|| मेघश्री दळवी
आपण माणसं अवकाशात यानं पाठवतो. शिवाय, दुर्बिर्णीमधून सतत अवकाशाचा वेध घेत असतो. त्यात नवे ग्रह सापडले की लगेचच मनात प्रश्न उभा राहतो- कुणी आहे का तिथे? आपल्यासारखा एखादा बुद्धिमान सजीव, नाहीतर किडामुंगीसारखे छोटे जीव? काहीच नाही तर निदान जिवाणू-विषाणू तरी?
इतक्या प्रचंड अवकाशात फक्त आपल्या पृथ्वीवर सजीव असतील हे पटायला कठीण वाटतं. म्हणूनच आणखी कुठेतरी जीवसृष्टी असेल का, हा शोध सतत सुरू असतो. त्यासाठी कोणते ग्रह योग्य ठरतील, तिथलं तापमान कोणतं असावं, वातावरणात कोणते वायू असतील.. अशा एक ना अनेक प्रश्नांचा ऊहापोह केला जातो. गेल्या पन्नास वर्षांमध्ये असा अभ्यास करणारी एक शाखाच उदयाला आली आहे. ती म्हणजे- ‘अॅस्ट्रोबायोलॉजी’!
एकूणच सजीवांचा उगम कुठे आणि कसा होतो, ते कसे उत्क्रांत होत जातात, ही पृथ्वीवरची निरीक्षणं अवकाशात लागू होतील का? तिथे जीवांचा उगम वेगळा असेल, की आपल्यासारखाच? त्यांच्या पेशी निराळ्या असतील का? डीएनए कसे असतील? या सगळ्यांचा वेध अॅस्ट्रोबायोलॉजीमध्ये घेतला जातो. त्यात जीव, रसायन, खगोल, भौतिक, भूगोल, पर्यावरण असा बऱ्याच शास्त्रांचा सहभाग असतो. इतकंच काय तर, योग्य असे ग्रह मिळण्याची शक्यता काढायला गणिताचा आधारही घेतला जातो.
आता या तऱ्हेतऱ्हेच्या शास्त्रांमधल्या भाराभर माहितीचा फडशा पाडायचा म्हटलं की संगणक हवाच. आणि हल्ली तर तिथे शिरकाव झाला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा- ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा! सगळी उपलब्ध निरीक्षणं वापरून हे गुंतागुंतीचे प्रोग्रॅम्स शिकतील आणि त्या अनुभवावरून तिथे कुणी आहे का, याचा अंदाज बांधतील. मग तिथे दुर्बिणी रोखून आणखी माहिती मिळवता येईल.
सूर्यमालेच्या पलीकडला पहिला ग्रह सापडला १९९५ मध्ये. तेव्हापासून गेल्या तेवीस वर्षांत अॅस्ट्रोबायोलॉजीमध्ये झपाटय़ाने संशोधन होतंय. काय सांगावं, येत्या काही वर्षांत कुणीतरी खरोखरीच सापडेल आपल्याला अवकाशात!
meghashri@gmail.com