मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा
भरपूर पाऊस पडला. सुकलेले तलाव थोडे पाण्याने भरले. इतके दिवस तलावातल्या चिखलात दडी मारून बसलेल्या कासवाला जाग आली. गरमीमुळे एवढे दिवस ते बाहेर आले नव्हते. अगदी ध्यान लावूनच बसले होते. पण पाऊस पडला, तलावात पाणी साचले तसे ते बाहेर आले. आनंदाने पाण्यावर तरंगू लागले. मग खराच पावसाळा सुरू झाला. दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस झाला नि विहिरी, तलाव पूर्ण भरले. कासवाला अजूनच आनंद झाला. आजुबाजूचे शेवाळ, छोटे – छोटे झिंगे खाऊन मन तृप्त झाले.
पण हळूहळू त्याला त्याचाही कंटाळा येऊ लागला. सारखे सारखे पाण्यावर तरंगूनसुद्धा दमायला व्हायला लागले. सगळीकडे पाणी असल्यामुळे, जरा कुठे टेकायला जागा नव्हती.
सकाळी उन्हे वर आली नि कासव उठले. पाय सटासट मारत, तरंगत ते पाण्याच्या पृष्ठभागावर आले. हळूच मान वर करून इथे तिथे डोकावले. कोणी आपल्याला पाहत नाही ना याची खात्री केली. परत आपली मान कवचातून काढून पाहिले, तर त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पाणी एवढे वर आले होते की कासव सहजपणे पाण्यातून जमिनीवर जाऊ शकत होते.
‘चला, म्हणजे आपल्याला आता थोडे फिरता येईल.’ कासवाने विचार केला. दिवसा जाण्यात काही अर्थ नव्हता. कोणीतरी पकडेल याची भीती होती. म्हणून रात्री बाहेर पडायचे असे ठरवून कासव पुन्हा पाण्यात गेले.
संध्याकाळ झाली. सगळीकडे हळूहळू अंधार पसरू लागला. तसे कासव परत पाण्यावर तरंगू लागले. आजुबाजूला फिरणारे दुसरे छोटे मासे त्याच्या अंगावरून लपाछपी खेळत होते. पण त्याकडेही त्याचे लक्ष नव्हते. टिपूर चांदणे पडले होते. सगळीकडे शांत – शांत होते. कासव तलावाच्या कडेला आले. आपल्या नखांनी जमिनीत घट्ट पाय रोवले आणि आपली मान वर उलटी रोवून, सर्व भार त्यावर टाकून आपले पूर्ण अंग त्याने उलटे फिरविले आणि ते पाण्याच्या बाहेर आले.
‘हुश् ऽऽ आलो एकदाचे बाहेर..’ कासवाने नि:श्वास सोडला. बाहेर जमिनीवर येताच त्याला खूप आनंद झाला. ते भरभर चालू लागले. कुठे चांगली जमीन होती, तर कुठे पाण्याचे ओहोळ वाहत होते, तर काही ठिकाणी चिखलच होता. पण तरीही कासवाला मजा येत होती. ते पुढे पुढे चालत होते.
काही वेळाने ते एका ठिकाणी पोहचले, तर तेथे त्याचे पाय चालताना थोडे घसरू लागले. पाहिले तर खाली लादी लावलेले अंगण होते.
‘अरे, आपण कोठे आलो? हे तर कोणाचे तरी घर आहे वाटते! अरे बापरे! तेथे कोणीतरी आहे वाटते.’
कासव त्यांना पाहून घाबरले. पटकन् कुठे लपता येते की काय हे पाहू लागले. पण तेवढय़ात बाबांनी कासवाला पाहिले. त्याचे असे झाले, बाबांना रोज रात्री जेवणानंतर शतपावली करायची सवय आहे. त्यासाठीच ते बाहेर अंगणात आले होते. पाहतो तर काय त्यांच्याकडे कासव आले होते.
‘‘अरे राहुल.. चिंगे.. बाहेर या.. बघा आपल्याकडे कोण आले आहे ते!’’ बाबांनी आवाज दिला.
‘‘कोण आहे बाबा?’’ एवढय़ा रात्री कोण आले हे पाहायला सगळेच बाहेर आले. तोपर्यंत बाबांनी कासवाला उचलून वऱ्हांडय़ात आणले होते.
‘‘अरे व्वा! किती मज्जा! आता आपल्याला कासवाशी खेळता येईल.. हो ना रे दादा?’’ चिंगी नाचत म्हणाली.
‘‘हो ना! माझ्या मित्रांनाही मी दाखवेन..’’ राहुल म्हणाला.
‘‘अरे थांबा.. थांबा.. जरा धीर धरा.. हे पाहा आपण कासवाला आपल्या घरी वगैरे ठेवणार नाही.’’ बाबांनी सांगितले.
‘‘पण का बाबा?’’ राहुल नाराज झाला.
‘‘अरे, ते चुकून येथे आले आहे. त्यांना तलावात किंवा मातीवर राहायची सवय असते. घरात त्याला त्रासच होईल.’’ बाबांनी मुलांना समजावले.
‘‘खरे म्हणजे कासव घरात येणे काहीजण शुभशकुन मानतात, माहीत आहे का तुम्हाला!’’ एवढय़ा वेळाने आजी म्हणाली.
‘‘का गं आजी?’’ चिंगीने विचारले.
‘‘अगं भगवान विष्णूचा अवतार होता ना ते. पृथ्वी आपल्या पाठीवर घेतलेले चित्र पाहिले आहे ना तू?’’ आजींनी माहिती दिली.
‘‘हो ऽऽ हो खरंच की गं आजी!’’ चिंगी चिवचिवली.
‘‘पण मग आता काय करायचे?’’ राहुलला प्रश्न पडला.
त्यांच्या गप्पा चालल्या होत्या त्यावेळेस कासव सारखे पळून जायचा प्रयत्न करत होते. पण बाबा परत त्याला उचलून घेत होते. त्यांनी उचलले की ते आपली मान आणि पाय आपल्या कवचाच्या आत ओढून घेत असे आणि खाली ठेवले की हळूच डोके बाहेर काढी अन् चटकन वळून चटचट चालायला लागे. राहुल आणि चिंगीला त्याची मजा वाटत होती. पण कासवाला मात्र कधी एकदा येथून जातो असे झाले होते.
‘‘चला, आता खूप रात्र झाली आहे. झोपायला पळा सगळे.’’ बाबांनी ऑर्डर दिली.
‘‘पण हे कासव..?’’ राहुल पुटपुटला.
‘‘आज रात्री त्याला आपण घरात ठेवू आणि उद्या सोडून देऊ.’’ बाबा म्हणाले. बाबांनी एका मोठय़ा टबमध्ये पाणी भरले नि कासवाला त्यात सोडले.
‘‘त्याला भूक लागली असेल ना बाबा? खायला काय द्यायचे त्याला?’’ चिंगीला प्रश्न पडला.
‘‘थांब हं मी गाजर आणते. भाजी खातात वाटते ते.’’ आईने गाजर आणून त्याच्या समोर ठेवले. नंतर सगळ्यांनाच बाबांनी झोपायला पिटाळले.
ते सगळे गेल्यावर कासव परत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. पण टबच्या बाहेर ते येऊ शकले नाही. त्याला खूप वाईट वाटले. कुठून आपल्याला फिरायची बुद्धी झाली असे त्याला वाटू लागले. आता ही मुले आपले काय करतील त्याची भीती वाटू लागली. तलावातल्या सगळ्यांची आठवण येऊ लागली.
सकाळ झाली तसे सगळे उठून पहिले कासवाला पाहायलाच आले. त्यांची चाहूल लागली तसे कासव परत आपले पाय आणि मान कवचाच्या आत घेऊन निपचित पडून राहिले. त्याला तसे पाहून सगळ्यांनाच काळजी वाटू लागली. रात्री आईने दिलेले गाजरही तसेच पडून होते.
‘‘बघितले मुलांनो, कासवाला येथे राहायला आवडत नाही.’’ बाबा म्हणाले.
‘‘मग आता काय करायचे बाबा?’’ राहुलने विचारले.
‘‘चला माझ्याबरोबर..’’ बाबांनी कासव आपल्या हातात घेतले आणि ते निघाले. त्यांच्या मागोमाग राहुल आणि चिंगीही निघाले. त्यांच्या घरापासून दोन घरे आणखी सोडली की एक छोटा तलाव होता. बाबा त्यांना तेथे घेऊन गेले. आणि हळूच कासवाला त्या तलावाकाठी सोडून दिले.
‘‘शू ऽऽ आता गंमत बघा हं त्याची..’’ बाबा म्हणाले.
कासवाला जाणवले की आपण जमिनीवर आलो आहोत. त्याने परत हळूच आपली मान बाहेर काढली. सगळीकडे शांत होते. त्याने समोर पाहिले आणि ते खूप खूश झाले. समोर त्याचा तलाव होता! त्याने आजूबाजूला पाहिले. भरभर चालत ते तलावाजवळ गेले आणि पटकन् उडी घेतली. एक सूर मारून ते खाली पाण्यात दिसेनासे झाले. सभोवताली पाणीच पाणी होते आणि त्याचे तलावातले दोस्त! त्याने परत एकदा नि:श्वास सोडला.’
‘‘हुश ऽऽ आलो बाबा एकदाचे आपल्या घरी.’’ आणि त्याचा छोटय़ा माशांबरोबर परत लपाछपीचा डाव सुरू झाला.