श्रीनिवास बाळकृष्ण
तू आजवर किती देश पाहिलेस? २, ४, ६.. अरे, या पोटलीबाबाने लहानपणीच पन्नासच्या वर देश पाहिलेत; पण फक्त टीव्हीवरच! कारण लहानपणी मला हरवण्याची भीती वाटायची.
तसं आजही माझ्या अनेक गोष्टी हरवत असतात. छत्री, चपला, पोटली, टोपी, डोकं.. असं काहीही. मला कधी कधी असं वाटतं की, हरवलेल्या वस्तूंनी स्वत:हून माझ्याकडे परत यावं. असं झालं तर किती मजा येईल ना!
अशीच मजा आजच्या पुस्तकात दिसणार आहे.
लेखक अॅनेट लंगेन आणि इलस्ट्रेटर कन्स्टॅन्झा ड्रप यांनी ‘लेटर्स फ्रॉम फेलिक्स’ या पुस्तकात धमाल आणली आहे. गोष्ट तशी साधीच.. सोफी नावाच्या एका मुलीचा प्राणप्रिय बाहुला ससा (फेलिक्स) विमानतळावर हरवतो. तो तिचा प्राणप्रिय मित्र असल्याने तिच्या पालकांकडून खूप शोधाशोध होते. पण तो काही केल्या सापडत नाही. दु:खी सोफी तशीच घरी जाते.
हे ही वाचा >> पोटलीबाबा : शीऽऽऽ इ इ इ!
पण इथं बाहुला फेलिक्स विमानतळावरच असल्याने सहा-सात देश फिरतो. प्रत्येक देशातून तिला आठवणीने पत्र पाठवतो आणि शेवटाला प्रत्येक देशाच्या झेंडय़ांचे स्टिकर असलेली पेटी पाठवतो. तो पुन्हा येतो की आणखी पुढे फिरतो, हे पुस्तक वाचल्यावर/ पाहिल्यावर कळेल.
यातली सॉफ्ट रंगात रंगवलेली चित्रे छान आहेतच, पण पुस्तकात खरी मजा आहे ती पत्राच्या चित्राची. चित्रकर्तीने खरे एन्व्हलप चिटकवले आहेत. फोटोत दिसतं तसं एकेक पत्र असं वाचायला काढता येतं. फेलिक्सच्या अक्षरात ते वाचता येतं. जे अक्षर पुस्तकात इतर ठिकाणी टाईप केलंय तसं नाहीये. ही कल्पना ग्रेट आहे. लेखकाच्या कल्पनेला अशा जिवंतपणे मांडणारी चित्रकार ग्रेट आहेच; पण हे पुस्तक छापणारा पिंट्ररदेखील महत्त्वाचा आहे.
कसा? तर पुस्तक छपाईसोबत त्यांना वेगळी एन्व्हलप छापावी लागली. ती नीट चिटकवावी लागली असतील. इकडचे तिकडे चिकटवून चालणार नाही. त्यातली सर्व पत्रं पुन्हा वेगळी छापून पुन्हा नीट त्या- त्या एन्व्हलपमध्ये हे सर्व टाकलं असेल. फारच कष्टाने हे पुस्तक मुलांपर्यंत पोहोचवलं आहे.
तू कुणाला असं पत्र लिहिलं आहेस का? ई-मेल तरी? की फक्त व्हिडीओ कॉलवर गप्पा मारतोस?
अशा पत्र पद्धतीने एखाद्या ठिकाणची गंमत पोटलीबाबाला पाठवून तर पाहा!
shriba29@gmail.com