सतत हातपाय हलवत राहणं, सतत चळवळ करत राहणं असं करता नं तुम्ही! आणि त्यावरून काही वेळा ओरडाही खाता. त्यामुळे ही आपली चूक आहे असं वाटतं ना तुम्हाला? हो, वाटणं साहजिक आहे, पण खरं नाही. तुम्हाला तो स्वत:चा दोष वाटत असला तर तसं मानून घेणं पहिल्यांदा बंद करा आणि तोच स्वत:चा गुण आहे हे स्वीकारून त्याचा अभ्यासात वापर करा. एक मात्र करायचंच हं, इतर करतात म्हणून आपण अनेक तास एका जागी बसून अभ्यास करू शकू हे मनातून पहिलं काढून टाकायचं. आपण आपलं ब्रेक घेत घेत थोडा थोडा वेळ अभ्यास करायचा. अजून एक करायचं, अभ्यास करताना हालचालींकडे लक्ष जाणार नाही याची सवय लावून घ्यायची, म्हणून थोडा वेळ अभ्यास आणि थोडा वेळ ब्रेक घ्यायचा. आता या हालचालीचा कसा उपयोग करून घ्यायचा बघा हं! कविता, सूत्र, नियम, श्लोक, पाढे वगैरे पाठ करताना पेनने किंवा हाताने डेस्कवर किंवा टेबलवर ठेका धरायचा, ठेक्याबरोबर सहज पाठांतर होत जाईल. विज्ञान, भूगोल, भाषा वगैरेंचा अभ्यास करताना प्रयोग, मॉडेल्स, कृती यांच्यावर भर द्यायचा आणि कार्यानुभव, शारीरिक शिक्षण यांचा अभ्यास तुम्हाला आवडतो ना, मग न लाजता, मनात गंड न ठेवता मैदानावर किंवा कार्यशाळेत त्यात सहभागी व्हायचं. वादन, नाच, तबला यांची आवड जोपासायची; तीच तुम्हाला अभ्यासासाठीही मदत करणारेय. कम्प्युटर आणि इंटरनेट हे तुमचे मित्र आहेत. सतत कीबोर्ड वापरा आणि तुमचा मेंदू कार्यरत ठेवा.
एक करा बरं का! वाचन, मनन, पाठ करताना खोलीतल्या खोलीत फेऱ्या मारत मोठमोठयाने वाचा किंवा पाठ करा. जर बसून वाचत असाल तर वाचता वाचता लिहा, म्हणजे बघा कसं चटकन लक्षात राहील ते तुमच्या! जर कागदावर लिहायचा कंटाळा आला तर हवेतल्या हवेत लिहा अगर चित्र काढा, म्हणजे कंटाळा येणारच नाही तुम्हाला अभ्यासाचा. नाटय़ीकरण, प्रगट वाचन, नाच, प्रयोग, व्यायाम यात भाग घ्या, कारण ती तुमची गरज आहे. स्पेलिंग्ज वगैरे पाठ करताना हवेतल्या हवेत किंवा डेस्कवर लिहीत राहा, पटकन पाठ होत जाईल. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे वाचताना पुस्तकावरून बोटं फिरवत वाचा म्हणजे वाचलेलं लक्षात राहणं सोप्पं होईल. आता वेळ कशाला दवडताय, हे सगळं करूनच पाहा ना!
joshimeghana.23@gmail.com

Story img Loader