घनदाट जंगलातून एका दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत अनेक जलचर प्राणी राहत होते. त्यांच्यावर मगर राज्य करत होती. आपल्या जलचर प्रजेचे पालन ती अतिशय काळजीपूर्वक करीत असे. एकूण काय! प्रजा आनंदात होती.
पाऊस कमी झाल्याने खळाळून वाहणारी ही नदी हळूहळू कोरडी पडू लागली. नदी पूर्ण आटण्याच्या आत आपले बस्तान दुसरीकडे कसे हलवायचे, याचा मगर विचार करू लागली. तिने एका पाणमांजराला त्या कामगिरीवर पाठवले. त्याने आपले काम अचूक पार पाडले.
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ज्या नदीकाठी होत्या ती नदी खोल आणि वाहती असल्याचे पाणमांजराने मगरीच्या कानावर घातले. तिने सर्व जलचर सहकाऱ्यांची सभा बोलावली. जंगलचा राजा सिंह याला भेटून आपली अडचण कशी सांगायची यावर सभेत विचारविनिमय झाला.
‘‘पावसाचा ऋतू कोरडा गेल्याने येथील गवताळ प्रदेश सुकून गेला आहे. त्यामुळे इथून दुसऱ्या नदीपर्यंतचा आपला प्रवास अतिशय खडतर आणि धोकादायक आहे. त्यामुळे आपल्याला विचारपूर्वक, शांततेने पुढील पावले उचलावी लागतील. जंगलातील इतर प्राण्यांची मदत घ्यायची असेल तर आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. नाहीतर आपला मृत्यू निश्चित आहे.’’ मगरीने सर्वाना कल्पना दिली.
सर्वसंमतीने मगरीने शांतता करारपत्र तयार केले. सुसर आणि कासव यांची दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सिंहापुढे ते करारपत्र सादर केले.
सिंहाने सल्लामसलतीसाठी काही प्राण्यांना मगर राहत असलेल्या नदीजवळ पाचारण केले. जंगलचा राजा भेटायला येत आहे हे कळल्यावर मगरीने कासवाला आज्ञा केली, ‘‘आपण मेजवानीचा खास बेत करू या. सर्वजण खूश झाले पाहिजेत. फक्कड आणि चविष्ट जेवण बनवा.’’
मगर, कासव, सुसर आणि पाणमांजर आणि सिंह, कोल्हा, लांडगा आणि माकड ह्यांची भेट झाली. मगर या भेटीने अतिशय खूश झाली आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. प्रेमभराने तिने सर्वाना खाऊ घातले.
जेवण झाल्यावर तिने आपले म्हणणे सिंहापुढे मांडायला सुरुवात केली. ‘‘मला सर्व प्राणीमित्रांमध्ये शांतता हवी आहे. आपण सर्वानी एकमेकांना मदत करायला हवी. आपल्यामध्ये एकजूट व्हायला हवी. नाहीतर शेतकरी आपल्याला संपवून टाकतील. शेतकऱ्यांनी शेताला पाणी देण्यासाठी पंप बसवले आहेत. त्यामुळे पाणी दिवसागणिक कमी होत आहे. याशिवाय तिथे राहणारे हत्ती पाण्याची नासाडी करतात. त्यांचाही बंदोबस्त करायला हवा. पाण्याअभावी सर्वाचेच जीवन धोक्यात येईल. विशेषत: जलचरांचे.’’
प्राण्यांमधे शांतता राहिल्यास आपलीच प्रतिष्ठा उंचावणार आहे याची सिंहाला जाणीव असल्याने तो या करारास उत्सुक होता.
‘‘त्यामुळे आपला काय फायदा होणार?’’ कोल्ह्याने त्याची शंका व्यक्त केली.
‘‘शांतता दोघांच्याही फायद्याची आहे. कोणी कोणालाही इजा करणार नाही. त्यामुळे सर्वाना सुखाने, बिनधोकपणे पाणी पिता येईल.’’ मगरीने तिची बाजू मांडली. यावर सिंह आणि कोल्हा आपसात कुजबुजले.
‘‘तुझे वचन हा या कराराचा भाग असेल ना?’’ सिंहाने विचारले.
‘‘मी तुम्हाला शब्द देते.’’ मगर म्हणाली.
ते पाहून माकड गहिवरले. ‘‘हा करार चांगला आणि योग्य आहे. एकमेकांसाठी समस्या निर्माण करण्याऐवजी सर्वानी समजुतीने घेऊ या. गरसमज टाळण्यासाठी हे करारात नमूद करू म्हणजे झाले.’’ माकडाने या करारासाठी संमती दर्शवली.
कोल्ह्याला हे पटत नव्हते. पण नुकत्याच फस्त केलेल्या मेजवानीच्या नादात तो होकार देऊन बसला.
सिंह एकीकडे आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला काळजीपूर्वक ऐकत होता आणि दुसरीकडे त्याला मगरीच्या अश्रूतून व्याकुळता जाणवत होती. अखेरीस जलचर प्राण्यांना मदत करण्याचे त्याने मान्य केले.
मध्यरात्री स्थलांतर करण्याचे ठरले. मगरीने आपल्या प्रजेला तयारीच्या सूचना दिल्या.
तर सिंहाने सर्व प्राण्यांचे भक्कम संरक्षक दल उभे करण्याची सूचना दिली. सिंह आणि कोल्हा यांनी नेतृत्व करावे असे ठरले.
‘‘माझा मगरीच्या शब्दांवर विश्वास नाही. तुम्ही नदीजवळ पोहोचेपर्यंत मी लक्ष ठेवीन. पण तेथे न थांबता मी पुढे जाईन,’’ कोल्हा सावध होऊन म्हणाला.
सिंहाची अशी आखणी चालू होती, तर तिकडे मगरीने सापाला जवळ बोलावून सांगितले, ‘‘सिंह आणि त्याची कंपनी शेतकऱ्याच्या हातात सापडले तर आपल्या फायद्याचे ठरेल. आम्ही नदीपर्यंत सुखरूप पोहोचलो की मी आरोळी ठोकेन. ती ऐकल्यावर तू लगेच शेतकऱ्याच्या कुत्र्यांना उठव.’’ सापाने मान डोलावली.
रस्ता अनोळखी असूनही शेताचा भाग पार करून सर्वजण नदीपर्यंत पोहोचले. एकेक करून पाण्यात शिरले. ‘‘तुझे आभार मानण्यासाठी आणि आपल्या सर्वाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मला ओरडावेसे वाटत आहे.’’ मगरीने पुन्हा साश्रू नयनांनी सिंहाजवळ आपली कृतज्ञता व्यक्त केली.
ठरल्याप्रमाणे आरोळी ऐकताच सापाने कुत्र्यांना जागे करण्याचे काम चोखपणे पार पाडले. सिंह मगरीचा निरोप घेणार एवढय़ातच त्याला बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू आला. त्याच्या संरक्षक दलातील अनेक प्राण्यांना गोळ्या लागल्या. बाकीचे वेगाने पळून गेले.
सिंहाने मागे वळून पाहिले तर मगर पाण्यात शिरलेली होती. नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेला कोल्हा सिंहाला म्हणाला, ‘‘मला हीच भीती होती. पाणी प्यायला गेल्यावर प्राण्यांना खाणाऱ्या या मगरीने आपल्याला हातोहात फसवले.’’
‘‘तू म्हणत होतास तेच बरोबर होते. यापुढे मगरीच्या सहानुभूती आणि अश्रूंवर कोणीच विश्वास ठेवणार नाही.’’ सिंह म्हणाला.
अशी ही नक्राश्रूंची कहाणी.
-मनाली रानडे
(दक्षिण आफ्रिकेतील लोककथेवर आधारित)