‘आजच्या पेपरनं डोक्याला ताप आणला अगदी! अंश-छेद, अंश-छेद करून डोक्याचा छेद होऊन भुगा झालाय नुसता’, रोहन तावातावानं बोलत होता. त्याला दुजोरा देत दीपक म्हणाला, ‘हो ना! अपूर्णाकाची किती गणितं घालायची एका पेपरमध्ये, असा काय मोठा उपयोग असतो त्याचा?’
पेपर संपल्यावर रोहन आणि दीपक अगदी त्रासून एकमेकांशी बोलत होते. कारण आज गणिताच्या पेपरमध्ये जवळजवळ पाच-सहा गणिते अपूर्णाकांशी संबंधित होती. काही सोपी तर काही अवघड!
‘किती वेळ जातो ना?’ दीपक म्हणाला. रोहननं जरा मानेला झटका देत म्हटलं, ‘त्यामुळे उरलेल्या पेपरवर परिणाम होतो. खरंच गणितात हे अपूर्णाक, दशांश चिन्ह वगरे नसतेच तर किती बरं झालं असतं.’
दीपक म्हणाला, ‘जाऊ दे आता. उद्या इतिहासाचा पेपर आहे. सनावळी पाठ करायच्या आहेत अजून.’ असे म्हणून ते दोघे घराकडे गेले.
रोहन आणि दीपकचं हे संभाषण पूर्णाक व अपूर्णाक संख्यांनी ऐकलं होतं. अपूर्णाकाचा चेहरा पडलेला पाहून पूर्णाक त्याला म्हणाला, ‘काय रे, असा रडवेला का झाला आहेस?’ त्यावर अपूर्णाक म्हणाला, ‘मी कोणालाच आवडत नाही. अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंत. मी दिसलो की सगळे नाकं मुरडतात.’
त्याचे सांत्वन करत पूर्णाक म्हणाला, ‘नाही रे बाबा. असं काही नाही.’
‘नाही कसं? असंच आहे. ही लहान मुलं माझ्याबद्दल काय विचार करतात हे तर तू ऐकलं आहेसच. पण मोठी माणसंही तशीच. बँकेचा चेक शंभर रुपये पन्नास पशांचा असेल तर म्हणतात कसे,‘ शंभरच रुपये द्यायचे, नाहीतर एकशे एक. हे अर्धवट पन्नास पसे कशाला? म्हणजे काय, मला काहीच किंमत नाही हेच खरे.’ अपूर्णाक तावातावानं बोलत होता.
पूर्णाकानं त्याची समजूत काढत  म्हटलं, ‘अरे, तूही आमच्यासारखाच महत्त्वाचा आहेस.’
‘फोन नंबर, मोबाइल नंबर, घडय़ाळातले आकडे पूर्णाकात असतात. दहा रुपये पन्नास पसे असं नोटेवर कधी लिहिलेले पाहिलंस?’ अपूर्णाक अजूनही तणतणतच होता. तो पुढे म्हणाला, ‘पंधरा रुपये अर्धा किलो असा भाजीचा भाव असेल आणि एखाद्याला पाव किलो भाजी घ्यायची असेल तर भाजीवाले त्याचे आठ रुपये तरी लावतात. नाहीतर दहा रुपयांची भाजी घ्या म्हणतात. म्हणजे एकूण काय, मला काही किंमत नाहीच.’
तेवढय़ात गणिताच्या पुस्तकाने, ‘अहो! अपूर्णाक दादा, जरा शांत व्हा! तुमची गणितातच नाही तर सगळीकडे किती आवश्यकता हे तुम्हाला माहीत नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा परीघ काढण्यासाठी पाय हा ूल्ल२३ंल्ल३ वापरला जातो. बरोबर?’ अपूर्णाकाने होकारार्थी मान डोलावली.
‘त्याची किंमत किती असते सांग बरं?’ पुस्तक म्हणाले.
‘२२/७’, अपूर्णाक तत्परतेनं म्हणाला.
‘म्हणजेच ३ पूर्णाक १४ ही अपूर्णाक संख्याच की,’ पूर्णाक म्हणाला.
‘वर्तुळाचे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ, पृष्ठफळ तुझ्याशिवाय कसे काढता येईल?’ पुस्तक म्हणाले.
अपूर्णाकाच्या कपाळावरच्या आठय़ा जरा कमी झाल्या आणि चेहऱ्यावर जरा समाधान दिसू लागलं. पुस्तक पुढे म्हणालं, ‘ही लहान मुलं आणि मोठी माणसं रोजच्या जीवनात तुझा किती सहज उपयोग करून घेतात हे त्यांच्या लक्षातही येत नसेल.’
‘ते कसं बरं?’ अपूर्णाकानं आश्चर्यानं विचारलं.
‘आई छोटय़ा पूर्वाला सांगते की, ‘अध्रे चॉकलेट मिहीरदादासाठी ठेव बरं का!’ जेवताना बाबा आईला सांगतात, ‘मी आज फक्त दीडच पोळी खाईन.’ किंवा चार मित्र खाण्यासाठी एकाच सफरचंदाचे समान भाग करतात तेव्हा प्रत्येकाच्या वाटय़ाला एक चतुर्थाश भाग येतो.’ पुस्तक सांगत होते.
पूर्णाक आणि पुस्तकाने इतकी विविध उदाहरणे सांगितल्यावर अपूर्णाकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने त्या दोघांचे आभार मानले.
‘मी एखाद्या पूर्ण गोष्टीचा छोटा किंवा मोठा, पण अपरिहार्य भाग असतो. एका संत्र्यातील एक फोड म्हणजे मीच, एका पुस्तकातील एक पान म्हणजे मीच. गणित किंवा विज्ञानात वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट सूत्रांतील भागही मीच. मीही किती महत्त्वाचा घटक आहे हे मला आज तुमच्यामुळे उमगलं.’
‘चला! म्हणजे नाकावरचा राग गेला तर!’ पुस्तक हसून म्हणालं.
आणि पुढे पूर्णाक म्हणाला, ‘आता लक्षात ठेव. ही लहान मुले काही म्हणाली तरी रागवायचं नाही. ती जशी मोठी होतील तसं त्यांना कळेल की अपूर्णाकाविना पूर्णाक अपूर्णच आहे!’
त्यावर अपूर्णाक म्हणाला,
‘आज झाला रहस्यभेद
नष्ट झाला मनातला खेद
ना कुणी ज्येष्ठ ना कनिष्ठ
आपल्या परीने सर्वच श्रेष्ठ.’
हे ऐकून पूर्णाक म्हणाला, ‘ह्याला इतका आनंद झालाय की हा तर काव्यच करू लागला.’ आणि सर्वजण हसू लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा