‘‘या सुट्टीत काहीतरी वेगळं करायला हवं आपण,’’ सोहम उन्मेषला स्ट्रायकर देत म्हणाला.
‘‘हो ना! सकाळ-संध्याकाळ क्रिकेट, फुटबॉल वगरे चालू असतंच आपलं; पण दुपारच्या वेळेत नवीन काहीतरी शिकायला हवं,’’ असं म्हणत उन्मेषने क्वीन घेण्यासाठी नेम धरला आणि ती बरोब्बर पॉकेटमध्ये गेली.
‘‘येस२२२२. आता कव्हर पण घेऊन टाक.’’ उन्मेषचा पार्टनर चतन्य म्हणाला.
‘‘हल्ली आपण कॅरम, स्क्रेबल तरी खेळतोय दुपारचं. नाहीतर आधी नुसते कार्टून्सच बघत बसायचो. कसलं डोकं भणभणायचं नंतर!’’ उन्मेषने कव्हरही घेतलं.
‘‘सही२२२२. २९-१८. तुम्ही जिंकलात बोर्ड! खरंय तुम्ही म्हणताय ते! पण नवीन काहीतरी.. म्हणजे काय?’’ तन्मय जांभई देत म्हणाला. आराम खुर्चीवर बसलेले आजोबा मुलांची ही चर्चा पेपरामागून ऐकत होते.
‘‘काय रे मुलांनो, चहा घेणार की सरबत?’’ आजी चहा करायला बाहेर आली.
‘‘उन्हाळ्याचा चहा? नको. सरबतच कर.’’ सोहम म्हणाला.
‘‘आज्जी२२२२२!’’ सोहमची धाकटी बहीण रेवा, तिच्या मत्रिणी – जुई आणि मिथिला, लोटलेलं दार उघडून, वादळासारख्या घरात शिरल्या.
‘‘आम्हाला बाहुला-बाहुलीचं लग्न लावायचंय.’’ आजीला जरा आश्चर्यच वाटलं.
‘‘अरे व्वा! कोणाची ही आयडिया?’’
‘‘आम्ही आत्ता जुईच्या आईचे, बाहुला-बाहुलीचं लग्न लावतानाचे फोटो बघितले. आम्हाला खूप गम्मत वाटली.’’
‘‘पण कुणाकडे बाहुल्या आहेत तरी का?’’ तिघींनीही नकारार्थी मान डोलावली.
‘‘मग? कसं करायचं लग्न?’’
‘‘का? विकत आणू की आपण त्या ब्रायडल-किटवाल्या बाहुल्या.’’ रेवा म्हणाली.
‘‘त्यात काय मजा?’’ आजोबा पेपर बाजूला ठेवत म्हणाले. आता मुलंही ऐकायला लागली.
‘‘तुम्ही स्वत:च बनवा की बाहुला-बाहुली! मुलांनो, तुम्हालाही काहीतरी नवीन करायचं होतंच नं? दुपारी घरबसल्या करा एकत्र मिळून बाहुल्या!’’
‘‘छ्या! आम्ही नाही खेळणार मुलींचा खेळ!’’ सोहम फटकून म्हणाला.
‘‘नका खेळू. पण पपेट बनवायला त्यांना मदत तर कराल!’’
‘‘पपेट? म्हणजे, तुम्ही बनवलेले, माळ्यावरच्या ट्रंकेत आहेत तसे?’’
‘‘हो’’
‘‘आजोबा, पूर्वी आमच्या बर्थडेला तुम्ही नेहमी पपेट शो करायचात. हल्लीच नाही करत.’’ रेवा म्हणाली.
‘‘अगं, हात दुखतो नं माझा, म्हणून नाही करत. थांब आपण ती ट्रंक खाली काढू.’’ सोहमने आणि तन्मयने मिळून ट्रंक खाली काढली. ट्रंक उघडली तर त्यात एक अजब दुनिया होती. वेगवेगळ्या पोषाखातली माणसं, बायका, मुलं, मुली. इतकंच नव्हे, तर ससा, कासव, हत्ती, जिराफ, अशी अगणित प्राण्यांची पपेट्स. आणि त्यांना लागणारं साहित्यही होतं- दोऱ्या, मोजे, ग्लोव्स, कापडाचे तुकडे, बटणं, लोकरीचे धागे, रंगीत कागद, पुठ्ठे, केवढं तरी!
‘‘पण हे खूप अवघड असतं नं? आम्हाला जमेल?’’ उन्मेष शंका घेत म्हणाला.
‘‘अरे, मी शिकवेन की तुम्हाला! आधी एखादं करून बघा. आवडलं तर करा अजून!’’ आजोबा म्हणाले. मुलं तयार झाली. आजोबांना बऱ्याच दिवसांनी आलेला हा उत्साह पाहून आजीलाही बरं वाटलं.
दुसऱ्या दिवशी दुपारी मुलं आपापल्या घरातले जुने मोजे घेऊन आली. आजोबांचं साहित्य तयार होतंच. ‘‘छान! आधी मी एक पपेट बनवतो. ते बघून तुम्ही बनवा.’’
आजोबांनी एक लांब, पांढऱ्या रंगाचा पायमोजा असा हातात घातला, की हाताची बोटं पायाच्या बोटांच्या जागेवर गेली आणि अंगठा टाचेच्या जागेवर. डाव्या हाताने त्यांनी बोटं आणि अंगठय़ामधलं कापड थोडं आतल्या बाजूला दुमडलं आणि अंगठा-बोटांची उघडझाप केली. हे बनलं पपेटचं तोंड! मोज्याच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी काळ्या बटनांचे डोळे चिकटवले, काळ्या लोकरीचे धागे कापून केस लावले. मग ते स्वत: सोफ्याच्या मागे जाऊन लपले. हळूच पपेटला सोफ्याबाहेर उंच काढत त्यांनी आवाज बदलला आणि बोटं हलवत त्या पपेटला बोलतं केलं. मुलांसाठी हे नवीनच होतं. त्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.
‘‘आता तुम्ही बनवून बघा,’’ असं म्हणत आजोबा बाहेर आले. दुपारभर मग सगळ्यांनी मिळून निळ्या-ग्रे रंगाच्या, ठिपक्यांच्या, चटेरी-पटेरी, अशा वेगवेगळ्या मोज्यांपासून बिबटय़ा, हत्ती, झेब्राचे पपेट बनवले. ते बनवताना त्यांना सॉल्लीड धम्माल येत होती.
‘‘पण हे बाहुला-बाहुली नाही वाटत.’’ रेवा कुरकुरली.
‘‘अगं, आत्ताशी बेसिक शिकलात तुम्ही! या पपेटचे कित्तीतरी वेगवेगळे प्रकार आहेत. आपण सुरुवात सोप्याने केली आणि आता तुम्हाला आवडलं, तर आपण नवीन नवीन पपेट बनवू, त्यांना सजवू.’’
‘‘हो आजोबा! आम्हाला मज्जा येतेय. आम्हाला अजून शिकवा!’’ उन्मेष म्हणाला.
‘‘आजोबा, तुम्हाला कशी येतात पपेट बनवायला?’’ मिथिलाने विचारलं.
‘‘मला लहानपणापासूनच आवड होती. दर सुट्टीत मी ती डेव्हलप करत गेलो.’’
‘‘माझ्याकडे बरीच मखमलीची, जरीची कापडं आहेत. फ्रिल्स, लेसेस आहेत. आजोबा सांगतील तसं आपण बाहुला-बाहुलीचे मस्त शेरवानी, शरारा वगरे शिवूया.’’ आजी म्हणाली.
‘‘माझं दागिने बनविण्याचं पेपर-क्वििलगचं किट नुसतंच पडून आहे. आपण बाहुला-बाहुलीसाठी दागिने आणि फुलांचे हार त्यांतून बनवू’’ मिथिला म्हणाली.
‘‘पेपर-क्वििलग म्हणजे काय?’’ जुईने विचारलं.
‘‘अगं, वेगवेगळ्या रंगांच्या कागदांच्या पट्टय़ा असतात. एक जाडसर सुई असते. त्यावर तो कागद रोल करून आपल्याला हवे तसे आपण झुमके, माळ, फुलं, हार वगरे बनवू शकतो.’’
‘‘अरे व्वा! हे छान आहे की!’’ रेवा म्हणाली. आता मुलांचाही उत्साह वाढला.
‘‘बाहुला घोडय़ावर बसून येणार नं? आजोबा, आपण घोडय़ाचं पपेट बनवू.’’ तन्मय म्हणाला.
‘‘मग आमच्या बाहुलीलापण डोली पाहिजे.’’ मिथिला म्हणाली.
‘‘माझ्याकडे डोली बनवण्याची कृती आहे. आपण बघून बघून करू.’’ जुई म्हणाली.
‘‘मुंडावळ्या आणि अंतरपाट? त्यासाठी मणी, गोंडे ओवायला लागतील. आपण अंतरपाटावर छोटीशी अॅम्ब्रॉयडरीही करू या.’’आजी म्हणाली.
‘‘आपण एक भटजीचापण पपेट बनवू.’’ सोहम म्हणाला. त्यावर सगळे हसले.
‘‘चला! पुढच्या रविवारी, संध्याकाळी सात वाजताच्या शुभ मुहूर्तावर, बाहुला-बाहुलीचं शुभमंगल लावून टाकू!’’ आजोबा टाळी वाजवत म्हणाले.
जवळच्याच मार्केटमधून मुलांनी सगळं लागणारं साहित्य आणलं – कात्र्या, फेव्हिकॉल, कापड, मोजे, मणी, गोंडे, टिकल्या, कागद.. आता सर्वजण रोज दुपारी बसून बाहुला-बाहुलीचे पपेट बनवायला शिकू लागली. पपेटची एन्ट्री, एग्झिट, हालचाली, हावभाव, ताळमेळ आजोबांनी शिकवलं. सगळी आपापल्या घरीही प्रॅक्टिस करत होती. आधी बऱ्याच चुका झाल्या, पण हळूहळू जमायला लागलं.
आजीने पपेटचे कपडे शिवून दिले. मुलींनी दागिने, हार, मुंडावळ्या बनवल्या. दोन-तीन दिवसांत, नटून-सजून, बाहुला-बाहुली तयार होते. भटजीचं पपेट बनलं. घोडा आणि डोली तयार झाले, अंतरपाट सजला. आजीने सर्वाना मंगलाष्टकं आणि काही पारंपरिक गाणी शिकवली. लग्न सोहळ्याची रंगीत तालीमही झाली. बिल्िंडगमधल्या सगळ्यांच्या घरच्यांना लग्नासाठी आमंत्रणं गेली.
लग्नाच्या दिवशी बििल्डगच्या गच्चीवर आजोबांनी साडीचा पडदा तयार केला, ज्याच्यामागे बसून मुलं पपेट शो सादर करणार होती. मुलांचे बाबालोक मदतीला होतेच. आई वर्गाने लग्नाच्या रिसेप्शनकरिता आंबा डाळ-वडे-पन्हे असा बेत घरीच तयार केला. मुलांनी मिळून गच्ची सजवली. संध्याकाळी सहाच्या सुमारास, पाहुणे यायला सुरुवात झाली. सगळ्यांच्या हातात रंगीत कागदाने बनविलेल्या अक्षता देण्यात आल्या.
बरोब्बर सात वाजता मोठय़ा रुबाबात घोडय़ावरून बाहुला आला. बाहुलीची डोली आली. दोघे उतरून समोरासमोर उभी राहिली; मध्ये अंतरपाट. भटजीबुवांनी मंगलाष्टकं गायली. अंतरपाट काढला आणि वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातल्या. सगळ्यांनी अक्षता टाकल्या आणि टाळ्या वाजवल्या. मुलींनी पारंपरिक गाण्यांवर सुरेख नाच केला आणि मुलांनी त्यावेळी पपेट नाचवले. सर्वानी अगदी सफाईदारपणे संपूर्ण पपेट शो सादर केला.
पाहुण्यांनी डिशवर मस्त ताव मारला. सगळ्यांनी मुलांच्या या वेगळ्या प्रयत्नांचं भरभरून कौतुक केलं..
दुसऱ्या दिवशी आजोबा मॉìनग वॉक घेऊन आले तर एकदम खुशीत दिसत होते. ‘‘सोहम-रेवा, पटकन आपल्या टीमला बोलवा. एक मस्त न्यूज आहे. सगळ्यांना एकत्र सांगायची.’’ दोघं इतरांना बोलवायला पळाले. थोडय़ाच वेळात, सगळे भराभर आवरून जमले.
‘‘पहिल्या मजल्यावरच्या गडकरींना त्यांच्या मुलाच्या पाचव्या वाढदिवसाकरिता तुमचा पपेट शो ठेवायचाय. म्हणत होते, त्यांना कालचा शो खूपच आवडला!’’
‘‘सही२२२२.’’ सगळी एकत्र ओरडली.
‘‘मग करणार नं एक नवीन पपेट शो?’’
‘‘म्हणजे हाच ना!’’
‘‘अं हं. आता नवी थीम.’’
‘‘वाढदिवस कधी आहे?’’
‘‘येत्या रविवारी.’’
‘‘पण आपल्याकडे पाच-सहा दिवसच आहेत, आजोबा.’’
‘‘मग काय झालं? ही एक संधी आहे!’’
‘‘आजोबा, आपण ससा-कासव शर्यत किंवा बुडबुड घागरी, अशा काही गोष्टी घेऊन शो करू या?’’
‘‘बेस्ट! तुम्हाला सुचतंय हेच महत्त्वाचं. पंचतंत्र, ईसापनीतीमधील किंवा तुम्हाला आवडतील अशा २-३ गोष्टी निवडा. त्या गोष्टींना लागतील ती नवीन पपेट आपण बनवू आणि त्यांचे १०-१० मिनिटांचे शो तयार करू. सुट्टीत अजून अशा ३-४ शोच्या थीम तयार ठेवू..’’
आजोबा मिश्कीलपणे हसले. मुलंही भलतीच आनंदात होती. त्यांचा हा आनंद नक्कीच काहीतरी निराळा होता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा