डॉ. नंदा हरम
एखादी चांगली गोष्ट दिसली की आपण हरखून जातो. त्यातून काही संकट उद्भवेल याची कल्पनाही नसते. निसर्गातही नेमकं हेच घडतं. मग म्हणायची वेळ येते ‘वर झगझग आत भगभग’. मग मोठी पंचाईतच होते, कशी ते बघूया आजच्या लेखात.
व्हीनस-फ्लॅय-ट्रॅप ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. कीटकांकरिता असलेला सापळा दुसरं-तिसरं काही नसून तिचं पानच असतं. आश्चर्य वाटतंय ना? पानाचे दोन भाग असतात. देठाचा भाग चपटा, हृदयाकृती व प्रकाशसंश्लेषण करणारा असतो, तर त्याच्या टोकाला दोन कानांच्या पाळीसारखे भाग मधल्या शिरेला जोडलेले असतात(चित्र पाहा). हेच खरं पान असतं. या पानाचा वरचा पृष्ठभाग अॅन्थोसायनिन या रंगद्रव्यामुळे लाल रंगाचा दिसतो, तर पानाच्या कडा श्लेष्मल द्रव (mucilage) स्रवतात. चित्रात दाखविल्याप्रमाणे या पानाच्या दोन्ही पाळीसारख्या भागांवर प्रत्येकी तीन दंशप्रवर्ध असतात, तर कडेला रेमक (cilia) असतात. याच भागाचा सापळा तयार होतो.
हा सापळा बंद कसा होतो ते आपण बघणारच आहोत. पण कीटकांची फसगत कशी होते बघा! त्यांना हे लाल रंगाचं पान फुलासारखं वाटतं व मधाच्या आशेने ते त्यावर येऊन बसतात. तसेच पान उघडल्यावर त्याचा गोडसर वास सगळीकडे पसरतो. त्यामुळेच कीटक या पानावर आकर्षति होतात. दंशप्रवर्धाला त्यांच्या पायाचा स्पर्श होतो. पानांना सजीव व निर्जीव वस्तूंमधील फरक नेमका समजतो, कारण दोन दंशप्रवर्धाना २० सेकंदांच्या आत स्पर्श झाल्यास किंवा एका दंशप्रवर्धाला एकापाठोपाठ स्पर्श झाला, तरच तो सापळा एकदशांश सेकंदाच्या आत बंद होतो. लक्षात घ्या, निसर्ग आपली ऊर्जा कोणत्याही प्रकारे वाया घालवत नाही. कारण पाण्याचा थेंब पानावर पडला, तर त्याचा काय उपयोग?
चित्रात दाखविल्याप्रमाणे, पानाच्या कडेला असलेले रेमक एकमेकांत घट्ट बसतात, ज्यामुळे आत अडकलेला कीटक बाहेर पडू शकत नाही. कीटक अगदी छोटा असेल तर तो बाहेर पडू शकतो. हे वनस्पतीच्या पथ्यावरच पडतं, कारण त्यापासून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा त्याचं पचन करण्याची किंमत जास्त असते. सापळ्यात अडकलेला कीटक आत गोलगोल फिरू लागला की सापळा घट्ट बंद होतो आणि पचनक्रियेला सुरुवात होते. सापळा १२ तासांनंतर परत उघडतो. या कीटकभक्षी वनस्पतीचे मुख्य भक्ष्य म्हणजे ३३% मुंग्या, ३०% कोळी, १०% भुंगे, १०% टोळ आणि ५ टक्क्यांहून कमी उडणारे कीटक होत.
मी इथे व्हीनस-फ्लॅय-ट्रॅप या वनस्पतीची माहिती दिली. याचप्रमाणे ड्रॉसेरा, पिचर प्लांट, युट्रिक्युलॅरिआ या कीटकभक्षी वनस्पती आहेत. यांच्या बाबतीत ही म्हण लागू पडते का? शोधाल का?
(समाप्त)
nandaharam2012@gmail.com