मुक्ता चैतन्य
गीतांजली राव ही अमेरिकेतल्या लोन ट्री, कोलोरॅडो राज्यातली अकरा वर्षांची मुलगी. अमेरिकेतल्या ५३०० पाणी प्रकल्पांमध्ये पाण्यातील शिसे मोजण्याच्या यंत्रणा पुरेशा सक्षम नाहीयेत. गीतांजलीने असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्यामुळे पाण्यातील शिसे तपासण्याची यंत्रणा अधिक सक्षम होऊ शकेल. या शोधासाठी तिला डिस्कव्हरी एज्युकेशन एम ३ यंग सायंटिस्ट चॅलेंज पुरस्काराची विजेती घोषित करण्यात आले आहे. अमेरिकेतल्या सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांबरोबर तिला तीन महिने कामाची संधी मिळणार आहे. शिवाय तिला २५ हजार अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कारही देण्यात आला आहे. पाण्यामधील शिसे शोधण्याच्या पद्धतीवर जगभर प्रचंड पसा खर्च केला जातो. पण गीतांजलीने शोधलेली पद्धत सोपी तर आहेच; पण कमी खर्चात होणारी असल्याने जगभर कुठेही त्याचा सहज वापर शक्य आहे.
गीतांजली सांगते, ‘एक दिवस माझे आई-बाबा पाण्यातील शिसे शोधण्याच्या काही यंत्रणा घेऊन काम करत होते. ते ज्या पद्धतीने काम करत होते ते बघून यात काहीतरी गडबड आहे आणि अधिक सोपी पद्धत शोधून काढली पाहिजे असे मला वाटून गेले. मग त्या दृष्टीने मी कामाला सुरुवात केली आणि त्यातून मी माझे संशोधन केले.’ गीतांजलीने तिच्या शोधाला तिथस (tethys) नाव दिले आहे. तिथस म्हणजे स्वच्छ पाण्याची ग्रीक देवता. शिसं असलेलं पाणी प्यायल्याने जगभर अनेक देशांमधून लहानमोठय़ा सगळ्यांनाच विविध प्रकारचे आजार होत असतात. त्यामुळे गीतांजलीच्या संशोधनाचा उपयोग विशेष करून गरीब देशांना नक्की होणार आहे.
गीतांजलीच्या संशोधनाची संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर https://www.sciencealert.com/an-11-year-old-has-become-america-s-top-young-scientist-for-her-sensor-detecting-lead-in-water?perpetual=yes&limitstart=1 या लिंकवर तुम्हाला ती मिळू शकेल.
००००
जगभर निरनिराळ्या संदर्भात घडामोडी चालू असतात. विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, निरनिराळ्या देशांची संस्कृती आणि समाज यांच्याबद्दल बातम्या येत असतात. काही घडामोडी घडल्या की त्याचा तपशील मोठय़ांपर्यंत पोचत असतो. आता केरळमध्ये प्रचंड मोठा पूर आला आहे किंवा नासाने सूर्याचं निरीक्षण करायला यान पाठवलं आहे. किंवा नुकताच प्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या आणि अशा सगळ्याच बातम्यांबद्दल मोठे नेहमीच बोलत असतात. बऱ्याचदा तुम्हा मुलांना काय कळतं म्हणून या सगळ्यापासून दूर ठेवलं जातं. किंवा तुमच्याशी कुणीही या सगळ्या चालू घडामोडींबद्दल काहीही बोलत नाहीत. पण तरीही तुमच्या कानावर बातम्या येत असतात. तुम्हाला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या असतात. शिवाय आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे. अवांतर वाचन फक्त गोष्टींच्या पुस्तकाचं करायचं नसतं, तर या आणि अशा गोष्टीही तुमच्या अवांतर वाचनात असल्या पाहिजेत. म्हणूनच आज काही साइट्सच्या लिंक तुमच्याशी शेअर करणार आहे. या साइट्स चालू घडामोडी आणि बातम्या खास मुलांसाठी देतात. मुलांना समजतील अशा भाषेत, चित्रं, व्हिडीओ वापरून या बातम्यांची मांडणी केलेली असते. तुम्ही अधूनमधून या वेबसाइट्स नक्की बघत चला.
https://www.thehindu.com/children
https://www.dogonews.com
muktaachaitanya@gmail.com
(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)