हसनच्या शेतावर उंट, कुत्रा, मांजर, शेळ्या असे खूप प्राणी होते. त्यातल्या रिनी मांजराला वाटायचे की, या सर्वाच्यात आपल्याइतके हुशार कोणीच नाही. एके दिवशी हसनकडे ओढय़ापलीकडे राहणारा त्याचा मित्र आपल्या पांढऱ्या मांजराला घेऊन आला. गप्पा मारताना पांढरे मांजर रिनीला म्हणाले, ‘‘माझ्या मालकाचे ओढय़ापलीकडे संत्र्याचे शेत आहे. आम्ही तिथे खूप संत्री खातो व ती खाऊन कंटाळा आला की ओढय़ातले चवीष्ट मासे पकडून खातो.’’
पांढऱ्या मांजराकडून संत्री आणि माशांचे वर्णन ऐकून रिनीच्या तोंडाला पाणी सुटले. पण ओढय़ापलीकडे जायचे कसे, असा तिला प्रश्न पडला. मग ती उंटाकडे गेली आणि त्याला विचारलं, ‘‘तू कधी संत्री खाल्ली आहेस का? तू जर मला तुझ्या पाठीवरून ओढय़ापलीकडे घेऊन गेलास तर मी तुला संत्र्याच्या बागेत घेऊन जाईन. तिथे आपण खूप संत्री खाऊ.’’ उंटाला ही कल्पना खूप आवडली. त्याने रिनीला आपल्या पाठीवर बसवलं व दोघेजण ओढा पार करून संत्र्यांच्या बागेत गेले.
संत्री बघून उंट इतका खूश झाला की त्याने संत्र्यांवर ताव मारायला सुरुवात केली. रिनीने एक-दोन संत्री खाल्ली व उंटाला म्हणाली, ‘‘चल आता आपण ओढय़ातले मासे खाऊ.’’ उंट म्हणाला, ‘‘तुझे पोट लहान आहे, ते भरले असेल, पण माझे पोट मोठे आहे ते काही अजून भरले नाही. तू पुढे जाऊन मासे खा. माझी संत्री खाऊन झाली की मी येतो.’’
भरपूर मासे खाऊन पोट भरल्यावर रिनी उडय़ा मारत जोरजोरात गाणी म्हणत संत्र्याच्या बागेत परत आली. तिच्या गाण्याचा आवाज ऐकून बागेचा मालक बाहेर आला. त्याने संत्री खात बसलेल्या उंटाला काठीने मार देऊन बाहेर काढले. उंटाला मार बसताना बघून रिनी तिथून पसार झाली. दुखऱ्या अंगाने उंट कसाबसा ओढय़ाकाठी आला आणि रिनीला म्हणाला, ‘‘तू जोरजोरात गाणी का म्हणत होतीस? मला तुझ्यामुळे मार खायला लागला.’’ यावर रिनी म्हणाली, ‘‘माझं पोट भरलं की मी अशीच उडय़ा मारत गाणी म्हणते म्हणजे मला अगदी आनंदी वाटतं.’’
हे ऐकून उंट खूप चिडला. रिनीला चांगलाच धडा शिकवायचा ठरवून रिनीला त्यानं पाठीवर बसायला सांगितलं. रिनी टुणकन उडी मारून उंटाच्या पाठीवर बसली. उंट पाण्यात शिरला. जरा खोल पाणी आल्यावर त्याने पाय वाकवून पाठ पाण्यात बुडविली. रिनी ओरडू लागली, ‘‘अरे, मला पोहता येत नाही. मी पाण्यात बुडेन.’’ त्यावर उंट म्हणाला, ‘‘अगं, माझं पोट भरल्यावर मी नेहमीच असं करतो, म्हणजे मला अगदी आनंदी वाटतं.’’
उंटाने परत एकदा अंग घुसळलं, रिनी जोरजोरात ओरडू लागली. एवढी शिक्षा पुरे म्हणून उंटानं तिला पाठीवरून काठावर आणलं. काठावर येताच रिनीने धूम ठोकली.
या घटनेपासून उंटानं ठरवलं की, पुन्हा कोणत्याही मांजराच्या नादी लागायचं नाही. ती स्वत:ला हुशार समजत असतील, पण मी त्यांच्यापेक्षा हुशार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा