बाबा विश्वासाने मोहीतला सांगत होते, ‘‘तुझ्या आईचा सल्ला म्हणजे ‘विदुरनीती’ असते. डोळे झाकून विश्वास ठेव आणि त्याप्रमाणेच कर.’’
‘‘म्हणजे नेमके काय हो बाबा?’’ असे विचारावे वाटले त्याला. पण एक मन म्हणत होते, ‘‘लगेच वाचनाची आवड नाही तुम्हाला.’’ यावर घसरणार बाबा. पण तरी विचारलेच त्याने. आज मात्र बाबांनी लेक्चर न देता नेमका मुद्दा सांगितला.
विदुर हा महाभारतातील धृतराष्ट्राच्या दरबारातील एक मंत्री. तो दासीपुत्र होता. महर्षि व्यास त्याचे पिता. विदुर अतिशय बुद्धिमान आणि विचारी होता. म्हणून राजा नेहमी त्याचा सल्ला घेई. तो अतिशय नि:स्वार्थी बुद्धीने आणि विवेकपूर्ण रीतीने, भविष्यात त्याच्या होणाऱ्या परिणामाचा विचार करून सल्ला देई. कौरवांनी पांडवाना द्यूत (सारीपाट) खेळण्यास बोलावले. कौरवांचा मामा शकुनी याच्या कपटामुळे पांडव हरू लागले. विदुराने ते ओळखले. खेळाचे बदलते स्वरूप पाहून विदुराने युधिष्ठिराला खेळ थांबवण्याचा सल्ला दिला. पण राजाने पुत्र दुयरेधनाच्या हट्टासाठी त्याचे ऐकले नाही. खेळात पांडव हरल्यावर अटीप्रमाणे त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासही भोगायला लावला. त्यानंतर परत आल्यावरही त्यांचे राज्य त्यांना परत न देता उलट त्यांना युद्धास आमंत्रण दिले. आणि शेवटी त्यात कौरवांचा विनाश झाला. याचा विचार करता जर त्यावेळी राजा धृतराष्ट्राने विदुराचा सल्ला ऐकला असता तर पुढचा विनाश टळला असता. पण पुत्रप्रेमाच्या मोहाने तो तसे करू धजला नाही. आणि आत्मनाश ओढवून घेतला. म्हणून जेव्हा एखादा ज्ञानी मनुष्य स्वार्थाचा विचार न करता आपली कुवत ओळखून आणि भविष्याचा विचार करून योग्य सल्ला देतो तेव्हा त्यास विदुरनीती म्हणतात.
हा सूर्य आणि हा जयद्रथ
कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांचे युद्ध चालू होते. त्यात अर्जुनपुत्र अभिमन्यू धारातीर्थी पडला. त्याला वीरमरण आले. तेव्हा कौरव सैन्यातील द्वेषाने पछाडलेल्या जयद्रथाने अभिमन्यूच्या मस्तकावर लाथ मारली. अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता ऐकून अर्जुन दु:खाने व्याकूळ झाला. त्याच वेळी त्याला संताप आला तो त्या जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा. अर्जुनाने तात्काळ प्रतिज्ञा केली. ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन, नाही तर स्वत: अग्निभक्षण करीन.’ हे ऐकताच कौरवसेना आणि जयद्रथ फारच घाबरले.
जयद्रथाला वाचविण्यासाठी कौरवांनी त्याच्याभोवती महान योद्धय़ांचे कवच उभारले. दुपार टळत आली, सूर्यास्तालाही थोडाच अवधी उरला तरी जयद्रथाचा कुठे पत्ता नव्हता.
इकडे श्रीकृष्णाला आपल्या भक्ताची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्याने आपले सुदर्शनचक्र सिद्ध करून त्याच्या सहायाने सूर्याला झाकून टाकले. सर्वाना वाटले, संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. अर्जुनही अग्निभक्षण करण्याच्या तयारीला लागला. त्याने लाकडे जमा केली. चिता पेटवली. सारे कौरवगण त्याची फजिती पाहण्यास येऊन जमले. त्यात जयद्रथही होता. अर्जुनाने धनुष्यबाण उचलले, नमस्कार केला आणि चितेत उडी घेणार एवढय़ात श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र काढून घेतले. त्यामुळे सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला. ते पाहून कौरव सैन्याचा गोंधळ उडाला. जयद्रथ तर पुरता भांबावून गेला. त्याला लपायलाही संधी मिळाली नाही. इतक्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘अर्जुना, पाहतोस काय? लाव बाण तुझ्या धनुष्याला. हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ! म्हणजेच सूर्यास्तापूर्वी जयद्रथ अर्जुनासमोर होता त्यामुळे अर्जुन त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू शकत होता. कृष्णाचे ते शब्द आसमंतात घुमले. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता जयद्रथाचा शिरच्छेद केला. अर्जुन श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त होता. म्हणून श्रीकृष्णाने भक्तासाठी संकटकाळी मदत केली. तेव्हापासून जेव्हा एखादी गोष्ट सप्रमाण सिद्ध करायची असते तेव्हा ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ असे म्हणतात.