पायाच्या तळव्याला गुदगुल्या झाल्या नि चिनू वैतागलीच. ‘‘दादा, चूप रे, उठणारेय मी,’’ म्हणत तिने पांघरूण पार डोक्यावर ओढलं. तर परत पायाशी काही हुळहुळलं. दादाला पकडायचं म्हणून झोपेचं सोंग घेत पांघरुणातून ती हळूच डोकावली आणि गुदगुल्यांसाठी कारणीभूत असणारी गोष्ट पाहून तिने तोंडात बोटंच घातली. चक्क तिचं दप्तर तिच्या तळपायाला गुदगुल्या करून तिला उठवत होतं. चिनूची पार त्रेधा उडाली. ‘‘आं..’’ असा वेडावाकडा उद्गार काढत चिनू ताडकन् उठून बसली. ‘‘बरं झालं बाई चिनू तू उठलीस. लक्षात आहे ना आता शाळा सुरू होणारेय. मला फार कंटाळा आलाय. लवकर उठ बरं मला तयार कर.’’ बोलणारं दप्तर पाहून चिनू मूच्र्छित पडायचीच बाकी राहिली. ‘‘ए, ए, मीच आहे. घाबरू नको. माझ्याकडे बघ तर खरं.’’ चिनूचं धाबं दणाणलेलं पाहून तिला धीर देण्यासाठी जागच्या जागी हावभाव करत तिचं दप्तर तिचं लक्ष स्वत:कडे वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतं. ‘‘जाम कंटाळा आलाय बघ. गेला महिना-दीड महिना तू माझ्याकडे चक्क कानाडोळा केलायस. ढुंकूनही पाहिलं नाहीस साधं,’’ म्हणत दप्तराने गाल फुगवले. ‘‘हो, हो, पण तुझा कंठ एवढा दाटून का बरं आलाय?’’ चिनूने असं विचारताच दप्तर आपलं मन मोकळं करू लागलं. मधे मधे उसासे टाकत, पाण्याने भरून येणारे डोळे टिपत, मधेच गालातल्या गालात, तर कधी गडगडाटी हसत ते आपलं बोलतच सुटलं. आपला जिवश्च-कंठश्च मित्र अनेक वर्षांनी भेटावा आणि आठवणींचा बांध फुटावा तसं झालं होतं त्याचं. आपल्या अंतरीच्या खुणा अगदी मोकळ्या मनाने उघड करणं चालू केलं त्यांनं. ‘‘काय सांगू चिनू तुला, तुमचं ते रोज रिक्षातलं मजा करणं, रिक्षाकाकांशी आपुलकीने वागणं, लुटुपुटूचं भांडण, विनोद सांगून खुदुखुदू हसणं या सगळ्याची कित्ती कित्ती आठवण येतेय मला. आमचे बेल्ट वापरून लुटुपुटुची मारामारी करता ना तेव्हा आम्हालाही खूप मजा वाटते बरं का. तू किंवा तुझ्या बेंचवर बसणारी श्रिया एकमेकींच्या वस्तू चुकून आमच्यामध्ये ठेवता आणि काही वेळा त्या तशाच घरीपण घेऊन येता आणि दुसऱ्या दिवशी त्यावरून वाद घालता तेव्हा मला हसू अगदी आवरत नाही. चिनू, गेल्या वर्षी श्रियाच्या दप्तराशी माझी मैत्री झाली होती, यावर्षी बाईंनी बेंच बदलले तर मला नवा मित्र मिळेल ना!’’ या विचारानेच दप्तराच्या स्वरात भावविवशता आली. पण लगेचच सावरून ते म्हणालं, ‘‘तो नचि खेळाच्या तासाला तुझ्या डब्यातला खाऊ तुला न सांगता खात तुझी खोडी काढतो ना, तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. चिनू, एकदा तू अनूचा सुगंधित खोडरबर तुला आवडला म्हणून माझ्यात दडवून ठेवला होतास ना, तेव्हा शरमेनं माझ्या जिवाचं पाणी पाणी झालं होतं.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा