डॉ. तेजस्विनी कुलकर्णी dr.tejaswinikulkarni@gmail.com
एक होतं जंगल. तिथे माकडं, वाघ, सिंह, हरणं, ससे, हत्ती, खारी असे अनेक प्राणी गुण्यागोविंदाने राहत. जंगलातून वाहणारी एक नदीसुद्धा होती. नदीत वेगवेगळे मासे, मगरी आणि कासवंही मजेत राहायची.
याच नदीच्या किनारी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांच्या छोटय़ा छोटय़ा पिल्लांची रोज शाळा भरायची. शाळेच्या मास्तरीणबाई होत्या पिंटू नावाच्या एका छोटू माकडाची आई. या माकडीणबाई फार हुशार. जंगलातले सर्व प्राणी त्यांना खूप मानत. कोणतीही समस्या कधी उद्भवली, तर ती सोडवण्यात त्या कायम अग्रस्थानी असत. त्यांचा जीव मात्र या छोटय़ा प्राण्यांमध्ये अडकलेला. प्राण्यांना लहानपणापासूनच जंगलाविषयी माहिती, इथले नियम, इथे लागणारी कौशल्यं इत्यादी शिकवलं जावं असा जणू त्यांचा हट्टच असे. एकमेकांना कायम मदत करून मिळून मिसळून राहण्याच्या बाबतीत तर त्या एकदम आग्रही.
एव्हाना उन्हाळा सुरू झाला होता. यावर्षीच्या शाळेतील वार्षिक परीक्षांचा निकाल लागला. पिंकी माशाचा वर्गात पहिला नंबर आला होता. बाकी सगळे प्राणीसुद्धा छान पास झाले. पिंटू माकडाला मात्र नेहमीपेक्षा कमी मार्कस् मिळाले होते, म्हणून तो उदास झाला. आपली आई स्वत: शिक्षिका असूनसुद्धा मी पिंकीसारखं यश मिळवू शकलो नाही असं वाटत होतं त्याला.
माकडीणबाई शाळेची बाकी कामं उरकून घरी आल्या, तेव्हा त्यांनी पिंटूला उदास होऊन बसलेलं पाहिलं. पिंटूला जवळ घेऊन त्यांनी विचारलं, ‘‘बाळा काय झालं असं तुला हिरमुसायला?’’
‘‘मला तू शिक्षा दे आई. मला नाही मागच्या वेळेसारखा पहिला नंबर काढता आला परीक्षेत. पिंकीपुढे मी कमी पडलो. पिंकीसारखं जमायला हवं होतं मला यश मिळवायला.’’ पिंटू शरमेला झाला.
‘‘अरे राजा, अशी तुलना करून कसं चालेल? पिंकीला पाण्यात गती आहे हे मान्य. पण तुला झाडांवर चढण्यात गती आहे, हे विसरू नकोस. ती आहे का पिंकीला? आपल्या प्रत्येकामध्येच काही ना काही क्षमता आहेत, वेगवेगळी कौशल्यं आहेत. आपण आपल्या चांगल्या गुणांना जास्तीत जास्त वाढवणं, त्यांना जोपासणं हे आपलं काम. जे गुण तुझ्यात नाहीत ते राजू गरुडाकडे आहेत. तू उडू शकशील का त्याच्यासारखा हवेत उंच? तसंच, जी चपळता तुझ्याकडे आहे ती राजूकडे नाही. पिंकीचंही तसंच. तुम्हा दोघांची कौशल्यं, क्षमता ही वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही.’’
‘‘हे तर तू बरोबर सांगतेस आई. पण मग मला पिंकीपेक्षा कमी मार्कस् कसे पडले आणि पिंकी पहिली कशी आली गं आपल्या शाळेत?’’
‘‘सांगते. तुला आठवतं, मागच्या वेळी पिंकीला किती कमी गुण होते? तेव्हा तिला पोहण्यात तिच्या वयाला गरजेचा तितका वेग गाठताच येत नव्हता मुळी. यावर्षी मात्र तिने जिवापाड मेहनत घेतली. खूप सराव केला. मोठय़ा माशांशी बोलून तिचं कुठे चुकतंय, ती कुठे कमी पडतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तिच्या वयाच्या मानाने यावर्षी उत्तम वेगाने ती पोहू शकली. म्हणून तिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला जर झाडावर चढायला लावलं असतं, तर तिचा आला असता का रे पहिला नंबर?’’
‘‘हं.’’ पिंटूने मान डोलवली.
‘‘एक गोष्ट कायम लक्षात ठेव पिंटू, आपली सतत इतरांशी तुलना करणं ही खरं तर आपल्या मनाची एक वाईट सवय आहे. याने आपण फक्त उदास होतो. तू जर दरवर्षी पहिला येण्याचा हट्ट धरलास तर प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही; आणि जेव्हा जेव्हा तू पहिला येणार नाहीस, तेव्हा तू असा आजसारखा दु:खी राहशील. त्याऐवजी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न कर. तुझ्या यशाची तुलना फक्त स्वत:शी कर. इतरांना नक्की सल्ला विचार, त्यांच्याकडून शिक, पण इतरांशी तुलना कधीच करू नकोस.
इतर कोणी तरी तुझ्यापेक्षा चांगले गुण मिळवले, याचा अर्थ तू मिळवलेले गुण वाईट असा होत नाही. किंवा त्यामुळे तू अपयशीसुद्धा ठरत नाहीस. तूच एक प्रश्न स्वत:ला विचारून पाहा, पहिला नंबर एकच असतो आणि वर्गात मुलं ३०! मग बाकी २९ जण काय अपयशी म्हणायचे का रे?’’
‘‘नाही गं! खरं आहे तुझं. पिंकीच्या जास्त मार्काचा अर्थ मी कमी आहे असा अजिबातच होत नाही. किती सहज मी तिच्या यशाला माझं अपयश मानून बसलो. मी माझ्यामध्ये झालेल्या प्रगतीचंसुद्धा कौतुक करायला विसरलो. मला माझ्यावरच हसू येतंय आता आई!’’ दोघंही खळाळून हसले.
‘‘शाब्बास माझ्या राजा! आता मी तुझी यावर्षीची प्रगती, तुझं खरं यश साजरं करण्यासाठी केलेला मस्त फ्रूट केक खाऊयात?!’’ असं म्हणत बाईंनी निकालाच्या दिवसाचा गोड शेवट केला.
या दिवसामुळे पिंटूला आता लक्षात आलं की तुलना करणे ही एक वाईट सवय आहे. आणि ती केलीच तर इतरांशी नाही तर फक्त स्वत:शी करायची असते.
मित्र-मत्रिणींनो, आपणही अशी पिंटूसारखी चुकीची तुलना करतो का, हे तुम्हीसुद्धा तपासून पाहा. तुलना करण्याची सवय ही आपल्या मनाला लागलेला एक व्हायरसच आहे जणू. आपण अजून चांगलं यश मिळवण्याचा प्रयत्न नेहमीच करू शकतो. तुमच्या मित्र-मत्रिणींच्या यशातून प्रेरणा घ्याल तर अजूनच उत्तम. मात्र, त्यांच्या यशातून येणारं असमाधान आपल्याला उदास तर करत नाही ना, याचा विचार करा. अशा प्रकारचा औदासीन्याने, असमाधानाने आपण असलेलं यशसुद्धा गमावू शकतो. कारण या तुलनेमुळे आपल्या मनावर येणारा ताण अति झाला, तर तो आपल्याला अभ्यासात, खेळात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कमजोर करण्यात हातभार लावतो. मग मित्रहो, तुम्हीच सांगा, काय उपयोग या तुलनेचा? यापेक्षा आपली प्रगती ओळखून, ती साजरी करणं, त्यासाठी आपली पाठ थोपटणं किती छान!