सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. यावेळी निसर्गात मोठे बदल होत असतात. विशेषत: या काळामध्ये अनेक वृक्षांना फळे येण्यास सुरुवात होते. या अनेक प्रकारच्या वृक्षांना वैशिष्टय़पूर्ण फळे येत असतात; परंतु आपण त्याकडे फार लक्षपूर्वक पाहात नाही. त्यामुळे त्यांचे वैशिष्टय़ लक्षातच येत नाही. निसर्गात प्रत्येक वनस्पतींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फळे येतात व त्यातूनच नवीन बीज तयार होत असते. या बीजातूनच नवीन उत्पत्ती संभवत असते. आता आपण विचार केला पाहिजे, की जर अशा पद्धतीने तयार झालेले नवीन बी झाडाच्या आसपासच राहिले व त्यातून जरी नवीन झाडे निर्माण झाली तरी ती जगतील का हो? तसेच जंगलातील किंवा रानातील सगळ्याच झाडांची फळे आपण किंवा पक्षी खातातच असेही नाही. परंतु तरीदेखील मोठे मोठे वृक्ष त्यांनी तयार केलेल्या बिया मूळ झाडापासून अगदी दूरवर कशा वाहून जातील याची काळजी घेतात. याचे कारण म्हणजे या सर्व फळांची असलेली वैशिष्टय़पूर्ण रचना होय. यासाठी आपण काही उदाहरणे पाहूयात. सध्या अनेक भागांमधे पापडीचे झाड फळांनी अगदी भरून गेलेले दिसून येत आहे. जेव्हा ही फळे तयार होतात तेव्हा त्याचे झुपकेच्या झुपके हे फांद्यांच्या टोकाला लगडलेले दिसतात. ही फळे पापडासारखी चपटी असतात व मधल्या भागांत मात्र ती फुगीर असतात. या फुगीर भागामध्ये या झाडाचे बीज साठविलेले असते व या बियांच्या भोवती जवळपास एक सेंमी एवढय़ा रुंदीचा पातळ भाग असतो. त्यामुळे या फळांचा आकार अगदी पापडासारखा दिसतो. खरे तर ही फळे काही आपण किंवा पक्षी खात नाहीत. तेव्हा याचे बीज वहन कसे होणार, असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर या फळाच्या रचनेत आहे. या पापडासारख्या रचनेमुळे सोसाटय़ाचा वारा आला की ही फळे अक्षरश: पतंगासारखी आकाशात उडायला लागतात व या वाऱ्याच्या वेगाने अगदी दूपर्यंत जाऊन पडतात. आता आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, ही फळे उन्हाळ्याच्या सुमारास तयार होत असतात व त्याच वेळी वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे वारादेखील जोरदारपणे वाहत असतो. आहे की नाही निसर्गात अनुरूप अशी रचना! परंतु ही रचना केवळ याच झाडात आहे असे नाही, तर अनेक वृक्षांमध्ये अशी रचना आढळते. याकरिता आणखी एका वृक्षाचे उदाहरण बघूयात. आपल्यापकी अनेक जणांनी करंजाचे झाड पाहिले असेल. याचीही फळे आपण किंवा पक्षी खात नाही, परंतु तरीदेखील ही फळे त्याच्या वैशिष्टय़ामुळे दूपर्यंत पसरली जातात. करंजाची झाडे ही मुख्यत्वे नदी किंवा ओढय़ांच्या कडेला वाढतात. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध असलेले पाणी हेच बी वहन करण्याकरिता उत्तम साधन असते. करंजाचे फळ हे या दृष्टीने अगदी योग्य असे असते. यांतील बीच्या भोवतालचे आवरण हे अगदी कडक लाकडासारखे असते व ते कधीही आपणहून उघडले जात नाही. परंतु हे आवरण वजनास अगदी हलके असते. त्यामुळे फळांची पूर्ण वाढ झाल्यानंतर ती झाडावरून गळून पडतात व ती थेट पाण्यामध्ये. परंतु करंजीसारखा आकार, वजनाने हलके असलेले आवरण यामुळे ही फळे थेट पाण्यावर तरंगत पाण्याच्या प्रवाहाबरोबर
दूपर्यंत वाहात जातात. पुढे फळे दीर्घकाळ पाण्यात राहिल्यामुळे ते त्या फळात शिरते व त्यातूनच
बी अंकुरण होण्यास मदत होते.
आणखी काही फळांची या प्रकारची वैशिष्टय़े पाहुयात. तुम्हीही सुट्टीत आसपासच्या अशाच वैशिष्ट्यपूर्ण फळांचा शोध घ्या.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा