सर्वज्ञची या वर्षीची सुट्टी एकदम खास असणार आहे. कारण या सुट्टीत त्याची मुंज आहे! घरात मुंजीच्या तयारीची गडबड सुरू आहे. खरेदी, केळवणं, पत्रिका, आमंत्रणं सगळीच धमाल चालली आहे. मुंजीच्या निमित्ताने त्याला घरातले सगळेच जण काही ना काहीतरी गिफ्ट आणतायत. पण आई-बाबांनी आणलेलं एक गिफ्ट मात्र त्याला मनापासून आवडलंय. ते गिफ्ट म्हणजे बुद्धिबळाचा नवाकोरा सेट! सर्वज्ञच्या बाबांना बुद्धिबळ खेळायला खूप आवडतं. त्यामुळे त्यांनी त्याला आणि त्याच्या सईताईला अगदी लहान असल्यापासूनच बुद्धिबळ खेळायला शिकवलंय. दोघांनाही वेळ असेल तर ते खराखुरा बोर्ड गेम खेळतात आणि कुणा एकालाच वेळ असेल तर कम्प्युटरवर खेळतात!
सर्वज्ञच्या बाबांना जसं बुद्धिबळ खेळायला खूप आवडतं तसंच एखाद्या गोष्टीचा इतिहास जाणून घ्यायलाही आवडतं. त्यामुळे बुद्धिबळाचा नवाकोरा सेट भेट म्हणून देताना त्याच्याविषयीची माहितीही दोघांना द्यायची असं बाबांनी ठरवलं होतं. बुद्धिबळाचा डाव मांडता मांडताच बाबांनी सांगायला सुरुवात केली, ‘‘सहाव्या शतकाच्याही आधी बुद्धिबळासारखा खेळ भारतात खेळला जात होता. म्हणजे बुद्धिबळ हा मूळचा भारतीय खेळ आहे. आता काही इतिहासकारांचं म्हणणं आहे, की बुद्धिबळाचा शोध चीनमध्ये लागला. पण अनेकदा खूप खूप जुन्या गोष्टींच्या बाबतीत अशी वेगवेगळी मतं असलेली दिसतात. भारतातून हा खेळ पर्शियामध्ये आणि तिथून अरब आक्रमणांनंतर युरोपात गेला. बुद्धिबळाचा खेळ आत्ता जसा आहे साधारण तसा युरोपात पंधराव्या शतकात खेळला जात होता. मात्र सुरुवातीच्या काळात हा खेळ किती आक्रमक पद्धतीने खेळला जातो याला महत्त्व होतं. म्हणजे कोण हरतंय किंवा कोण जिंकतंय यापेक्षाही कुणाची खेळण्याची स्टाइल जास्त चांगली, आकर्षक आहे याला जास्त महत्त्व दिलं जायचं. नंतरच्या काळात मात्र शास्त्रीय पद्धतीने विचार करून, चाली ठरवून, strategy ठरवून बुद्धिबळ हा जिंकण्यासाठी खेळला जाऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बुद्धिबळाच्या स्पर्धाही भरवल्या जायला लागल्या! पहिली जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा १८८६ मध्ये झाली!’’
एवढं सगळं सांगेपर्यंत आई आणि आजीही सई-सर्वज्ञचा खेळ बघायला आणि बाबा सांगत असलेली माहिती ऐकायला तिथे येऊन बसल्या होत्या. डाव मांडून झाला. काळ्या सोंगटय़ा कुणी घ्यायच्या आणि पांढऱ्या कुणी घ्यायच्या ते ठरवण्यासाठी बाबांनी एक काळं आणि एक पांढरं प्यादं एकेका हातात घेऊन मुठी बंद केल्या. सर्वज्ञ लहान असल्यामुळे त्याला आधी मूठ निवडायची संधी मिळाली. त्याने जी मूठ उघडली तिच्यात काळ्या रंगाचं प्यादं होतं. त्यामुळे त्याला काळ्या सोंगटय़ा आणि सईला पांढऱ्या सोंगटय़ा मिळून डाव सुरू झाला. पहिली चाल करताना सईने राजाच्या पुढचं प्यादं दोन घरं पुढे केलं. तिच्या चाली नंतर आपण काय खेळावं असा विचार सर्वज्ञ करत असताना बाबांनी पुढे सांगायला सुरुवात केली, ‘‘भारतात गुप्तकाळात बुद्धिबळासारखा खेळ खेळला जायचा. त्याला ‘चतुरंग’ असं म्हटलं जायचं. महाभारतात चतुरंग सेनेचा उल्लेख आहे. सैन्याचं विभाजन त्याकाळी चार भागांमध्ये केलं जायचं. त्यावरून चतुरंग हा खेळही तयार करण्यात आला होता. तेव्हा तो ‘अष्टपद’ म्हणजे ८७८ च्या चौकोनांमध्ये खेळला जात असे. सिंधू संस्कृतीचे जे अवशेष मोहेंजोदारो आणि हडप्पामध्ये सापडले त्यातही बुद्धिबळासारख्या बोर्डगेमचे अवशेष सापडले. भारतातून चतुरंग खेळ पर्शियात गेला. तिथे त्याला आधी चतरंग म्हटलं जाई, पण नंतर ‘चतरंग’ वरून त्याचं ‘शतरंज’ झालं.’’
बाबांचं सांगून होईपर्यंत सई-सर्वज्ञच्या दोन-तीन चाली खेळून झाल्या होत्या. सर्वज्ञने राजाचं कॅसलिंग करून त्याचा राजा सुरक्षित केला होता. सईचा वजीर बिनधास्त सर्वज्ञच्या राज्यात फिरत होता!
बाबांनी पुढे सांगितलं, ‘‘पर्शियामध्ये ‘राजा’ला ‘शाह’ म्हणतात. त्यावरून ‘शाह’ला ‘मात’ देणं म्हणजेच राजा कुठेही हलू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं याला ‘शह(और)मात’ असं म्हटलं जायला लागलं. हा शब्द अनेक देशांमध्ये प्रचलित झाला आणि मग ‘चेकमेट’ हा शब्द त्यावरून लोकप्रिय झाला.’’
बुद्धिबळाची माहिती तर सांगून झाली, सई-सर्वज्ञचा खेळही चांगलाच रंगला होता. आता कोण कुणाला चेकमेट करतंय याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं!
अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा