आणि खरेच, श्रीकृष्ण स्वत: कौरवसभेत गेला. तिथे त्याने पांडवांना अध्रे राज्य देण्याची विनंती केली. तो धृतराष्ट्राला म्हणाला, ‘‘कुल राखायचे असेल तर एका कुपुरुषाचा त्याग करावा लागतो, गाव राखण्यासाठी एका कुळाचा त्याग करावा लागतो, देशहितासाठी एका गावावर पाणी सोडावे लागते, मात्र आत्मकल्याणासाठी सर्व पृथ्वीचा त्याग करावा लागतो. तेव्हा हे राजा, तू प्रथम दुर्योधनाला आवर आणि पांडवांशी सख्य कर. त्याच्या हट्टापायी सर्व कौरवकुलाचा नाश होऊ देऊ नकोस.’’ या कृष्णाच्या म्हणण्याला कण्व व नारद मुनींनी जोरदार पाठिंबा दिला, पण दुर्योधन ताडकन उठून म्हणाला, ‘‘हे कृष्णा, पांडवांना अध्रे राज्यच काय, पाच गावेच काय, पण सुईच्या अग्रावर राहील एवढी भूमीसुद्धा आम्ही देणार नाही.’’ हे ऐकल्यावर श्रीकृष्णाला मनातल्या मनात उमजले की आता युद्धाला पर्याय नाही. दुर्योधनादी कौरवांची दर्पोक्ती ऐकून त्याने शेवटचा इशारा दिला, ‘‘जर पांडवांना तुम्ही कोणताही वाटा देणार नसाल तर कुलक्षयाला तयार राहा.’’
ज्याप्रमाणे कृष्णाने स्वत:हून सामोपचाराचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे एखाद्या समस्येत तोडगा काढण्यासाठी कोणी त्रयस्थ स्वत:हून पुढे सरसावला तर त्याला ‘कृष्णशिष्टाई’ची उपमा देण्यात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा