|| श्रीनिवास बाळकृष्णन

लोभस मिकी माउसचे कुटुंब तसे मोठेच.. मिनी माउस, गुफी, डोनाल्ड डक, डेझी डक अशा पाच जणांच्या कुटुंबात ‘प्लूटो’ नावाच्या सहाव्याची एन्ट्री झाली. मिकी कुटुंबातील हा ‘माणूसपात्र’ नसून एकमेव प्राणी असल्याने कपडे घालायचा नाही. तुम्ही म्हणाल, डोनाल्ड डकदेखील पॅन्ट घालत नाही. तर त्याचे उत्तर सध्या माझ्याकडे नाही!

मध्यम आकाराचा, छोटय़ा केसांचा, काळ्या कान-शेपटीचा, चिक्कार भुंकणारा हळदी रंगाचा (इंडियन एलो) प्लूटो- द पप, वॉल्ट डिस्नेनीच बनवला तो मिकी माउसचा पाळीव कुत्रा म्हणून. तो मिकीचा पाळीव कुत्रा असला तरी गळ्यात फक्त पट्टा, साखळी नाही. कधीही काहीही खाऊ शकतो, भुंकू शकतो आणि कुठेही जाऊ शकतो! त्यामुळेच बरेचदा त्याची वाट लागते. स्वत:चा वेंधळा, घाबरट, नको तिथं साहसी स्वभाव दाखवत असतो.

प्लूटोचीही फॅमिली आहे. मित्रपरिवार आहे. प्लूटोची बायको आहे. पण लग्नानंतर तिने सिनेमात काम करणार नसल्याचं मला कळवलं. प्लूटो ज्युनियर नावाचा एक मुलगा आहे. सततच्या क्लासेस व परीक्षांमुळे तोही क्वचित दिसतो.

एक भाऊ आहे तो कभीभी आताय-जाताय इसलीये त्याचे नाव के.बी असावं! १९३० साली प्लूटो पहिल्यांदा भेटीला आला. तसं एक वर्ष आधीच त्याने एका फिल्ममध्ये छोटी झलक दाखवली होतीच. मिकी माउससोबत २४ सिनेमा केल्यानंतर त्याने १९३७ पासून साधारण ६० सिनेमांत हिरो म्हणून काम केलं. आणि पुन्हा एका गॅपनंतर १९९० साली नव्याने पदार्पण केले. आत्तापर्यंत त्याचे पाच सिनेमे अकॅडमी अवॉर्डसाठी नामांकित झाले. आणि एकाला अवॉर्ड मिळालंदेखील, आणि तेही एकही डायलॉग न म्हणता! ९० वर्षांच्या काळात प्लूटो खूप आधी एक वाक्य बोलला. त्यानंतर त्याला कुणी एकही डायलॉग दिलाच नाही, अर्थात प्लूटो कुत्रा असल्याने फक्त भुंकायचा, बोलायचा काही नाहीच. (आता यापुढे आपण शाळेच्या नाटकात डायलॉग मिळाला नाही तरी वैतागून जायचं नाही.) तो जे काही व्यक्त करायचा ते शरीराने, खऱ्या कुत्र्यासारखा! त्याची धडपड, धावाधाव, घाबरून भुंकणे आपल्याला जामच हसवतं. याची शेपूट आणि कानही भन्नाट होते.

खऱ्या कुत्र्याचे असे चमत्कारिक कान नसतात, हे आपल्याला माहित्येय म्हणूनच प्लूटो वेगळा वाटतो. वास्तविक ब्लडहाउंड या मिश्रजातीचे (मिक्स ब्रीड) कुत्रे असे नसतात. चित्रात दिसणारा ब्लड हाउंड पहा. त्याचे नाव आणि नजर पाहून घाम फुटावा. पण प्लूटो दिसायला तसा नाही.

चित्रकाराने कार्टून करताना काय बदल केलेत त्यात?

सर्वात पहिलं म्हणजे रंग बदलला, केस अगदीच काढून टाकले. त्याची चेहऱ्यावर लोंबणारी त्वचा थोडी टाइट केली. त्यामुळे चेहरा सॉफ्ट व क्यूट दिसू लागलाय. त्याचे डोळे आणखी मोठ्ठे केले. पांढऱ्यावर काळे बुबुळ अगदी माणसासारखे.. भाव व्यक्त करणारे!

बरेचदा प्लूटो संकटात स्वत:च सापडतो किंवा कोणा ना कोणावर उखडलेलाच असतो. जणू त्याच्या खोडय़ा काढण्यासाठीच जग टपलेले आहे. नवीन प्राण्यांशी तो अजिबात जुळवून घेत नाही. आणि मग शेवटी त्याची त्याच प्राण्याबरोबर घट्ट मत्रीही होते. पण आधीच मत्री करायचं शहाणपण त्यात नाही.

पाळीव कुत्रे असेच तर असतात. फक्त मालकाशीच नीट वागतात, बाकीच्यांवर यथेच्छ भुंकतात.

chitrapatang@gmail.com