तुमच्यासारखा मी जेव्हा लहान होतो तेव्हा समुद्र, सागरकिनारा, वाळू यांचा विचार जरी केला तरी मला शंख-शिंपल्यांची आठवण व्हायची. समुद्रकिनारी वाळूमध्ये दिसणारे हे शंख-शिंपले म्हणजे आहेत तरी काय, असा प्रश्न पडायचा.
प्रचंड विविधता असलेल्या मॉलस्क वर्गातील (ऑक्टोपस आणि स्क्विडदेखील याच वर्गात मोडतात) काही प्राण्यांची उत्क्रांती कठीण, शरीर-आवरण असलेल्या प्राण्यांमध्ये झाली; हे म्हणजेच शंख-शिंपले. ही कठीण आवरणं या प्राण्यांच्या शरीरातून निघणाऱ्या स्रवांतील कॅल्शिअम कार्बोनेट आणि प्रथिनांपासून प्रामुख्याने बनलेली असतात, आणि शिकारी, जोरदार सागरी प्रवाह आणि वादळांपासून या आवरणांमुळे त्यांतल्या प्राण्यांना संरक्षण मिळतं. या कठीण आवरणधारी मॉलस्कांच्या तब्बल ५०,००० प्रजाती आहेत.
शंख-शिंपल्यांच्या गटात मोडणाऱ्या या प्राण्यांची सगळ्यात धम्माल गंमत म्हणजे यांच्या भोवतीचं आवरण वाढत्या वय आणि आकारासोबत वाढत जातं. सहाजिकच चिमुकल्या वयापासून अगदी मरेपर्यंत आपल्या भोवतीचं कवचरूपी आवरण घेऊन जगणाऱ्या फारच मोजक्या प्राण्यांमध्ये यांची गणना होते. हे कठीण आवरण असणाऱ्या मॉलस्कांची वर्गवारी चार गटांमध्ये करता येते. बायवॉल्व अर्थात शिंपले, गॅस्ट्रोपॉड्स अर्थात गोगलगायींचा समावेश असलेला गट, पॉलिप्लॅकोफोरान्स आणि सेफालोपॉड्स म्हणजेच ऑक्टोपस आणि स्क्विड यांचा गट.
समुद्रकिनाऱ्यांवर पुळणींमध्ये आणि खाजणांमध्ये आढळणारे शिंपले किंवा बायवॉल्व्स हे आवरणधारी मॉलस्कांमध्ये सर्वाधिक आढळणारे प्राणी आहेत. कळपा किंवा क्लॅम, कालव किंवा स्कॉलप्स, शिंपले अर्थात मसल्स आणि ऑयस्टर्स ही बायवॉल्व्जची ठळक उदाहरणं आहेत.
गॅस्ट्रोपॉड्स किंवा समुद्री गोगलगायी महासागरांतील खोल तळांपासून थेट वेळा रेषेपर्यंत पसरलेल्या विविध प्रकारच्या सागरी वातावरणांमध्ये आणि परिसंस्थांमध्ये आढळतात. एबेलोन, कोन्क अर्थात शंकू, पेरिविन्कल, गोगलगायींसारखेच दिसणारे, मात्र आकाराने मोठे वेल्क्स् आणि कितीतरी अनेकविध प्रजातींचा समावेश या गटामध्ये होतो.
पॉलिप्लॅकोफोरान्सना इंग्रजीमध्ये सामान्यपणे कायटॉन्स किंवा सी क्रेडल्स या नावाने ओळखतात. भरती-ओहोटी रेषेदरम्यानच्या खडकांमध्ये असणाऱ्या खाचा-कपारींमध्ये हे प्रामुख्याने आढळतात.
सेफालोपॉड्स अर्थात कट्लफिश, ऑक्टोपस आणि नॉटिलस् हे समुद्रातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जातात. नॉटिलसना खूप सुरेख बाह्य़ आवरण असतं. कट्लफिशना बाह्य़ आवरण नसून शरीरांतर्गत आवरण असतं, ज्याला कट्लफिश बोन असंही म्हणतात.
आपल्यातल्या अनेकांनी समुद्रकिनाऱ्यावर शंख-शिंपले जमवण्याचा छंद जोपासला असेल. मात्र या शंख-शिंपल्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखेला कॉन्कोलॉजी म्हणतात. तुमच्यापैकी कोणाला शंख-शिंपले पाहण्याचा किंवा ते जमवण्याचा छंद आहे का? असेल तर त्यांचा अभ्यास करण्याच्या पर्यायाचा पुढे नक्की विचार करा, हीच तुम्हाला आजच्या लेखामधून शुभेच्छा!
शब्दांकन : श्रीपाद
rushikesh@wctindia.org