बालमित्रांनो, काही वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत आम्ही सकाळी सकाळी अभ्यंगस्नान झाल्यावर गच्चीत उभे राहून आजूबाजूची मुलं फटाके वाजवत होती ते बघत होतो. नवीन कपडे घालून अगदी आनंदात आणि उत्साहात ही मुलं फटाके वाजवून दिवाळी साजरी करत होते. आणि एकदम कावळ्यांचा कलकलाट सुरू झाला. आम्ही खाली वाकून बघितलं तर आंब्याच्या झाडाच्या फांदीवर बसून काही कावळे जोरजोरात ओरडत होते. नीट निरखून पाहिलं तर एक खारीचं पिल्लू जमिनीवर स्कूटरजवळ पडलं होतं. ते उठून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होतं, पण त्याला उठताच येत नव्हतं. तिथल्या तिथेच ते धडपडत होतं. वर उंच फांदीवर दोन खारूटय़ा स्तब्ध बसल्या होत्या. बहुतेक ते त्या पिल्लाचे आई-बाबा असतील. त्यांना काय करावं ते कळत नव्हतं. दोन मिनिटं ते दृश्य आम्ही बघत होतो. सतलजला राहवलं नाही. ती मला म्हणाली, ‘‘पपा, त्या पिल्लाला काही तरी झालं आहे, त्याला उचलून वर आणू या.’’ आम्ही खाली गेलो. आम्ही जवळ गेल्यावर ते पिल्लू घाबरून स्कूटरच्या खाली सरपटत गेलं. त्याला मार लागला होता. आम्ही स्कूटर बाजूला काढली आणि कापडाच्या बोळ्यात त्याला पकडलं. त्या पिल्लाला घरात घेऊन आलो. आमच्या घरी ‘टम्पू’ नावाचं मांजर आहे. ते त्रास देईल म्हणून त्या पिल्लाला एका खोलीत दार बंद करून ठेवलं. पण ते पिल्लू घाबरून कपाटाच्या खाली जायला लागलं. आम्ही त्याला उचलून एका खोक्यात ठेवलं आणि त्याच्या अंगावर पाणी िशपडलं. थोडं पाणी त्याच्या तोंडात घातलं. तोंडात पाणी गेल्यावर पिल्लाला थोडी तरतरी आली. पाणी घालताना त्यानं माझ्या बोटांचा चावाही घेतला. आता पुढे काय करावं ते आम्हाला कळेना. आम्हाला आठवण झाली ती मानसदादाची. मानसदादा आमच्या ‘जिज्ञासा’च्या मुलांना जंगलात फिरायला नेतो. त्याला जंगलातील अगदी लहानशा मुंगीपासून पक्ष्यांपर्यत सर्व प्राण्यांबद्दल माहिती आणि प्रेमही आहे. त्याला फोन केल्यावर तो आणि त्याची मत्रीण लगेच आमच्याकडे आले. त्यांच्याबरोबर एक दयाळ पक्ष्याचं पिल्लू होतं. ते त्यांना श्रीरंग सोसायटीत सापडलं होतं. त्याला डोळ्यावर आणि मानेवर भाजलं होतं. मानसने खारूच्या पिल्लाला जवळ घेतलं. त्याला कापसात ठेवलं. ते पिल्लू धापा टाकीत होतं. त्या दोघांना घेऊन मानस लगेच प्राण्यांच्या डॉक्टरांकडे गेला. दोन दिवसांनी त्याचा फोन आला की पिल्लू आणि पाखरू दोन्हीही मेले!
ते पिल्लू फटाक्यांच्या आवाजाने घाबरून झाडावरून उंचीवरून पडलं होतं. पडल्यामुळे त्याचा पाठीचा कणा मोडला होता आणि आतून जखम झाली होती. दयाळ पक्षी फटाक्यानं भाजला होता. झाडावर उंच उडवलेल्या फटाक्यानं दयाळ पक्षी जखमी झाला होता. हे दोन्ही प्राणी आपल्या फटाक्यांमुळे ऐन दिवाळीत मृत्युमुखी पडले होते, त्यात त्यांचा काहीही दोष नसताना.
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, सर्वसाधारण प्राण्यांची श्रवणशक्ती आपल्या शेकडो पटीनं जास्त असते. कुत्रा, मांजर आपल्या नुसत्या चाहुलीनं कान टवकारतात. मी तळमजल्यावर असलो तरी आमच्या टम्पू मांजराला माझ्या पावलांचा आवाज ऐकू येत असतो. ती लगेच दारापाशी येते. मग या सर्व प्राण्यांना आपल्या फटाक्यांचा आवाज किती बरे मोठय़ाने ऐकू येत असेल! अगदीच तुलना करायची म्हटली तर तुमच्या जवळ लढाईतील मोठा बॉम्ब फुटला तर जेवढा मोठा आवाज तुम्हाला ऐकू येईल तेवढा! यंदा दिवाळी फटाके वाजवताना या सर्व प्राण्यांना आपल्या फटाक्यांच्या आवाजाचा किती त्रास होत असेल, याचा विचार जरूर करा. किंवा फटाक्यांमुळे किती खारूताई किंवा दयाळा यांसारखे लहान पक्षी जखमी होत असतील याचीही कल्पना करा.
तुम्हाला असं वाटत नाही का की, आवाजाचं प्रदूषण कमी करावं? आपण आपला शेजारधर्म पाळावा? आपण मजा लुटताना इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी? या जीवसृष्टीतले आपल्या परिसरातले सगळेच सजीव आपले सखेसोयरे आहेत. त्या सर्वाचा आपण विचार नको का करायला? या पृथ्वीवर आनंदाने जगण्याचा आणि सुरक्षितपणे राहण्याचा आपल्यासारखाच त्यांनाही नक्कीच अधिकार आहे. मग चला तर या दिवाळीत कमी फटाके लावून एकंदरीतच सर्व प्रकारचे प्रदूषण कमी करण्यात आपण आपला खारीचा वाटा उचलूया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा