राजश्री राजवाडे shriyakale@rediffmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल होळी होती. आज रंग खेळायचा दिवस. रंग खेळण्याकरता जमलेल्या लहान मुलांचे आवाज ऐकू येत होते. सोनालीची दोन्ही भावंडं बाहेर खेळत होती. आई मात्र अजूनही झोपूनच होती. ‘म्हणजे आज मलाच कामावर जावं लागणार,’ सोनाली मनात म्हणाली. कालच तिच्या आईने सांगून ठेवलं होतं, ‘‘सोने, आज लई अंग दुखून आलंय, घसाबी दुखतोय. उद्या मला नाय उठवलं तर तू जा कामाला. मॅडमकडं आज पुरणपोळीचं जेवण होतं, पावणं बी आलेले, सुट्टी घेऊन चालणार नाय.’’ सोनालीला माहीत होतं पंधरा दिवसांपूर्वीच पाच दिवस गावाला गेल्याने आईची मोठी सुट्टी झाली होती. आता लगेच सुट्टी घेतली तर बरं दिसणार नाही आणि शिवाय आई म्हणाली होती, ‘‘बरं नाय सांगितलं तर त्यांना वाटतं खोटंनाटं सांगून सणाकरता सुट्टी घेतली. त्यापरीस उद्या जरा तूच जा कामाला.’’ सोनालीला माहीत होतं की, तिला कामावर आलेलं बघून मॅडम म्हणणारच, ‘‘ही लहान मुलीला कशाला पाठवते कामाला. शिकायचं वय आहे तिचं, एवढंही कळत नाही या लोकांना?’’ मॅडम असं म्हणाल्या तरी काम तर होतं, म्हणून मॅडमचाही काही इलाज नसतो. नाही तरी सोनालीची आई म्हणायचीच, ‘‘पोरीला शिक्षणाची अजिबात आवड नाही, त्यापरीस, थोरल्या पोराला आणि धाकटय़ा पोरीला खूप शिकवीन. ती दोघं चांगले मार्कस् पाडतात परीक्षेत, हिला कुठे मार्कस् मिळतात. पुढं जाऊन ही बी माझ्यासारखंच काम करणार असं दिसतंया.’’ खरंच सोनालीला अभ्यास आवडतच नव्हता मुळी. धडा वाचायला अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं, की त्या धडय़ातल्या चित्रांकडेच लक्ष जायचं आणि ती चित्रं जशीच्या तशी नकळत ती वहीत उतरवायची. तिच्या हातात जणू जादूच होती. फक्त तिच्या हातातली जादू धुण्याभांडय़ाची कामं करायला न वापरता कशी वापरायची हे तिच्या आईला अजून समजलं नव्हतं.

ती ज्यांच्या घरी कामाला जायची त्या मॅडमना दोन मुली होत्या. एक सोनालीच्याच वयाची- आठवीत शिकणारी, तर दुसरी चौथीत शिकणारी. त्या मुलींचे छान छान जुने झालेले कपडे सोनालीला आणि तिच्या बहिणीला मिळायचे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या बरीच कोरी पानं शिल्लक असलेल्या वह्य आणि रंग! ते रंग मिळाले की सोनालीला खूप आनंद व्हायचा. त्यांच्यामुळे तिला कितीतरी रंगांचे प्रकार वापरायला मिळत होते. क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, वॉटर कलर्स, फॅब्रिक कलर्स..  दोन-तीन पानंच वापरलेल्या चित्रकलेच्या वह्य मिळाल्या की सोन्याहून पिवळं! पण तिची एक तक्रार असायची, अर्थातच स्वत:च्याच मनाशी की, त्या मिळालेल्या रंगामधले गुलाबी, हिरवा आणि निळा हे रंग मात्र बरेचदा संपलेलेच असायचे; दोन्ही मुली जास्तीत जास्त हेच रंग वापरायच्या. मग सोनालीच्या चित्रातली फुलं मात्र लाल, पिवळी असायची. पांढरा रंग शिल्लक असेल तर लाल रंगात पांढरा मिसळून कधी तरी गुलाबी, झाडांनाही पिवळा आणि थोडासाच शिल्लक असलेला निळा रंग मिसळून कसाबसा हिरवा रंग मिळायचा. पण मग आकाश मात्र ढगाळ असायचं.

सोनाली कामाला निघालेली बघून आई उठली आणि म्हणाली, ‘‘चाय करते, पिऊन जा.’’

‘‘त्या दोघांना रंग खेळण्यापुढे चाय, दूधपण नको होतं. आज तसेच बाहेर पळाले.’’ सोनालीने तिच्या भावंडांबद्दल सांगितलं.

दहा-पंधरा मिनिटं चालून सोनाली मॅडमच्या घरी कामावर पोहोचली. त्यांच्या दोन्ही मुलींची रंग खेळायला जायची तयारी सुरू होती. पिचकाऱ्या पाण्याने भरणं, रंगाची बादली तयार करणं.. पण सोनालीला रंग वाट्टेल तसे फासून चिखल करून खेळण्यापेक्षा वहीवरच्या चित्रातच खेळायला आवडायचं.

सोनाली भांडी घासत होती. रात्री बरेच पाहुणे आले असावेत. भांडय़ांना अजूनही पुरणाच्या पोळीचा वास येत होता. मॅडम दरवर्षी पुरणाची पोळी देतात हे सोनालीला माहीत होतं. सोनाली केर काढत होती तेव्हा मॅडम दोन्ही मुलींना रागवत होत्या- कारण रंग खेळायला कोणते जुने कपडे घालायचे हे निवडताना त्यांनी कपाटातले सगळे कपडे खाली पसरले होते. ‘‘आता नको असलेले कपडे आत्ताच काढून टाकते.’’ सोनालीच्या कानावर शब्द पडले. सोनालीने फरशी पुसण्याकरिता कापड हातात घेतलं तसं मॅडम म्हणाल्या, ‘‘तू नको पुसू फरशी. तू जा घरी आता आणि ही पिशवी घेऊन जा घरी. यात कपडे आणि पुरणपोळ्या आहेत.’’ सोनाली पिशवी घेऊन वळली. इतक्यात मॅडमनी पुन्हा थांबवलं आणि रंगाचा मोठ्ठा न वापरलेला बॉक्स आणि नवीन चित्रकलेची वही तिच्या हातावर ठेवत म्हणाल्या, ‘‘हे पण घेऊन जा.’’

ती भांबावली, ‘‘हे.. हे तर नवीन..’’

‘‘हो, काल पाहुणे आलेले ना त्यांच्या मुलांना आम्ही गिफ्ट्स आणलेली, तूही घे हं!’’ ते घेऊन सोनाली घराच्या बाहेर पडली. घाईघाईने रंगाच्या बॉक्सवरचा कागद फाडला आणि.. आणि पाहते तर काय सगळ्या रंगांसोबत त्यात गुलाबी, निळ्याशार आणि हिरव्यागार रंगाच्या बाटल्या. ती झपाझप पावलं टाकत वस्तीकडे निघाली. आता कधी एकदा घरी जाऊन रंग खेळेन असं झालं होतं तिला. हातातल्या नव्याकोऱ्या चित्रकलेच्या वहीवर ती आज गुलाबी, निळ्या, हिरव्या रंगाशी मनसोक्त खेळणार होती. आज मात्र सोनालीच्या चित्रातील फुलं गुलाबी असणार होती, झाडं हिरवीगार असणार होती आणि तिचं आकाश निळंशार, निरभ्र असणार होतं.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of holi for kids moral stories in marathi for children interesting story for children zws