वार्षीक परीक्षा संपताच चिनू आणि मिनूला वेध लागले गावाला जाण्याचे. कधी एकदा आजीकडे जातो असे त्यांना होऊन गेले. आंबा, फणस फस्त करण्यासाठी, नदीत डुंबण्यासाठी आणि सवंगडय़ांना भेटण्यासाठी ते उतावीळ झाले होते. शिवाय आजीकडे गोष्टींचा मोठा खजिना होता. मग काय मजाच मजा! सुटीत काय काय करायचे याचे बेत आखत आखत ते गावाला कधी पोहोचले हे त्यांना कळलेही नाही.
रात्री जेवणं आटोपल्यावर गप्पाटप्पा करत सर्वजण चंद्र-चांदण्यांच्या सोबत बाहेर बसले होते. आजी म्हणाली, ‘अरे झोपायचं नाही का?’
‘ तू गोष्ट सांगण्याचं कबूल केलं आहेस आम्हाला.’ चिनू म्हणाला.
‘आज कोणती मस्त गोष्ट सांगणार आहेस?’ मिनू म्हणाली.
आजी म्हणाली, ‘ठीक आहे. चिमणी आणि कावळ्याची गोष्ट सांगते.’
‘आम्हाला माहिती आहे ती गोष्ट. शेणाचं घरटं आणि मेणाचं घरटं. जुनी झाली ती गोष्ट. आता काही तरी नवीन सांग.’ फुरंगटून चिनू म्हणाला.
‘आजी, लहानपणी एक घास चिऊचा एक घास काऊचा असे करून आम्हाला भरवतही होतीस. ‘चिव चिव चिमणी गाते गाणे’ किंवा ‘उठा उठा चिऊताई’ अशी गाणी तू आम्हाला शिकवलीस. हो ना? आठवतंय मला. पण आता आम्ही मोठे झालो आहोत. हो की नाही रे दादा?’ मिनूने तिचे मत स्पष्टपणे मांडले.
‘अगं, पण आजच्या गोष्टीत चिमणी, कावळा याबरोबरच झाडावर राहणारे इतर पक्षी, अगदी खार, माकड आणि सापसुद्धा सामील झाले आहेत. मग काय सांगू ना?’ आजीने विचारले. दोघांनी चटकन मान डोलावली.
आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. ‘एका गावात एक मोठी नदी होती. नदीच्या काठाजवळच एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर पक्षी, खारूताई, माकडे सुखाने अगदी न भांडता खेळीमेळीने राहत होते. माकडदादा आपल्या मर्कटलीला करून ह्या सर्वाना आनंदात ठेवत असे. त्या झाडाच्या जवळच असलेल्या एका बिळात साप नुकताच राहायला आला होता.
रोज सकाळी पक्षी अन्न शोधायला बाहेर जातात हे सापाला माहीत झालं होतं. या झाडावर एवढी घरटी आहेत तर कोणत्या ना कोणत्या घरटय़ात पक्ष्यांची अंडी असणारच. पक्षी बाहेर पडल्यावर ती अंडी पळवण्याचाही सापाने बेत केला. यामुळे कोणाला संशयही येणार नव्हता. पोट भरण्याचा मार्ग आपल्याला सापडला या विचाराने तो स्वत:वरच खूश झाला.
प्रथम त्याने चिमणीच्या घरटय़ातील अंडी खाऊन टाकली आणि कावळ्याच्या घरटय़ातली अंडी बिळात नेऊन ठेवली. कावळा आणि चिमणी घरटय़ाकडे परतले तेव्हा अंडी न दिसल्याने त्यांनी कासावीस होऊन शोधाशोध सुरू केली. सलग दोन तीन दिवस असे घडले. कधी नव्हे ते झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट आणि कावळ्यांचे कर्कश ओरडणे सुरू झाले. ते एकमेकांकडे संशयाने बघू लागले. गुण्यागोिवदाने नांदणारे हे सर्व अचानक भांडायला का लागले, हे खारूताई आणि माकडाला कळेना. सापाला मात्र त्यांची भांडणे बघून मौज येऊ लागली. त्याची करमणूक होऊ लागली.
आता सापाची धिटाई वाढली होती. त्याने चिमणीच्या घरटय़ातले अंडे कावळ्याच्या घरटय़ात नेऊन ठेवले. चिमणीच्या ते लक्षात आल्यावर तिने कावळ्याला याचा जाब विचारला. त्यांच्या भांडणाने सापाला हसू आवरेना. खारूताई आणि माकडदादाला मात्र राहवेना. त्यांनी दोघांची बाजू समजून घेतली.
खारूताई दोघांना म्हणाली, ‘तुम्ही हा प्रश्न शांतपणे सोडवायला हवा. असे भांडण करून काहीच साध्य होणार नाही.’
‘तुमच्या गैरहजेरीत हे सर्व घडत आहे हे तुम्हाला लक्षात आले आहे का?’ माकडदादाने विचारले.
‘पण हे सगळं करतंय तरी कोण?’ कावळा म्हणाला.
‘आणि माझे अंडे या कावळ्याच्या घरात नेऊन ठेवायचं कारण काय?’ चिमणी म्हणाली.
‘तुम्ही दोघांनी एकमेकांवर संशय घेत भांडत राहावे आणि चोराला मात्र नामानिराळा राहून त्याचे काम चालू ठेवता यावे.’ माकडदादा म्हणाले.
‘हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेव्हा आपण एकजुटीनेच तो सोडवू या.’ चिमणी म्हणाली. कावळ्याने त्याला दुजोरा दिला. खारूताई आणि माकडदादांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. खारूताई आणि माकडदादा यांनी शोधकार्याला सुरुवात केली. रोज एकेक जण आळीपाळीने लपून राखण करू लागला. हे सगळे सापाचे उपद्व्याप आहेत हे त्यांना कळले. त्यामुळे सर्वानाच धक्का बसला.
आता सापाला धडा शिकवायचाच असा त्यांनी निश्चय केला. कावळे आणि चिमण्या आपल्या भाऊबंदांसह सापाला दिसणार नाहीत असे झाडावर लपून बसले. साप अंडी खाण्यासाठी घरटय़ाजवळ पोचल्याक्षणी सर्वानी चोचीने टोचून सापावर एकत्रित हल्ला केला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्याने गयावया केली. तेव्हा ते गाव कायमचे सोडून जाण्याची अट सर्वानी त्याला घातली. पुन्हा असे काही करण्याचा प्रयत्न केला तर चांगलीच अद्दल घडवू, असा दमही भरला. त्याने त्या सर्वाची माफी मागितली आणि तो तेथून निघून गेला. झाडावरील सर्वच पक्ष्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि ते पुन्हा आनंदाने राहू लागले.
‘आवडली का गोष्ट? आता सांगा, या गोष्टीवरून तुम्ही काय शिकलात?’ आजीने विचारले.
‘एकीचे बळ’ आणि ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ छोटी मिनू म्हणाली. आजीने कौतुकाने तिचा पापा घेतला.
‘आपल्यात फूट पाडून कोणी स्वत:चा स्वार्थ तर साधत नाही ना, यासाठी सावध रहायला हवे. हो ना आजी’ चिनू म्हणाला.
‘अरे वा! आमचा चिनू हुशार आहे.’ आजीने त्याला जवळ घेऊन शाबासकी देत म्हटले. गोष्टीच्या आनंदात चिनू-मिनू गाढ झोपी गेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा