बुगुन लायोचीकला Bugun Liochichla (liochichla bugunorum) हा पक्षी सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. दिसायला देखणा असा हा पक्षी जगाला माहीत झाला फक्त आठ वर्षांपूर्वी. २००५ साली
ईगल-नेस्ट अभयारण्यातील लाम्पा आणि बोम्डीला या भागांत हा पक्षी आढळून आला आहे. या दोन जागा सोडून दुसरीकडे हा पक्षी अद्याप आढळलेला नाही. पण हा पक्षी अरुणाचल प्रदेश, भूतान आणि लगतच्या चीनच्या काही भागांत सापडण्याची शक्यता आहे. या पक्ष्याचा रंग आणि आवाज इतका विशिष्ट आहे, की तो अभ्यासकांच्या नजरेतून सुटणे कठीण आहे. त्यामुळे याचे अस्तित्व लपून राहू शकत नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की, हा पक्षी निसर्गत: दुर्मीळ आहे. यांची संख्या ५०-२५० च्या आसपास असावी, असे पक्षीशास्त्रज्ञांचे अनुमान आहे. यामुळेच हा पक्षी अतिसंकटग्रस्त पक्ष्यांमध्ये मोडतो.
हा पक्षी प्रामुख्याने समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर सापडतो. तो प्रामुख्याने सदाहरित जंगलाचे किनारे, बांबूच्या रांजी, डोंगरउतारावरील झाडोरा अशा ठिकाणी वास्तव्य करतो. या पक्ष्यावर जास्त अभ्यास झाला नसल्याने याच्या अधिवासाविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी हा पक्षी सापडला तेथील अधिवास हा जंगलतोडीमुळे दुय्यम दर्जाचा असावा असे मानले जाते. याचा मुख्य अधिवास मानवी हस्तक्षेप नसलेली सदाहरित जंगले असावीत असे शास्त्रज्ञांना वाटते. याचा विणीचा हंगाम, घरटे, अन्न यांविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. याला मुख्य धोका आहे तो अधिवास नष्ट होण्याचा. हा जिथे सापडला तेथे गेल्या काही वर्षांत विकासकामे सुरू झाली आहेत. लाम्पाला जाणारा एक रस्ता यांच्या अधिवासातून जातो. हा रस्ता जेव्हा पूर्ण होईल तेव्हा या पक्ष्याच्या अधिवासाचा बराचसा भाग नष्ट होण्याची शक्यता आहे. जंगलाला लागणारे छोटे-मोठे वणवे हेही चिंतेचे कारण आहे. तसेच स्थानिक बुगुन जमातीचे लोक याच भागातून सरपण आणि घरासाठी लागणारे लाकूड गोळा करतात. या सर्वाचा परिणाम म्हणजे यांचा घटत जाणारा अधिवास.
पण या सर्वात एक आशेचा किरण आहे तो म्हणजे येथे राहणारा बुगुन समाज. या समाजाच्या मालकीच्या जंगलाला ‘समुदाय संवर्धन भाग’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये वनविभाग आणि बुगुन समाज एकत्रितपणे हा पक्षी वाचविण्याचे काम करतील. यासाठी निसर्ग पर्यटनाची संकल्पना अमलात आणण्याचाही प्रयत्न सध्या चालू आहे. याचा फायदा या अनोख्या पक्ष्याला आणि बुगुन समजालाही निश्चित होईल.
(छायाचित्र : डॉ. रामना अथ्रेया)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा