आभाळ भरून आलेलं. काळ्याकुट्ट हत्तींसारखे ढग सरावैरा पळत होते. ओलसर वाऱ्यासोबत मातीचा वास आणि धूळ, कचरा घेऊन भिरभिरत होता. मोहल्ल्यात आता सगळीकडे कचरा साचला होता. घराबाहेर असलेलं सामान पटापट आत घेण्याची ज्याची त्याची घाई चालली होती. वाळायला घातलेले कपडे, रजया सगळं आत गेलं. दारं लावून मोहल्ला क्षणात सूनसान झाला.

शबानाने लगबगीने सगळं आत घेतलं. तिने सामान आत घेतलं आणि मेढीला टेकून एक खोल श्वास घेतला. दोन्ही हातांनी विस्कटलेले केस मागे घेत तिने दुपट्टा डोक्यावर घेतला. तिची नजर राहून राहून वरच्या पत्र्याकडे जात होती. पत्रा काही ठिकाणी गंजला होता. त्याला भोकं पडली होती. त्यातून पाणी आत येणार या काळजीने तिचा जीव कासावीस होत होता. पण हताश होण्यापलीकडे तिच्या हातात काही नव्हतं.

इतक्यात शबानाचा नवरा मेहमूद आत आला. ‘‘अजी, सुनते क्या? पत्र्याचं काहीतरी करावं लागेल. बरसातकाला सुरू हुइंगा. घर गलने लग्या तो क्या करने का?’’

मेहमूदने एकदा शाबानाकडे आणि एकदा पत्र्याकडे पाहून घेतलं. ‘‘देिखगे. करींगे कुछ तो..’’ असं म्हणून तो निघून गेला.

वाऱ्याचा वेग वाढला तसा शबानाने पेटीतला एक मोठा प्लास्टिकचा कागद काढला. लाकडी शिडीवरून छतावर गेली. पूर्ण पत्रा झाकला जाईल एवढा कागद नव्हता. तरीही जिथं पत्रा कुजला व तुटला होता तिथं तिने तो पसरला. त्यावर कुंबीवरचे दगड ठेवून दिले. ती खाली आली. तोवर रेश्मा आणि रेहाना घरात आल्या.

‘‘छोऱ्यांनो, खाना खा के लेव. बरसात सुरू हुई तो खाने न आईंगा,’’ असं म्हणत तिने मुलींना जेवायला वाढलं. पावसाचं पाणी घरात शिरलं तर पोरी जेवणार कशा? तिच्या मनाला काळजी लागली होती. पोरी जेवल्या. गडगडाट करत पावसाला सुरुवात झाली. पोरी नाचायला लागल्या. गाणी गायला लागल्या. घर थोडं गळत होतं. गळत होतं तिथं तांब्या, पातीलं, परात असं काहीबाही ठेवून शबाना बाहेरच्या पावसाकडे बघत बसली. दोन-तीन दिवस सतत पाऊस सुरू होता. उघडीप मिळाली नाही. लोक छत्र्या, रेनकोट घालून काम चालवत होते. शबानाने मागे एका मोठय़ा जाहिरातीचा प्लास्टिकचा कागद पेटीत ठेवलेला. त्यालाच थोडे टाके घालून मुलींना रेनकोट बनवले. त्याने फक्त पाठ आणि डोके झाकले जाई. काडय़ा मोडलेली छत्री असूनही कसल्याच कामाची नव्हती.

शाळा सुरू झालेली. पोरी घरातच होत्या. हाताला काम नाही. घरात पुरेल एवढं अन्न नाही.

‘‘रेश्मे, तू अन् रेहाना इस्कूल को जाव.’’

‘‘आम्मे, मजे न जाने का इस्कूल को,’’ असं म्हणत ती कोपऱ्यात सरकली. पाऊस नसता तर ती तडक बाहेर पडली असती.

‘‘लाडो, इस्कूल मे चावल मिलते. पेटभर खा के डबा भर के लेके आ. समजदार लाडो मेरी. घर मे खाने को अनाज न जादा.’’

रेश्मा काय समजायचं ते समजली. तिने दप्तर शोधलं. रेहानाला पावडर लावली. तिचा हात धरून निघाली.

‘‘आम्मे, बरसात हाय तो कैसा जाऊं?’’

शबानाने घरातच बनवलेले दोन रेनकोट त्यांना दिले. पोरी खूश झाल्या. कुठल्यातरी साबणाची जहिरात होती कागदावर. सगळी गुलाबाची फुलंच फुलं होती त्याच्यावर. चिखलातून वाट काढत पोरी शाळेला निघून गेल्या. रेहानाला चिखलातनं नीट चालता येत नव्हतं. रेश्मा तिला आधार देत देत शाळेत घेऊन गेली. पावसाचा जोर वाढला आणि पत्रा जास्तच गळू लागला. शबाना बेचन झाली. सगळ्या घरभर पाणी साचू लागलं. शबाना पाणी उपसून बाहेर टाकत होती. पण वरून पडणारी धार कशी अडवणार? वरून पाणी पडतच होतं.

तिने अंथरूण-पांघरूण एका कोरडय़ा कोपऱ्यात ठेवून दिलं. तेही थोडं भिजलं होतं.

‘‘आता काय करायचं? बसायचं कुठं? झोपायचं, खायचं कुठं? पोरी आत्ता शाळेतून येतील.’’

शबानाच्या जिवाला घोर लागला होता. चूल पार भिजून गेलेली. सरपण भिजून गेलेलं. तोवर पोरी आल्याच. त्याही जवळजवळ अख्ख्या भिजल्याच  होत्या. रेश्माने घराची हालत नीट पाहून घेतली.

‘‘आम्मे, थोडे चावल खा. मं डबे में लाई तेरे वास्ते.’’

रेश्माने आल्या आल्या शाळेतून आणलेल्या खिचडीचा डबा अम्मीच्या समोर धरला. शबानाने आत्तापर्यंत डोळ्यांत थांबवून ठेवलेलं पाणी आता डोळ्यांच्या कडा ओलांडून वाहू लागलं. तिने रेश्मा आणि रेहानाला जवळ ओढलं आणि त्यांच्या भिजलेल्या केसांचे, गालांचे पटापट मुके घेऊ लागली. पोरीही अम्मीला बिलगल्या.

घरात पाणी साचलेलं. पण पोरी खूश होत्या. वहीची पानं फाडून त्यांनी होडय़ा बनवायला घेतल्या. इतक्यात पत्र्यावर कसलासा आवाज होऊ लागला. पत्रा पडतो की काय असं शबानाला वाटलं. मुली घाबरून अम्मीला बिलगल्या. पत्र्यावर पायांचा आवाज होत होता. शबानाने ओळखलं. मेहमूद काहीतरी करत होता. पत्रा गळायचा बंद झाला.

थोडय़ाच वेळात त्यांचे अब्बू घरात आले. अंगावरून पाणी निथळत होतं.

‘‘क्या करे?’’ शबानाने विचारलं.

‘‘एक बडा बॅनर का कपडा मिला. पत्र्यावर झाकून टाकला. आता पाणी नाही येणार आत.’’

शबाना मनापासून हसली. पोरीही नाचायला लागल्या. आता त्यांच्या होडय़ा भिजणार नव्हत्या.

रेहाना शाळेत शिकवलेलं गाणं नाचून म्हणत होती..

‘‘येरे येरे पावसा,

तुझे देती पसा

पसा हुआ खोटा,

पाऊस आया मोटा..’’

रेश्माही तिच्यासोबत नाचू लागली. बाहेर पाऊस पडतच होता. शबाना आणि मेहमूद आपल्या मुलींकडे कौतुकाने पाहत होते.

farukskazi82@gmail.com