एक सुंदर बाग होती, रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली. हिरवा, गुलाबी, लाल, पिवळा, जांभळा, निळा अशा कित्तीतरी रंगांमुळे विविधरंगी शेला पांघरल्यागत ती बाग वर्षभर फुललेली असायची. अनेक प्रकारचे पक्षी आणि छान छान फुलपाखरांमुळे ती बाग अधिकच सुंदर दिसायची.
बागेच्या मध्यभागी एक मोठ्ठं तळं होतं. तळ्यातलं पाणी अगदी नितळ होतं. हंस, बदकं, बगळे असे कित्तीतरी पक्षी अगदी स्वच्छंदपणे त्या तळ्यांत विहार करायचे. दरवर्षी त्या तळ्याच्या काठाला, बरोब्बर गोलाकार करून, एका विशिष्ट प्रकारची फुलं फुलायची- पांढरी शुभ्र फुलं आणि त्यांवर सुबक चंदेरी ठिपके! ती फुलं फक्त पावसाळ्यात फुलायची पण फुलली की चांगली आठ-आठ दिवस एकदम टवटवीत राहायची. ती उमलली की त्यांचा सुगंध साऱ्या आसमंतात दरवळायचा. दिवसा त्या फुलांना पाहिलं की, वाटायचं त्या तळ्याभोवती बर्फाने शुभ्र शेला पांघरला आहे. सूर्याची किरणं पडली की, ती फुलं एकदम उजळून निघायची आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशात त्या फुलांच्या पाकळ्यांवरचे चंदेरी ठिपके चमकू लागायचे. असं भासायचं, जणू आकाशातले तारेच जमिनीवर उतरले आहेत.
काही दिवसांतच या फुलांच्या सौंदर्याची ख्याती इतकी दूर दूर पसरली की, लोक या अनोख्या फुलांचा बहर पाहायला एकच झुंबड करून तिथे येऊ लागली. सगळीकडूनच आपल्या सौंदर्याचं इतकं कौतुक झाल्यामुळे, ही फुलं स्वत:वर खूपच खूश झाली. आपण इतर फुलांपेक्षा निश्चितच काही तरी वेगळे आहोत, हे त्यांना जाणवू लागलं. तळ्यातल्या नितळ पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाला ही फुलं दिवसभर न्याहाळत बसायची. हळूहळू त्यांच्या या सौंदर्याचा, सगळ्यांकडून झालेल्या कौतुकाचा त्यांना गर्व चढू लागला. इतर फुलांशीही ती आता नाक वर करून वागू लागली, त्यांना तुच्छ समजू लागली. एखादा पक्षी किंवा प्राणी तळ्यातलं पाणी प्यायला आला की ती खूप चिडायची. इतकंच नाही, तर फुलपाखरांनाही हटकून लावायची. त्यामुळे बागेतल्या सगळ्यांनाच त्यांचा फार राग येऊ लागला होता.
असंच एक दिवस त्यांचं मोहक सौंदर्य पाहायला आलेल्या लोकांची खूपच गर्दी जमली होती. सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव सुरू होता. त्यामुळे फुलं अगदी खुशीत होती. इतक्यात, अचानकपणे पावसाळी ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सुरूझाला. त्यांत विजा कडाडू लागल्या. विजांच्या आवाजामुळे मुलं घाबरली. लोक पटापटा आडोसा शोधू लागले. खूप लांबून आलेले लोक पाऊस आल्यामुळे एकदम निराश झाली. सगळ्यांचाच विरस झाला. पांढरी फुलं तर संतापलीच.
‘‘काय रे, तुम्हाला आत्ताच यायला हवं होतं का?’’ ती काळ्या ढगांना चिडून म्हणाली.
‘‘अरे, म्हणजे काय? आम्ही बरसणारच नं?’’ काळे ढग आश्चर्याने त्यांना म्हणाले.
‘‘शी! सगळा खेळ बिघडवलात तुम्ही असं अवेळी येऊन. आत्तापर्यंत तुमच्यापैकी कुणीच नव्हतं आकाशात. एकदम कुठून आलात?’’ फुलं वैतागली.
‘‘असं का म्हणताय तुम्ही?’’ ढग तळमळून म्हणाले.
‘‘जाऊ दे ना! तुम्हाला नाही समजणार. तुम्ही जळता आमच्या सौंदर्यावर. आमचं कौतुक बघवत नाही तुम्हाला, हेच खरं!’’ ढगांबरोबर आलेल्या सळसळणाऱ्या वाऱ्याने हे संभाषण ऐकलं. तो थांबला आणि फुलांना म्हणाला, ‘‘तुम्हाला म्हणायचंय की या जगात तुम्हीच सुंदर आहात का? या ढगांची किंवा इतर कुणाची काहीच किंमत नाही?’’
‘‘तर! आम्ही सुंदर आहोत, पांढरे शुभ्र आहोत. आमच्या पाकळ्यांवर कित्ती मोहक चंदेरी ठिपके आहेत. या ढगांसारखे नाही, काळेकुट्ट कुठले! त्यांना ना सौंदर्य ना रूप! आणि तू? तुला तर मुळी रंगच नाही. तू तर कुणाला दिसतसुद्धा नाहीस.’’ हे ऐकून ढगांना खूप वाईट वाटलं. त्यांच्यामुळे वाऱ्याचाही अपमान झाला होता. ते वाऱ्याला शांत करू लागले. पण वारा कसला गप्प बसायला?
‘‘तुम्ही दर वर्षी फक्त पावसाळ्यातच उमलता. तुमचं अस्तित्व हे मुळात पावसाच्या येण्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही हेच विसरताय. इतके कृतघ्न नका होऊ!’’ वारा ठणकावून फुलांना म्हणाला. पण फुलं काही वाऱ्याचं म्हणणं ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. शेवटी वाऱ्यानेही त्यांचा नाद सोडून दिला आणि शांत झाला. शहाणे ढग तर त्या वादात मुळी अडकलेच नाहीत. ते त्यांचं काम करून बरसून निघून गेले.
दोन-तीन दिवसांनी पुन्हा काळ्या ढगांनी आकाशात दाटी करायला सुरुवात केली. ते बरसणार इतक्यात पांढरे ढग तिथे लगबगीने आले.
‘‘अरे वेडय़ांनो, त्या पांढऱ्या फुलांबरोबर झालेलं भांडण इतक्यात विसरलात?’’ ते काळ्या ढगांना म्हणाले.
‘‘जाऊ दे नं. झालं ते झालं. कुठे भांडण करायचं?’’ एक काळा ढग म्हणाला.
‘‘म्हणजे काय? तुमचा मान तुम्हीच नको का ठेवायला?’’ पांढरा ढग चिडून म्हणाला.
‘‘म्हणून इतरांना का त्रास द्यायचा? आपण आपलं काम निमूटपणे करावं.’’ आणखी एक काळा ढग म्हणाला.
‘‘आम्ही कुठे तसं म्हणतोय? आमचं म्हणणं इतकंच आहे, की तुम्ही फक्त त्या बागेच्या भागात बरसू नका. आपल्या रंगावर, सौंदर्यावर इतका गर्व करणाऱ्या त्या पांढऱ्या फुलांना चांगलीच अद्दल घडवू या आपण!’’
‘‘अरे, पण म्हणून बागेतील इतर फुलंही कोमेजून जातील त्याचं काय?’’ न राहवून पहिला ढग पुढे म्हणाला.
‘‘अरे बाबांनो, ठाऊक आहे ते! पण त्या पांढऱ्या फुलांच्या गर्विष्ठपणामुळे बागेतले सगळेच वैतागले आहेत. त्यामुळे आपण त्यांना आपली ही कल्पना व्यवस्थित समजावू.’’ पांढऱ्या ढगांनी त्यांची कल्पना काळ्या ढगांना पटवून दिली. एव्हाना वाराही तिथे आला होता. वाऱ्यालाही कल्पना एकदम आवडली. त्याने ती फुलपाखरांना सांगितली. फुलपाखरांनी बागेतल्या सगळ्या मंडळींपर्यंत ही कल्पना पोहोचवली. सगळे तयार झाले, कारण थोडय़ाच दिवसांचा प्रश्न होता. मदत करणारे इतके मित्र मिळाल्यामुळे काळे ढग खूश झाले. त्यांनी आनंदाने एकमेकांना टाळी दिली, तशी वीज एकदम कडकडली..
ठरल्याप्रमाणे आता काळ्या ढगांनी त्या गर्विष्ठ पांढऱ्या फुलांना चांगलीच हूल द्यायला सुरुवात केली. ते दाटून आल्यासारखा भास निर्माण करायचे आणि वारा त्यांना दूर ढकलून लावायचा. लगेच तिथे पांढरे ढग जमा व्हायचे. असा खेळ काही दिवस सुरूराहिला आणि पाऊस काही पडलाच नाही.
इतके दिवस पाऊस न पडल्यामुळे सगळीकडे आता रखरखीतपणा जाणवत होता. उन्हं तापलेली होती. जमिनीतून अंकुरलेल्या पांढऱ्या फुलांची नवी पालवी, कळ्या हळूहळू वाळू लागल्या. काही ठिकाणी पूर्वीच उमललेली पांढरी फुलं पावसाअभावी कोमेजू लागली. तळं आणि संपूर्ण बागच आता निर्जीव दिसत होती. पांढऱ्या फुलांचं सौंदर्य पाहायला जमलेल्या लोकांची गर्दीही ओसरू लागली. पांढऱ्या फुलांचा जीव कासावीस व्हायला लागला.
‘‘या पावसाला झालंय तरी काय? हे पांढरे ढग काही केल्या जातच नाहीयेत.’’ ती आता एकमेकांत चर्चा करू लागली. इतक्यात वारा वाहू लागला.
‘‘हा वाराच त्या पावसाच्या ढगांना साचू देत नाहीये आभाळात,’’ त्यांच्यातलं एक फूल कुरकुरलं. हे ऐकून वारा एकदम थांबला. तो चिडून त्यांना म्हणाला, ‘‘काय रे! तुम्हालाच नको होता नं पाऊस? त्या बिचाऱ्या काळ्या ढगांना त्यांच्या रंगावरून किती हिणवलंत तुम्ही! तरी ते तुमचं नुकसान होऊ देत नव्हते. मग मी आणि पांढऱ्या ढगांनी मिळून ही युक्ती शोधली तुम्हाला धडा शिकवण्यासाठी. सांगा नं, आता का हवाय तुम्हाला पाऊस?’’ यावर फुलं काहीच बोलली नाहीत.
‘‘अरे, एरव्ही आपल्याला निरभ्र आकाश, पांढरे ढग छान वाटतात. पण पावसाळ्यात आपल्याला तसंच आभाळ बघवतं का? नाही नं? तेव्हा या काळ्या ढगांचं एक विशेष सौंदर्य आपल्याला जाणवतं. आणि याच काळ्या ढगांवर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा त्यांच्या कडांना आलेली चंदेरी झालर तर किती आकर्षक दिसते! आणि तुम्ही कुठे काळा रंग आणि पांढरा रंग घेऊन बसलात?’’ वारा पांढऱ्या फुलांना समजावत म्हणाला.
‘‘हे पहा, प्रत्येक रंगाचं महत्त्व असतं. पांढरा, काळा, निळा, लाल, पिवळा, हिरवा हे रंग देवाने घडवलेले आहेत म्हणूनच निसर्ग इतका वैविध्यपूर्ण दिसतो. इंद्रधनुष्यात सात रंग आहेत. ते फक्त पांढरं असतं तर? दिसलं असतं का इतकं सुंदर? झाडांची पानं पांढरी असती तर कशी दिसली असती? आणि मुळात पांढरा रंगसुद्धा लाल, निळ्या आणि हिरव्या रंगांपासून बनला आहे.’’ पांढऱ्या फुलांना आता त्यांच्या भांडणाची आणि कोत्या विचारांची लाज वाटू लागली. कोमेजल्यामुळे त्यांची मान अधिकच खाली झाली.
वारा पुढे म्हणाला, ‘‘तुम्ही इतके त्या ढगांना बोललात, तरी ते सगळा अपमान विसरून बरसणार होते. आम्हीच त्यांना अडवलं. पाहा, त्यांचं मन किती निर्मळ आहे ते! आणि तुम्ही त्यांचा रंग घेऊन बसलात? मित्रांनो, कुणाचंही बाह्य़ रूप मुळीच महत्त्वाचं नसतं. ते देवाने आपल्याला दिलेलं असतं. मनाचं सौंदर्य हेच खरं महत्त्वाचं! कारण ते आपण आपल्या वागण्याने घडवत असतो.’’ पांढऱ्या फुलांना वाऱ्याचं म्हणणं एकदम पटलं. मग वाऱ्यानेही फार ताणून नाही धरलं. त्याने काळ्या ढगांना बोलावून आणलं. पांढऱ्या फुलांनी मग काळ्या ढगांची मनापासून माफी मागितली. काळ्या ढगांनीही सगळं विसरून आनंदाने दाटी केली आणि छान बरसू लागले. कोमेजलेली फुलं पुन्हा तरारली. कळ्याही उमलू लागल्या.
काही दिवसांतच रूक्ष झालेली बाग रंगीबेरंगी फुलांनी पुन्हा बहरली. तळंही आता नव्या उमललेल्या पांढऱ्या फुलांमुळे आकर्षक दिसू लागलं. वाऱ्याची मंद झुळूक आल्यावर सारीच फुलं छान डोलू लागली आणि हळूहळू लोकांची गर्दी पुन्हा वाढू लागली..
mokashiprachi@gmail.com