आजचे आपले कोडे श्री. साठे, श्री. वैद्य, सौ. गोखले या तीन शिक्षकांबद्दल आहे. त्यांचे वय ३०, ३५, आणि ४० यापैकी आहे. अक्षय, अतुल आणि अनन्या यांच्यापैकी एक विद्यार्थी प्रत्येकाचा लाडका आहे. खाली दिलेल्या सूचक माहितीनुसार कोणता विद्यार्थी कोणाचा लाडका आहे आणि कोणत्या शिक्षकाचे वय काय आहे ते तुम्हाला शोधायचे आहे
सूचक माहिती-
१) सर्वात जास्त वय असलेल्या शिक्षकाला अतुल आवडतो.
२) श्री. साठे यांचे वय सर्वात जास्त किंवा सर्वात कमी नाही.
३) श्री. साठे यांचा लाडका विद्यार्थी अक्षय नाही.
४) सौ. गोखले सगळ्यात जास्त वयाच्या शिक्षिका नाहीत.
*********************
कसे सोडवाल?
१. साठे यांचे वय सर्वात जास्त वा सर्वात कमी नाही, म्हणजेच ते ३५ वर्षांचे आहेत.
२. अक्षय हा साठय़ांचा लाडका विद्यार्थी नाही आणि सर्वात जास्त म्हणजे ४० वय असलेल्या शिक्षकाला अतुल आवडतो. म्हणजेच अनन्या साठय़ांची लाडकी विद्यार्थिनी आहे.
३. सौ. गोखले सर्वात जास्त वयाच्या शिक्षिका नाहीत आणि साठे ३५ वर्षांचे असल्याने गोखले यांचे वय ३० असायला हवे. म्हणूनच वैद्य ४० वर्षांचे असले पाहिजेत.
४. म्हणजेच अक्षय हा सौ. गोखल्यांचा लाडका असणार.