झेंडय़ातील रंग आणि चक्र कशाचे प्रतीक आहेत कुणाला सांगता येईल का?’’ आजोबांनी मुलांना विचारले.
‘‘नाही आजोबा. आम्ही अशी माहिती पहिल्यांदाच ऐकतोय. तुम्हीच सांगा ना!’’ -जय.
‘‘सर्वात वरचा भगवा रंग धैर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. मधला पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. आणि तळातला हिरवा रंग आपल्या सुपीक भूमीशी नाते सांगणारा भरभराटीचा, समृद्धीचे प्रतीक आहे. मधले निळे चक्र हे देशाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. असा हा विचारपूर्वक बनवलेला आपला तिरंगा २२ जुलै १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा अधिकृत ध्वज म्हणून निश्चित केला गेला.
मल्हारला आयडिया सुचली की गुढीप्रमाणे प्रत्येक घराने तिरंगा लावावा. पण झेंडा हा प्रत्येक देशाचा मानबिंदू असतो. त्याच्या रक्षणासाठी, त्याची शान टिकवण्यासाठी अनेकांनी बलिदान केलेले आहे. त्यामुळे आपल्या झेंडय़ासंबंधी काही ठाम नियम आहेत आणि प्रत्येक नागरिकाने ते पाळलेच पाहिजेत असा दंडक आहे. आपला तिरंगा झेंडा हा फक्त सुती खादी किंवा खादी सिल्कच्याच कापडाचा बनवलेला असला पाहिजे. कर्नाटक राज्यातील खादी ग्रामोद्योग संघाकडे हे काम सोपवलेले आहे. या आयताच्या आकाराच्या झेंडय़ाची लांबी- रूंदी ३*२ या प्रमाणातच असायला हवी. झेंडय़ाचा वापर कपडे बनवण्यासाठी किंवा गुंडाळण्यासाठी किंवा काही झाकण्यासाठी होता कामा नये. झेंडा अलिकडेपर्यंत फक्त सरकारी इमारती, कार्यालयांवर लावला जाई. परंतु काही नियम घालून खाजगी ऑफिसेसवर लावता येतो. आपल्या फडकणाऱ्या झेंडय़ाच्या उंचीपेक्षा इतर कुठल्याही झेंडय़ाची उंची अधिक नसावी. आपल्या राष्ट्रीय सणांना आपण सगळीकडे झेंडा उभारून झेंडावंदन करतो तेव्हा भगवा रंग वरतीच असला पाहिजे, तसेच तो सूर्यास्ताच्या आत उतरवला गेला पाहिजे. झेंडय़ाचा स्पर्श कधीही जमिनीला होता कामा नये. थोडक्यात काय, आपल्या तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी असे अनेक नियम आपल्याला पाळायचे असतात. म्हणूनच फक्त १५ ऑगस्टपुरते झेंडा उंचा रहे हमारा म्हणत दुसऱ्या दिवशी आणि एरवीही त्याला इथे तिथे टाकायचे नाही आणि कुणाला तसे करू द्यायचे नाही.’’ आजोबांच्या सुरात मुलांनीही सूर मिसळला.
अलकनंदा पाध्ये  – alaknanda263@yahoo.com