-प्रा. मीरा कुलकर्णी

शाळेचे दप्तर, वॉटर बॅग सांभाळत नवा युनिफॉर्म, बूट अशा पोशाखाचा नवेपणा मिरवत शाळेत येणाऱ्या मुलांनी शाळेचा परिसर गजबजून गेला होता. मोठ्या सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटतानाचा होणारा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर होताच, पण नवा वर्ग, नवी इयत्ता, नवीन पुस्तकं, नवे शिक्षक या सगळ्या करकरीत नवेपणाला मिरवत मुलांची स्वारी वर्गामध्ये घोळक्या घोळक्यांनी पोहोचली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रार्थना संपून तास सुरू झाला. सानेकर बाई वर्गात आल्या तशी मुलांच्यात आपापसात कुजबुज सुरू झाली. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण बाई सांस्कृतिक विभागाचे काम बघत असल्यामुळे मुलांच्या परिचयाच्या आणि आवडीच्या होत्या.

हेही वाचा…बालमैफल : जाणीव

‘‘अगं राहीऽऽऽ खूप उंच झालीस तू…’’ बाईंचं लक्ष गेलं तसं त्या सहज म्हणाल्या.
तसे लगेच उत्साहाने राही म्हणाली, ‘‘हो बाई, सुट्टीत मी बॅडमिंटनच्या क्लासला जात होते ना आजीकडे गेल्यावर… आणि अधूनमधून टँकमध्ये पोहायलाही जात होते. मस्त प्रॅक्टिस झाली माझी.’’
‘‘अरे व्वा! छान फायदा झाला की. तुझी उंची वाढली. ही कमाईच आहे सुट्टीची.’’
बाई बोलत असतानाच श्रीश लगेच म्हणाला, ‘‘अहो बाई, आम्ही तर खरोखरचे पैसे कमावले सुट्टीत.’’
‘‘हो का? अरे ते कसं काय?’’ बाईंनी विचारलं.

‘‘बाई, आम्ही सोसायटीच्या मुलांनी एकत्र येऊन सोसायटीच्या गेटवर सरबतांचा स्टॉल लावला. यावर्षी खूप उन्हाळा होता ना! आम्ही सगळ्या मुलांनी वर्गणी काढली आणि एक कोकमचा कॅन आणि एक टँकचे पाकीट आणलं आणि त्याचं सरबत करून घरी फ्रिजमध्ये बाटल्या ठेवल्या. दहा रुपयाला एक ग्लास अशी किंमत ठेवली. आमचे वॉचमन काका, ऑफिसमधून येणारे सोसायटीतले सगळे लोक, कामासाठी येणारे मदतनीस या सगळ्यांनी थंडगार सरबत विकत घेतलं. आम्ही प्रत्येकाने चार दिवसांत आठशे रुपये कमावले. खूप मज्जा आली.’’श्रीश सांगताना मुलंही उत्सुकतेने ऐकताहेत ते बघितल्यावर बाई म्हणाल्या, ‘‘आजच्या तासाला हाच अभ्यास. सांगा बरं, प्रत्येकाने काय काय केलं सुट्टीत ते?’’
‘‘बाई मी रामरक्षा शिकलो. आणि लहान लहान श्लोकसुद्धा. माझे आजोबा रोज शिकवायचे मला. आजोबा म्हणतात, संस्कृत उच्चाराने वाचाशुद्धी होते म्हणून. आता मी ठरवलंय, यावर्षी संस्कृत पठण स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून.’’ नचिकेत हावभाव करत सांगत होता. मुलांच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता बघून बाई म्हणाल्या, ‘‘अरे वा नचिकेत, म्हणजे फक्त आमरस खाऊन विश्रांती घेतली नाहीस सुट्टीत. तर काहीतरी छान शिकलास. हो ना.’’ बाईच्या बोलण्याने मुलं खूप हसायला लागली.

हेही वाचा…बालमैफल : गंधभरल्या गोष्टी

‘‘बाई, मी सायकल शिकलो.’’ नील म्हणाला.’’
बाई मला सूर्यनमस्कार घालायला शिकवले मावशीने.’’ ऋजुता म्हणाली.

‘‘मी सतारीवर दोन गाणी बसवली या सुट्टीत. सानूनं सांगितलं. एकूणच मुलं चढाओढीने एकामागून एक नवं काही शिकण्याच्या गोष्टी आनंदाने सांगताना बघून बाईसुद्धा खूश झाल्या आणि म्हणाल्या, ‘‘मुलांनो, सुट्टी याचसाठी तर असते. तुम्ही वर्षभर शाळा, अभ्यास यात गुंतलेले असता. त्या कामातून बदल मिळावा म्हणून तर सुट्टी असते. काही मुलांना वाटतं सुट्टी म्हणजे निवांत उठायचं… मस्त खायचं… मज्जा करायची. पण अशाने मिळालेला वेळ आपण वाया घालवतो. याउलट निवांत मिळालेल्या वेळेत तुम्ही मुलांनी नवं काही शिकून, कुणाला तरी मदत करून, छान नवं काहीतरी कमावलं आहे हे किती छान आहे! मुलांनो, माणसांमध्ये मिसळणं, नात्यातल्या लोकांना, मित्रमंडळींना भेटणं, नवं गाव, शहर फिरणं या सगळ्यांमुळे आपण खूप काही शिकतो, हो की नाही?’’ बाईंनी प्रश्न विचारताच आर्या म्हणाली, ‘‘हो ना! आम्ही काश्मीरला गेलो होतो फिरायला, त्यामुळे कळलं की तिथली माणसं, निसर्ग कसा आहे ते. प्रवासात झोप, खाणं या सगळ्याची कशी अॅडजेस्टमेंट करायला लागते ते.’’

‘‘बरोब्बर! बरं का मुलांनो, तुम्ही ना आता खूप हुशार, शहाणे आहात. बाई बोलत असताना मधेच इरा म्हणाली, ‘‘हो बाई, मीपण आजीला मोबाइल बघायला शिकवला. तिला व्हॉट्सअॅप बघताच येत नव्हतं.’’ इराच्या बोलण्याने सगळा वर्ग हसायला लागला.

हेही वाचा…बालमैफल : पुस्तकात रमलेल्या राहुलची गोष्ट!

बाई म्हणाल्या, ‘‘मुलांनो, आपल्याला जे येतं ते इतरांना शिकवावं आणि इतरांकडूनसुद्धा आपण बरंच काही शिकावं. यासाठी निवांतपणा मिळावा म्हणूनच सुट्टी असते. यावेळी ऊन खूप होतं. त्यामुळे तुम्हाला विश्रांतीही मिळाली. हे असं नवं काही शिकून खूप मोठी कमाई केली आहे सुट्टीत तुम्ही. चला… आता नवीन पुस्तक, वह्या उघडा बरं. लागू या अभ्यासाला. बाईंनी असं म्हणताच मुलांनी उत्सुकतेने आपल्या बॅग उघडल्या आणि नव्या कोऱ्या करकरीत वह्या, पुस्तकांच्या पानांवर हात फिरवत, त्यातली चित्रं बघत, त्याच्या नवेपणाचा छान सुगंध घेत रंगून गेली अभ्यासात.

meerackulkarni@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids where children return to school with new skills and holiday adventures psg