मुक्ता चैतन्य muktaachaitanya@gmail.com

आज मी तुम्हाला मेमरी बँडाची गोष्ट सांगणार आहे.

आफ्रिकेत मलावी नावाचा एक छोटा गरीब देश आहे. अनेक जुनाट आणि मागास प्रथांनी या देशातला समाज ग्रासलेला आहे. त्यातलीच एक प्रथा म्हणजे बालविवाह. चिमुरडय़ा वयात मुलींची लग्नं लावली जायची. पण याच छोटय़ाशा देशातल्या सर्वसामान्य घरात जन्माला आलेली मेमरीने वयाच्या तेराव्या वर्षी बालविवाहाला कडाडून विरोध केला. ज्या समाजात मुलींना त्यांचं मत मांडण्याची सोय नाही, तिथे मेमरीने सगळ्या समाजाशी पंगा घेतला.

कसा? सांगते ना तिची गोष्ट!

आज मेमरी बावीस वर्षांची आहे. पण तेव्हा ती जेमतेम तेरा वर्षांची होती.

मलावी परंपरेनुसार मुलीला पाळी आली की लगेच तिला एका कॅम्पला पाठवलं जातं. या कॅम्पला इंग्लिशमध्ये ‘इनिशिएशन कॅम्प’ असं नाव आहे. तर या कॅम्पमध्ये या दहा-बारा वर्षांच्या मुलींना लैंगिक संबंध कसे ठेवले पाहिजेत, आयुष्यात येणाऱ्या पुरुषांना खूश ठेवण्यासाठी काय काय करायला हवं, मलावी प्रथेप्रमाणे त्यांच्यासमोर कसं नाचायचं.. अशा कितीतरी गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. थोडक्यात, मुलींना लग्नासाठी तयार करणं हे या कॅम्पचं काम! खरं तर या कॅम्पबद्दल बरेच वाद आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मतानुसार, कॅम्पच्या माध्यमातून तारुण्यात पदार्पण करणाऱ्यांना लैंगिक शिक्षण दिले जाते. तर काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हे कॅम्प मुलींचं शोषण करतात.

मेमरीची बहीण अकरा वर्षांची होती, जेव्हा पाळी आल्यावर घरच्यांनी तिला या कॅम्पला पाठवलं. पण तिचा या कॅम्पचा अनुभव चांगला नव्हता. पाठोपाठ एकाच वर्षांत म्हणजे जेमतेम बाराव्या वर्षी मेमरीची बहीण मर्सीचं लग्न झालं. मर्सी आज एकोणीस वर्षांची आहे आणि तिला तीन मुलं आहेत. मेमरीलाही तेराव्या वर्षी पाळी आली. समाजाच्या नियमांनुसार तिनेही कॅम्पला जाणं अपेक्षित होतं. पण बहिणीचे हाल बघितल्यावर आणि इतर मत्रिणींकडून अनेक गोष्टी ऐकल्यावर मेमरीने मात्र या गोष्टीला कडाडून विरोध केला. लोकांनी तिला नावं ठेवली. तिच्या समाज आणि संस्कृतीच्या चालीरीती आणि परंपरांबद्दल तिला अजिबात आदर नाहीये म्हणून रागराग केला. पण तेरा वर्षांची मेमरी कशानेही बधली नाही. जाणार नाही म्हणजे नाही. तिने ठामपणे सांगून टाकलं. ती म्हणते, ‘मला माझं आयुष्य माझ्या इच्छेने जगायचं आहे. माझी खूप स्वप्नं आहेत. ती पूर्ण करायची आहेत.’

तिच्या स्वप्नातलं एक महत्त्वाचं स्वप्न होतं- बालविवाह बंद करण्याचं. फक्त तिच्या समाजातले नाही, तर मलावीमधल्या इतरही समाजातले बालविवाह आणि इनिशिएशन कॅम्प्स बंद झाले पाहिजेत असं तिला वाटतं. तेराव्या वर्षी स्वत:च्या लग्नाला आणि इनिशिएशन कॅम्पला जायला नकार दिल्यावर तिने बालविवाहविरोधात कामाला सुरुवात केली. तिच्या प्रयत्नांमुळे अनेक मलावी मुले-मुली अजाणत्या वयातल्या लग्नाला विरोध करू लागली आहेत.

आज मलावी गर्ल्स एम्पॉवरमेंट नेटवर्क, लेट गर्ल्स लीड आणि गर्ल्स नॉट ब्राइड्स या संस्थांबरोबर काम करते आहे. तिच्या प्रयत्नांमुळे मलावी देशातील लग्नाचे वय १५ वरून १८ झाले आहे.

मेमरीची एकच इच्छा आहे, मुलींनी नाही म्हणायला शिकावं. जे आवडत नाही त्याला ‘नाही’ म्हणावं.

मलावी जे सांगतेय ते आपल्या सगळ्यांना लागू पडत नाही का? मग तो मुलगा असो नाहीतर मुलगी. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, जिथे आपल्याला सुरक्षित वाटत नाही, जे स्पर्श आपल्याला नकोसे वाटतात, तिथे नाही म्हणता आलंच पाहिजे.  मग ती व्यक्ती कितीही जवळची असूदेत, नात्यातली असूदेत. जे आपल्याला त्रासदायक वाटतंय ते सहन न करता ‘नाही’ म्हणायला शिकलं पाहिजे.

मेमरी हेच सांगतेय. तुम्हीही लक्षात ठेवाल ना!

नकोशा गोष्टींना, स्पर्शाना, मित्रमत्रिणींच्या गप्पांना ‘नाही’ म्हणा!

मेमरी बँडाचा टेडटॉक आणि इतर व्हिडीओज् तुम्ही बघण्यासाठी या लिंक्सचा वापर करा.

https://www.ted.com/talks/memory_banda_a_warrior_s_cry_against_

child_marriage/transcript?referrer=playlist-ted_under_20#t-34314

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक

Story img Loader