कौरवांनी पांडवांना द्युतात हरवून बारा वर्षे वनवास व एक वर्षे अज्ञातवासात पाठवलं होतं. पांडव वनवासात असताना त्यांच्या दारिद्रय़ाला हिणवावं व स्वत:च्या श्रीमंतीचं प्रदर्शन करावं म्हणून कौरव आपल्या कुटुंबकबिल्यासह पांडव राहत असलेल्या द्वैतवनात जात असत.
एकदा दुर्योधन आपल्या परिवारासह द्वैतवनातील सरोवराकडे जाण्यास निघाला, त्याच वेळी चित्रसेन गंधर्व आपल्या अप्सरांसह त्याच सरोवरात जलक्रीडा करत होता. सरोवराकडे येणाऱ्या दुर्योधनाला पाहून गंधर्वानं त्याला तेथे येण्यास अटकाव केला. या अडवणुकीचा दु:शासनाला प्रचंड राग आला. क्रोधमग्नतेतूनच त्यानं गंधर्वाना युद्धाचं आव्हान दिलं. दोन्ही पक्षांत तुंबळ युद्ध सुरू झालं आणि त्यात गंधर्वाची सरशी झाली. गंधर्वानी कौरववीरांचा पराभव केला. गंधर्वापुढे कौरवांची दयनीय अवस्था झाली. यातून आपण वाचणे कठीण आहे, हे लक्षात आल्यावर चार-सहा कौरवसैनिक जीव मुठीत धरून कसेबसे पळ काढीत वनवासात असलेल्या युधिष्ठिरासमोर पोहोचले आणि अक्षरश: त्याच्या हातापाया पडत कुरुकुलाची अब्रू वाचविण्याची विनंती करू लागले.
यावर भीम म्हणाला, ‘‘आपण आता काहीही करायचं नाही. सगळ्या कौरवांचा यक्षाच्या हातून नाश होऊ दे. आपोआपच कौरवांचा काटा काढला जाईल. सुंठीवाचून खोकला जाईल.’’ पण भीमाचं हे म्हणणं युधिष्ठिराला अजिबात रुचलं नाही. तो म्हणाला, ‘‘आपापसात भांडताना आपण पाच विरुद्ध ते शंभर कौरव हे ठीक आहे, पण जेव्हा परकीयांशी मुकाबला करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही एकशे पाच मिळून शत्रूशी मुकाबला करू. शत्रूला चारीमुंडय़ा चीत करू.’’
अशा प्रकारे हर तऱ्हेनं समजूत घालून युधिष्ठिरानं भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वाना कौरवांच्या मदतीसाठी तयार केलं. पांडव गंधर्वाविरुद्ध लढण्यासाठी कौरवांना जाऊन मिळाले व कौरवांसह पांडवांनी लढून गंधर्वाना धूळ चारली व शत्रूशी लढताना ‘वयम् पंचाधिकम् शतम्! हे दाखवून दिलं.
अशा प्रकारे आपापसात कितीही हेवेदावे असले तरी परकीयांशी लढताना एकजुटीनं लढा देण्याच्या वृत्तीला ‘वयम् पंचाधिकम् शतम्’ म्हटलं जातं.
वाक्प्रचारांच्या गोष्टी : वयम् पंचाधिकम् शतम्
कौरवांनी पांडवांना द्युतात हरवून बारा वर्षे वनवास व एक वर्षे अज्ञातवासात पाठवलं होतं. पांडव वनवासात असताना त्यांच्या दारिद्रय़ाला हिणवावं व स्वत:च्या श्रीमंतीचं प्रदर्शन करावं म्हणून कौरव आपल्या कुटुंबकबिल्यासह पांडव राहत असलेल्या द्वैतवनात जात असत.
आणखी वाचा
First published on: 16-12-2012 at 12:28 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of mahabharat