गेले काही महिने आपण निसर्गाच्या सान्निध्यात धम्माल करतोय. कधी जंगलात भटकतोय तर कधी बाल्कनीतून पानांची सळसळ ऐकतोय. आपल्या लक्षात आलंय की, हा हिरवा मित्र आपल्याला खूप आनंद देतो. आपण हे पाहिलंय की माणसांच्या अयोग्य कृतींमुळे निसर्गाचा आणि पर्यायाने आपला विनाश होतोय. आता निसर्गरक्षणाची सुरुवात आपण स्वत:पासूनच करू या.
आधी आपल्या दप्तराकडे पाहू. वह्यांचे कागद दोन्ही बाजूंना लिहून जपून वापरले पाहिजेत. पुस्तकं सांभाळून वापरली पाहिजेत, म्हणजे ती वर्षभर पुरतील. प्रत्येक वेळी नवीन पेन आणण्यापेक्षा, फक्त रिफील बदलायची. रोज घरून पाण्याची बाटली भरून न्यायची. नेहमी बाटल्या विकत घेऊन नंतर कचऱ्यात टाकल्याने खूप प्रदूषण होतं.
कॉम्प्युटर, आय-पॅड व मोबाइलच्या सतत वापरामुळे वेळ आणि बॅटरी खर्च होतेच, पण त्यातून निघणारी रेडिएशन शरीराला व निसर्गाला घातक असतात. जास्त वेळ बोलायचं तर लँडलाइन उत्तम! टीव्ही व म्युझिक सिस्टीमसारखी उपकरणंही किती वेळ वापरायची आणि किती आवाज ठेवायचा याचा विचार केला पाहिजे. सारखं एसीमध्ये बसून तब्येत बिघडू शकते व त्यामुळे वीजही खूप खर्च होते. बाहेर जाताना दरवेळी कारने जाण्याचा हट्ट बाबांकडे करायचा की सायकलने किंवा पायी जायचं हे आपणच ठरवायचंय.
प्लास्टिक पिशव्या तर टाळायला हव्याच, पण इतर अनेक प्लास्टिकच्या वस्तूंना कागद, पुठ्ठा, कापड, काच किंवा धातूचा पर्याय शोधायला हवा. टीव्हीवर जाहिरात होते म्हणून नव्या वस्तूचा हट्ट न करता आधीच्या वस्तू जुन्या झाल्यावरच नवीन मागायच्या. जुन्या वस्तू व कागद कचऱ्यात न टाकता रद्दीवाला व भंगारवाल्याला द्यायच्या. घरी आईने केलेलं ताजं अन्न सगळ्यात चांगलं. बाहेरचं अन्न कधीतरीच खावं व ते कमीत कमी आवरणातलं असावं. त्याने प्रदूषण टाळता येतं. आपण जितकी वीज, इंधन व वस्तूंची नासाडी करू तितका निसर्गाचा जास्त विनाश होतो.
तुम्ही म्हणाल, इतक्या सगळ्या गोष्टी सोडल्या तर खूप कंटाळा येईल. पण आपण पाहिलंच आहे की निसर्गाचं निरीक्षण करण्यात वेळ कसा मस्त जातो. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एकदा कागदाचा कंदील, छान रांगोळी व अंगणात मातीचा किल्ला या गोष्टी करून बघाच! घराजवळ तुळस, कढीपत्ता, जास्वंद, सदाफुली, गोकर्ण, तगर, पारिजातक यांसारखं एखादं रोप लावून त्याला रोज पाणी घाला. पुस्तकं वाचा, चित्रं काढा, बीएनएचएससारख्या संस्थांबरोबर रानात भटका, मित्र-मत्रिणींबरोबर खेळा, थोडा वेळ देवाची प्रार्थना करा, वेळेवर झोपा व सकाळी लवकर उठून पक्ष्यांचा किलबिलाट ऐका. मोठं झाल्यावर तुम्हाला कळेल की, यातच खरा आनंद आहे. आपली भारतीय परंपरा हाच संदेश देते.

Story img Loader