|| श्रीपाद
मान्सूनचा पाऊस तुमच्याही शहरागावामध्ये रुजला असेल. त्यामुळे थंडावाही आला आहे. मला सांगा, पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त काय खायला आवडतं? छान थंडी पडली की काय खायची ओढ लागते? मला तर कांदाभजी, तिखट-गोड मिरची आणि भाज्यांची भजी, बटाटावडा, भाजलेलं मक्याचं कणीस, मस्त टोस्ट सॅण्डविच.. आहाहा! नुसती या पदार्थाची नावं ऐकली तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतं. शिवाय, या पदार्थासोबतच दिसते ती लाल, मुलायम आणि आंबटगोड चवीच्या टोमॅटो केचपची बाटली!
माझी आजी चातुर्मासामध्ये कांदा-लसूण खायची नाही. यादरम्यान ती दिल्लीला तिच्या भावाकडे राहायला गेली किंवा मामा आजोबा आणि मामी आजी आमच्याकडे तिला भेटायला आले तर आजीला खाता येईल असा, त्यावेळी नुकताच बाजारात मिळायला लागलेला, बिनलसणाचा टोमॅटो केचप माझा मामा खास आजीसाठी खरेदी करायचा. आजीला टोमॅटो केचप खास आवडायचा आणि या नव्या सोयीमुळे तिला तो खाताही यायचा. मला मात्र वाटायचं की, घरीच हा टोमॅटो केचप करता आला तर? आपल्या चवीचा, आपल्या आवडीचा, आपल्याला हवा तसा टोमॅटो केचप आपल्याला घरच्या घरीच बनवता आला तर? माझ्या आजीकरता टोमॅटो केचप बनवण्याच्या खटाटोपामध्ये आत्ता तुम्हाला देतोय ही पाककृती माझ्या हाती लागली. तेव्हापासून आमच्या घरी मी बनवलेलाच टोमॅटो केचप फ्रिजमध्ये विराजमान झालेला आहे. गंमत म्हणजे तुम्ही बनवताना तुमच्याही लक्षात येईल की तुमच्या घरच्यांना, तुम्हाला, तुमच्या खास दादा-ताई किंवा आजी-आजोबांना आवडेल अशा चवीचा टोमॅटो केचप तुम्ही अगदी सहज बनवू शकता. बाजारातून आणलेल्या त्याच त्या चवीच्या टोमॅटो केचपची गरजच तुम्हाला भासणार नाही. जेव्हा हवा तेव्हा तासाभरात तुम्ही ताजा टोमॅटो केचप बनवू शकाल.
साहित्य : एक किलो तजेलदार तांबडय़ा रंगाचे पिकलेले टोमॅटो. अर्धी वाटी मध्यम आकाराच्या फोडी किंवा मध्यम आकाराचं र्अध बीट. दोन-तीन पाकळ्या लसूण. मध्यम आकाराचा कांदा. अर्धा-पाऊण इंच आल्याचा तुकडा, आठ ते दहा काळी मिरचीचे दाणे. एक-दोन हिरवी वेलची- सालासकट. एक-दीड इंच दालचिनीचा तुकडा. दीड-दोन चमचे साखर किंवा सुपारीएवढा गुळाचा खडा. एक-दोन चमचे व्हिनेगर किंवा सिरका. चवीनुसार लाल तिखट आणि मीठ.
उपकरणं : गॅस किंवा इंडक्शन शेगडी, किंवा मायक्रोवेव्हदेखील चालेल. मायक्रोवेव्हसेफ झाकण असलेलं काचेचं भांडं किंवा जाड बुडाचं स्टीलचं किंवा नॉनस्टिक झाकण असलेलं भांडं. मिश्रण हलवण्याकरता चमचा किंवा डाव. टोमॅटो केचप बनवण्याकरता मिक्सर ग्राइंडर आणि त्यामधलं ओलं वाटायचं मोठं भांडं. शक्यतोवर मिल्कशेक वगरे बनवण्याकरता वापरतात ते भांडं. भाज्या कापण्याकरता सुरी आणि पाट किंवा विळी. सालकाढणं.
सर्वप्रथम सगळ्या भाज्या, टोमॅटो, बीट स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्या. टोमॅटो, बीट यांच्या मोठय़ा मोठय़ा फोडी करून घ्या. बिटाचं साल काढायला विसरू नका. कांदा, लसूण सोलून घ्या. आता ज्या भांडय़ामध्ये टोमॅटो केचप करायचं त्या भांडय़ामध्ये एकेक जिन्नस घाला. सर्वप्रथम टोमॅटो, बीट, कांद्याच्या फोडी घाला. मग लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि बाकी सारे जिन्नस घाला. आता हे भांडं विस्तवावर ठेवा. विस्तवाशी किंवा मायक्रोवेव्हपाशी काम करायला सुरुवात करताना घरातल्या वयस्कर व्यक्तीला मदतीला घ्यायला विसरू नका बरं का! सुरुवातीला मोठय़ा विस्तवावर हे मिश्रण ठेवा. टोमॅटोला पाणी सुटून मिश्रण चांगलं रटरटायला लागलं की आच मध्यम किंवा मंद करून झाकण ठेवून पंधरा मिनिटं शिजू द्या. त्यानंतर खालपासून ढवळा. मिश्रण खाली लागून करपता नये. एव्हाना टोमॅटो, बीट शिजलं असेल. मात्र अजूनही मिश्रणामध्ये पाणी असेल. हे सारासारखं पाणीच थोडं चमच्यामध्ये घेऊन, फुंकून गार करा. चव घेऊन पाहा. टोमॅटो केचपची चव आवडतेय का पाहा. नाही तर चवीनुसार मीठ, साखर, गूळ किंवा लसूण वगरे घाला. ढवळून पुन्हा एक वाफ येईतोवर मंद आचेवर शिजू द्या. सगळ्या प्रक्रियेला साधारण अर्धा तास लागेल जास्तीत जास्त. मायक्रोवेव्हमध्ये करताना सुरुवातीला मायक्रोवेव्ह पूर्ण क्षमतेवर तीन-पाच मिनिटं ठेवा. मग मध्यम आचेवर १०-१५ मिनिटं ठेवा. मिश्रण कोमट होईतोवर मायक्रोवेव्हचं दार उघडू नका. मग हलकेच हे मिश्रण बाहेर काढून चव घेऊन पाहा. आवडली तर तसंच, नाही तर हवे तसे जिन्नस घालून पुन्हा झाकण ठेवून भांडं कमी ते मध्यम क्षमतेवर १५-२० मिनिटं ठेवून द्या. विस्तवावर करा किंवा मायक्रोवेव्हमध्ये करा. एकदा मिश्रण छान शिजलं आणि त्यात थोडंसंच पाणी शिल्लक राहिलं की विस्तव किंवा मायक्रोवेव्ह बंद करा. मिश्रण सावकाश, त्याच्या गतीने थंड होऊ द्या. आता या मिश्रणामधून अख्खी वेलची, दालचिनीचा तुकडा निवडून बाजूला काढा. काहींना त्यातले तंतू आवडत नाहीत. मी मात्र हे बाजूला काढत नाही.
टोमॅटो केचपचं हे मिश्रण थंड झालं म्हणजे मिक्सर ग्राइंडरच्या भांडय़ामध्ये चांगलं मुलायम पेस्ट होईतोवर वाटून घ्या. तुमचा तांबडय़ा रंगाचा, आंबटगोड चवीचा आणि मुख्य म्हणजे तुम्हाला, तुमच्या घरच्यांना आवडेलसा टोमॅटो केचप तय्यार! आता काचेच्या किंवा स्टीलच्या स्वच्छ, कोरडय़ा बरणीमध्ये हा टोमॅटो केचप काढून घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवून मनसोक्त खा. संपला की पुन्हा करायला सोप्पा आहेच!
मिश्रण शिजवताना पाणी खूप आटवलं तर घट्ट, श्रीखंडासारखा टोमॅटो केचप बनतो. पाणी न आटवता टोमॅटो-बीट शिजल्या शिजल्या मिश्रण शिजवायचं बंद केलं तर टोमॅटो केचप थोडा पातळ, हॉटेलमध्ये मिळतो तसा तयार होतो. मी साधारण भज्याचं पीठ तयार करतो तसा केचप पसंत करतो, म्हणजे त्यात काही बुडवून खाल्लं तर त्या पदार्थाला तो छान चिकटून राहतो. पदार्थ बाहेर काढताच वाहून जात नाही. सॅण्डविच वगरेकरता वापरायचा असेल तर मी केचप थोडा घट्ट करतो. मिश्रण अधिक शिजवून पाणी आटवतो. हा घट्टसा केचप पावावर छान लोण्यासारखा बसतो आणि सॅण्डविच खाताना चारही बाजूने सांडत नाही. पोळीसोबत फ्रँकी करतानाही हा घट्ट केचपच छान सजतो. तुमच्याकडे थोडं अधिक तिखट आवडत असेल तर लाल तिखटाचं प्रमाण वाढवता येईल. आंबटगोड चवीकरता सिरका अधिक घालता येतो. चमचमीत चवीचा हवा तर कांदा-लसणासोबतच एखादी हिरवी मिरर्ची आणि चिमूटभर गरम मसाला टाकता येतो, आणि खास लहान मुलांकरता गोडूस चवीचा केचप करायचा असेल तर साखर किंवा गूळ अधिक घालता येतं. बिटाचं प्रमाण कमी-अधिक करून आपल्याला हवा तसा रंगही या केचपला आणता येतो. हं, बीट मात्र फार झालं तर केचप काळपट तांबडय़ा रंगाचा दिसतो. छान तजेलदार दिसत नाही.
contact@ascharya.co.in