गुलाबी डोक्याचे बदक Pink-headed Duck (Rhodonessa caryophyllacea) हा दक्षिण आशियात सापडणारा एक अतिशय दुर्मीळ असा प्रदेशनिष्ठ पक्षी आहे. या पक्ष्याला हे नाव नराच्या अतिशय आकर्षक अशा गुलाबी रंगाच्या डोक्यामुळे पडले. जॉन लाथम या शास्त्रज्ञाने १७९० साली या पक्ष्याचे नामकरण केले. यानंतर हा पक्षी बरीच वर्ष पाहिला गेला आणि त्याची शिकार केली गेली. जगातील वेगवेगळ्या संग्रहालयांत या बदकाचे सुमारे ८० नमुने अस्तित्वात आहेत. हे सर्व नमुने १८२५ ते १९३६ सालांदरम्यान जमा केले गेले. १९३५ साली बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात सी. एम. इंग्लिस या ब्रिटिश अधिकाऱ्याने एक बदक मारले. त्याने जेव्हा जवळून पहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हे गुलाबी डोक्याचे बदक आहे. ही या बदकाची निसर्गातील शेवटची खात्रीलायक नोंद. यानंतर मात्र हे बदक पुन्हा पाहिले गेले नाही.
या बदकाच्या काही जोडय़ा फ्रान्स येथील क्लेरेस आणि इंग्लंड येथील फॉक्सवॉरेनमध्ये जोपासल्या गेल्या होत्या. दुर्दैवाने या बदकांनी बंदिवासात कधीही अंडी घातली नाहीत. त्यामुळे १९४५ साली यातील शेवटच्या बदकाने जगाचा निरोप घेतला. १९५० साली अधिकृतरीत्या हे बदक नामशेष झाले असावे, असे जाहीर केले गेले.
हे बदक मुख्यत्वेकरून भारत, बांग्लादेश आणि म्यानमार या तीन देशांत सापडायचे. भारतात याचा वावर गंगेच्या उत्तर भागापासून ब्रम्हपुत्रेच्या पश्चिम भागापर्यंत होता, पण भारतात अन्य ठिकाणीही ही बदके सापडल्याची नोंद आहे. परंतु या बदकाच्या सर्वात जास्त नोंदी बिहार राज्यातून झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातही याची नोंद झाली आहे.
अशा या दुर्मीळ बदकाचा मुख्य अधिवास हा जंगलांनी वेढलेल्या गवताळ दलदलीत होता. या प्रकारच्या अधिवासाला उत्तर भारतात तराई असे म्हणतात. असे हे बदक लाजरेबुजरे आणि लपण्यात इतके तरबेज होते, की जोपर्यंत त्याच्या खूप जवळ जाऊन त्याला दचकवले नाही तोपर्यंत लपून राहत असे. जुन्या नोंदीवरून असाही निष्कर्ष काढला गेलाय की हे बदक कदाचित निशाचर असावे आणि दिवसा गवताळ दलदलीमध्ये लपून बसत असावे. त्यामुळेच या बदकाचा शोध घेणे खूप कठीण काम असे. ही बदके नेहमी ६-८ च्या छोटय़ा-छोटय़ा थव्यांत राहत असत, पण काही वेळेस यांचे ३०-४० चे थवेही पाहिले गेले आहेत. याच्या कमी-जास्त होणाऱ्या संख्येवरून असे म्हटले जाते की, ही बदके स्थानिक स्थलांतर करत असावीत. त्यामुळेच हे बदक भारताच्या बऱ्याच भागांत दिसून येत होते. हे बदक मुख्यत: पाण्याच्या पृष्ठभागावर अन्न शोधत असे, पण अधेमधे पाण्यात डुबकी मारून पाणवनस्पती आणि उथळ पाण्यातील िशपले खात असावे, असे जुन्या नोंदींवरून दिसून येते.
याच्या नामशेष होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे याच्या अधिवासाचा ऱ्हास. जंगल आणि पानथळीची जागा हा त्याचा अधिवास. १९व्या शतकाच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला नरांच्या आकर्षक गुलाबी रंगांच्या डोक्यामुळे यांची अर्निबध शिकार झाली. तसेच मोठय़ा प्रमाणात या बदकांची अंडी खासगी संग्रहालयासाठी जमा केली गेली. याचबरोबर या बदकांच्या ऱ्हासाचे दुसरे कारण म्हणजे जलपर्णीचा (पाण वनस्पती) दक्षिण आशियात झालेला शिरकाव आणि प्रसार. जलपर्णीनी या भागातील तलावांवर आणि नद्यांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अन्य
पाणवनस्पती आणि त्यावर जगणाऱ्या प्राण्यांवर यांचा दुष्परिणाम झाला. या सर्वाचा परिणाम म्हणजे या बदकाचे मुख्य खाद्य कमी होत गेले. अर्थातच या सर्वाचा परिणाम म्हणजे या बदकाचे नामशेष होणे.
पण २००० च्या दशकात हे बदक दिसल्याच्या काही नोंदी सापडल्या. म्यानमार येथील काचीन प्रदेशात २००४ साली हे बदक दिसल्याच्या काही नोंदी आहेत, पण त्याबाबत खात्रीलायक पुरावा नाही. स्थानिक कोळ्यांनी असे बदक दिसल्याचा दावा केला आहे, पण याविषयी अधिक संशोधन मोहिमा करण्याची आवश्यकता आहे.
या पक्ष्याचा अधिवास म्हणजे पाणथळ जागा. ही मनुष्यासाठीही अतिशय महत्त्वाची आहे. या पाणथळ जागा आपल्याला बऱ्याचशा परिसंस्था सेवा पुरवितात- जसे की पिण्याचे शुद्ध पाणी, हवामानाचे संतुलन, मासे आणि इतर जलचर यांच्या स्वरूपात अन्न, शेतीसाठी पाणी आणि अनेक उदरनिर्वाहाची साधने. या पाणथळ जागा जमिनीवर असणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडपकी २५-३०% आपल्या पोटात साठवून ठेवतात. परंतु या जागा नामशेष होऊ लागल्या तर हा कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडून येत्या १०० वर्षांत पृथ्वीचे तापमान सुमारे २.५ अंशाने वाढेल. या पाणथळ जागांचा विनाश सुरू झाला तो यांच्यात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे. या विनाशाची सुरुवात म्हणजे गुलाबी डोक्याच्या बदकाचे नामशेष होणे. याला सूचक समजून मनुष्याने पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. तरच माणूस स्वत:ला नामशेष होण्यापासून वाचवू शकेल.
girishjathar@gmail.com
(फोटो सौजन्य: झिओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन, ऑनलाइन कॅटलॉग.)
गुलाबी डोक्याचे बदक
गुलाबी डोक्याचे बदक Pink-headed Duck (Rhodonessa caryophyllacea) हा दक्षिण आशियात सापडणारा एक अतिशय दुर्मीळ असा प्रदेशनिष्ठ पक्षी आहे.
आणखी वाचा
First published on: 20-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threatened birds