प्राची मोकाशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
mokashiprachi@gmail.com
‘‘मयूरा, जाहिरात पाहिलीस नोटीस बोर्डावरची?’’ महाबळसरांनी मयूराला स्टाफरूममध्ये बोलावून विचारलं.
‘‘हो, सर! मुंबई फर्स्ट क्लास क्रिकेट टीमचे माजी क्रिकेटपटू वेर्णेकरसर मुला-मुलींकरिता क्रिकेटचं ‘ट्रेनिंग’ देणार आहेत मुंबईला!’’ मयूरा म्हणाली.
‘‘त्यांनी तुला निवडलंय!’’
‘‘काय? कसं?’’
‘‘गेल्या आठवडय़ात तालुक्याला झालेल्या मॅचमध्ये तुझी बॅटिंग पाहून त्यांनी तडक निर्णय घेतला.’’ मयूराने त्या मॅचमध्ये बिनबाद ८६ रन्सची दमदार खेळी करत शाळेला फायनल मॅच जिंकून दिली होती.
‘‘वेर्णेकरसरांबद्दल मी खूप वाचलंय गुगलवर! त्यांची मोठी अॅकॅडमी आहे मुंबईला!’’
‘‘तू या ट्रेनिंगमध्ये नक्की भाग घ्यायला हवास. तुझा खेळ अजून ‘इम्प्रूव्ह’ होईल. नवीन प्रतिस्पध्र्याशी खेळायलाही मिळेल.’’
‘‘सर, मला नाही जमायचं!’’ मयूराचं हे उत्तर ऐकून महाबळसरांना आश्चर्य वाटलं.
‘‘का? तू आपल्या शाळेच्या क्रिकेट टीमची कॅप्टन आहेस. उत्तम बॅट्समन आहेस. ही चांगली संधी आहे तुझ्यासाठी! वेर्णेकरसरांच्या अॅकॅडमीमध्ये मुळात निवड होणंच खूप अवघड आहे आणि इथे तुला समोरून संधी चालून आलीये! आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करणं वेगळं आणि ट्रेनिंगसाठी मुंबईला जाणं वेगळं. ज्यांना ‘नॅशनल लेव्हल’ आणि पुढे खेळायचं असेल त्यांच्यासाठी ही नक्कीच चांगली संधी आहे. का? तुला नाही जायचंय पुढे? आपल्या गावापुरतंच सीमित राहायचंय? मला माहितीये क्रिकेट तुझं पॅशन आहे. ही संधी सोडू नकोस.’’
‘‘पण अभ्यास बुडेल.’’
‘‘शाळेचा तुला पूर्ण पाठिंबा आहे!’’
‘‘तरी नको सर!’’ मयूरा पुढे काहीच बोलली नाही. ती तिचं मन मारत होती असं सरांना वाटून गेलं..
०
‘‘यशवंता, राजूच्या शाळेला का गेला होतास?’’ मयूराची आजी तांदूळ निवडता निवडता तिच्या बाबांना विचारत होती. मयूराचा धाकटा भाऊ राजू तिथेच बदाम-सत्तीचा डाव मांडून बसला होता. मयूरा तिच्या आईला स्वयंपाकात मदत करता करता बाहेरचं संभाषण ऐकत होती. महाबळसरांनी तिच्या बाबांना शाळेत भेटायला बोलावलं होतं. त्यामुळे तिथे काय झालं याची मयूराला खूप उत्सुकता होती.
‘‘मयूरासाठी गेलो होतो शाळेत.’’ बाबा म्हणाले.
‘‘काय भानगड केली पोरीने?’’ मयूराच्या बाबांना आजीच्या कपाळावरच्या आठय़ा स्पष्ट दिसत होत्या.
‘‘भानगड कशाला करेल? तिची निवड झालीये क्रिकेटच्या ट्रेनिंगसाठी.’’ बाबांनी आजीला सगळं सविस्तर सांगितलं. इथे स्वयंपाकघरात आईला हे ऐकून इतका आनंद झाला की तिने तिच्या पिठाच्या हातानेच मयूराचा गालगुच्चा घेतला. मयूरा आनंदाने शहारली खरी, पण बाहेरचा सूर काही वेगळंच सांगत होता.
‘‘यशवंता, पोरीला शिकवतो आहेस हे काही कमी आहे की ही अजून नवी थेरं लावून घेतलीयेस?’’
‘‘असं का म्हणतेस?’’
‘‘तर काय! पोरींनी कसलं क्रिकेट-बिकेट खेळायचं? मी हल्ली पाहत्येय, मयूरा एकतर अभ्यास तरी करत असते नाहीतर कुठे मॅच तरी खेळायला गेलेली असते.’’
‘‘चांगलंय की! नाहीतर हा राजू- नुसते पत्ते कुटत बसलेला असतो. अभ्यास करायला नको की कुणाला मदत करायला नको पठ्ठय़ाला!’’ बाबांनी राजूच्या पाठीत एक जोरात धपाटा घातला. तसा राजू कळवळला. आजीने लागलीच त्याला जवळ घेतलं.
‘‘असा मारतोस काय पोराला? मुलाला सगळं चालतंय! पण पोरीच्या जातीने घरात मदत करावी, निवडणं-टिपणं शिकावं.’’
‘‘घरचं सगळं अगदी आनंदाने बघते मयूरा. अभ्यासात हुशार आहे. पहिल्या पाचांत नंबर असतो नेहमी. तालुक्याची क्रिकेट चॅम्पियन आहे. शाळेच्या टीमची कर्णधार आहे.’’ बाबा अभिमानाने म्हणाले. पण आजीला त्याचं काहीच कौतुक नव्हतं. मयूराला ते चांगलंच माहीत असल्याने तिला ट्रेनिंगसाठी घरून परवानगी मिळण्याची खात्रीच नव्हती.
‘‘राजूसाठी कर की सगळं! तो आपल्या वंशाचा दिवा..’’ आजी बोलताना मयूराच्या बाबांनी तिला थांबवलं.
‘‘दिवा कसला, दिवटा आहे! वंशाचा दिवाच फक्त प्रकाश देतो काय? वंशाची पणती नाही? दिवाळीला याच पणत्या सगळा शिवार उजळून काढतात.. त्याचं काही नाही का? मला महाबळसरांचं म्हणणं एकदम पटलंय. मुलगी असली तरी मयूराला राजूइतकीच.. अहं, त्याच्यापेक्षा जास्त संधी मिळायला हवी. तिची आहे तेवढी योग्यता. माझी लेक ट्रेनिंगसाठी जाणार मुंबईला..’’ बाबा ठामपणे म्हणाले. हे ऐकताच मयूराने स्वयंपाकघरातून धावत येऊन बाबांना घट्ट मिठी मारली.
०
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेर्णेकरसरांनी गावागावांतून खेळणाऱ्या मुला-मुलींना माफक शुल्क आकारून ट्रेनिंग देण्याचा पंधरा दिवसांचा उपक्रम सुरू केला होता. ट्रेनिंगसाठी मुंबईला पोहोचल्यावर मयूराला जाणवलं की २० जणांच्या त्या शिबिरामध्ये ती एकटीच मुलगी होती.
प्रॅक्टिस सेशनसाठी मयूराने तिच्या क्रिकेट किटमधून तिची आवडती बॅट घेतली आणि ग्राउंडवर लावलेल्या नेट्समध्ये बॅटिंग करण्यासाठी ‘स्टान्स’ घेतला. काही मुलं बॉलिंग करत होती. वेर्णेकरसर आणि इतर प्रशिक्षक सगळ्यांचा सराव पाहात होते. एका मुलाने मयूराला टाकलेले पहिले दोन्ही ‘फास्ट’ बॉल्स मयूराला खेळता आले नाहीत. पुढच्या दोन बॉल्सला ती ‘क्लीन-बोल्ड’ होता होता वाचली. तेव्हा बॉल टाकणारा मुलगा छद्मीपणे हसला. ते पाहून मयूरा थोडी डगमगली, पण धीर एकवटून तिने पुन्हा स्टम्प्सपुढे ‘स्टान्स’ घेतला. पुढचा बॉल तिने व्यवस्थित ‘कट’ केला. जवळच उभे असलेल्या वेर्णेकरसरांनी तिची प्रशंसा करत टाळ्या वाजवून मयूराला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे तो बॉलिंग करणारा मुलगा वैतागला, पण सर उभे आहेत याचं भान ठेवून गप्प राहिला. त्यानंतरचं सेशन मात्र मयूराने व्यवस्थित खेळून काढलं. पहिल्या दिवसाचं सेशन संपल्यावर मयूरा तिचं किट घेऊन हॉस्टेलच्या दिशेने जात होती तेव्हा..
‘‘काय दिवस आलेत मित्रा! आता मुलींशी क्रिकेट खेळावं लागतंय आपल्याला.’’ बॉलिंग टाकणाऱ्या त्या मुलाने दुसऱ्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत मयूराला ऐकू जाईल इतक्या मोठय़ा आवाजात शेरा मारला. हे ऐकून त्याच्याबरोबर असलेली इतर मुलंही जोरात हसू लागली.
‘‘म्हणे, ही तिच्या शाळेच्या क्रिकेट टीमची कॅप्टन आहे!’’ ग्रुपमधला एकजण म्हणाला.
‘‘इथे इतक्या सहज सिलेक्ट होऊन आलीये आणि आम्ही वर्षांनुवर्षे प्रयत्न करतोय.’’ बॉलिंग करणारा मुलगा कुत्सितपणे म्हणाला.
‘‘ताई, तुमच्या नाजूक हातांना क्रिकेट बॅट नाही पेलवणार! जा, घरी जा! विसरून जा क्रिकेट वगैरे.’’ अजून एकाने टोमणा मारला.
मयूरा त्यांना काही म्हणणार इतक्यात तिचं लक्ष ग्राउंडच्या कम्पाउंड वॉलवर रंगवलेल्या भित्तिचित्राकडे गेलं. अनेक समाजसुधारकांची चित्रं तिथे रेखाटली होती. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा आणि सावित्रीबाई फुले, ज्ञानेश्वर, तुकाराम.. त्या मुलांकडे दुर्लक्ष करून मयूरा कम्पाउंड वॉलजवळच्या एका बाकावर बसली. ती विचारांत गढून गेलेली असताना वेर्णेकरसर शेजारी येऊन बसले.
‘‘काय विचार करतेस?’’ सरांच्या प्रश्नाने मयूरा भानावर आली.
‘‘काही नाही!’’
‘‘त्या मुलांच्या बोलण्याने घाबरलीस?’’
‘‘सर, तुम्हाला..’’
‘‘मी जवळच होतो. ऐकलं मी सगळं. घाबरू नको, त्यांना एकदा वॉìनग देऊन सोडलंय. पण त्यांनी पुन्हा असंच केलं तर त्यांची खैर नाही!’’
‘‘घाबरले नाही. वाईट वाटलं. अॅकॅडमीला ट्रेनिंगला येता येईल याचीच मला खात्री नव्हती. सुदैवाने पाठीशी बाबा आहेत म्हणून मला ही संधी मिळाली. नाहीतर माझ्या आजीच्या लेखी मुलींना शिक्षण, मुलींच्या आवडीनिवडी, मुलींची मतं यांना काही किंमतच नाहीये. हे सगळं फक्त मुलांसाठी.’’
‘‘जुनी पिढी आहे ती!’’
‘‘मी थोरली. माझा जन्म झाला तेव्हा आजी मला बघायलाही आली नव्हती, कारण तिला पहिला नातू हवा होता. आणि धाकटा भाऊ झाला तेव्हा तिने अख्ख्या गावात पेढे वाटले होते. भाऊ होईपर्यंत माझ्या आईला किती ऐकावं लागलं होतं! तुम्ही म्हणता आजीची जुनी पिढी, पण या मुलांचाही सूर हाच होता की ‘मुली काय क्रिकेट खेळणार?’ ती तर माझ्याच पिढीची नं?’’
‘‘हे बघ, जो प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो त्याला विरोध पत्करावा लागतोच. कर्तृत्ववान माणूस कुणालाच आवडत नाही. त्यात ती मुलगी असेल तर अजूनच चालत नाही.’’
‘‘म्हणजे, शंभरएक वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुलेंनी जे सहन केलं, स्त्रिया आजही तेच सहन करताहेत!’’
‘‘कारण समाजाची मानसिकता अजूनही बदलत नाहीये!’’
‘‘गुगल करताना वाचलं होतं की २४ जानेवारी हा ‘नॅशनल गर्ल चाइल्ड डे’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी १९६६ मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या. पण ‘मुलगी जगवा, मुलगी शिकवा’ ही लोकांमध्ये जागरूकता आणायला आजही असा एक दिवस नेमावा लागतोय हे चांगलं की वाईट?’’
‘‘जोपर्यंत आपला समाज सुधारत नाही, तोपर्यंत हे करणं गरजेचं आहेच. २६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन! राज्यघटनेत पुरुषांप्रमाणे स्त्रियांसाठीही समान अधिकार नमूद केले आहेत. पण कुठे पाळले जातात ते? मात्र याबद्दल स्त्रियांनी नक्कीच जागरूक असायला हवं. आपल्या समाजात जशी तुझी आजी आहे, तसेच तुझे बाबा, महाबळसरही आहेत- जे मुलींना पुढे येण्याच्या संधी देताहेत.’’
‘‘आणि तुम्हीसुद्धा, सर!’’ मयूरा बऱ्याच वेळाने मनापासून हसली.
‘‘मयूरा’ म्हणजे ‘मोर’ नं? एक म्हण आहे- ‘बदकांच्या जगात मोर बनून जगा!’ आपली ‘आशा’पण एखाद्या मोरपिसासारखी असते, जी सतत जाणीव करून देते की आपल्यालाही पंख आहेत, भरारी घेण्यासाठी!’’
०
२६ जानेवारीला, सकाळी सात वाजता ग्राउंडवर ध्वजारोहण झाल्यावर नेट प्रॅक्टिसला सुरुवात झाली. मयूराने स्टम्प्सपुढे ‘स्टान्स’ घेतला. बॉलिंग करणारा पुन्हा आदल्या दिवशीचाच मुलगा होता. पण यावेळी मयूरा डगमगली नाही. येणाऱ्या ‘फुलटॉस’वर तिने बॉलरच्या डोक्यावरून बॉल ‘लाँग-ऑन’वर मारत सीमापार केला. त्या उंच जाणाऱ्या बॉलसारखा मयुराच्या मनाचा झोकाही आता उंचच उंच गेला होता.