मित्रा, मी आता समुद्रकिनाऱ्यापासून खूप दूर असणाऱ्या देशात रेल्वेने निघालो आहे. दोन आठवडे मी रेल्वेतच आहे. त्यामुळे दिवसभर खिडकीतून दिसणारी दृश्ये मी नाकात साठवून ठेवतो. रात्री खिडकीतून काहीच दिसत नाही. मग डोळ्यांसाठी ती दृश्ये कागदावर आणतो. तर चित्रास कारण की, आज खूप डोंगर दिसलेले आणि घाईघाईने माझा हात कागदावर पट्टीने त्रिकोणी आकार काढत गेला.
सर्व झाल्यावर नाकाने डोळ्याला टपली मारत पाहिलेल्या डोंगराचा आकार आठवायला सांगितला. अर्रर… एका पाहिलेल्या डोंगरावर अनेक घरे बांधल्याने त्रिकोण दिसतच नव्हता. तलावाकाठी असलेला डोंगर प्रतिबिंबासह चौकोनी झालेला. पिवळाधम्मक डोंगर पावसाने हिरवा झालेला. काही डोंगरांवर केस उगवल्यासारखी झाडे होती. केकसारखा उभा कापलेला डोंगर, घाट रस्त्याची वळणे असणारा डोंगर, पोखरून बोगदे केलेला डोंगर, जाळीने बांधलेला डोंगर, ठोकळ्यासारखे १०० बंगले बांधलेला डोंगर… या साऱ्यात त्रिकोण कुठे उरलेले?
हेही वाचा…बालमैफल : सुट्टीतली कमाई
मग जे दिसतंय तेच आकार काढायला घेतले. पण जसे आहेत तसे येईचना. रेल्वेच्या हलण्याने माझ्या रेषा हलत्या येऊ लागल्या. रंगही इकडेतिकडे जाऊ लागले. आधी राग आला, पण मग मज्जा आली.
हेही वाचा…बालमैफल : जाणीव
आपली चित्रे म्हणजे फोटो आहेत का? जसेच्या तसे काढायला आपण कॅमेरा आहोत का? नाहीच. पत्राला उत्तर म्हणून तू कशी चित्रे काढून पाठवणार आहेस? तीच ती की नवी? शाळेत जाताना बसगाडीत बसून तुझ्या नाकाला वेगळे काही दिसते का?
shriba29@gmail.com