आज आपण कॉम्प्युटरवर जे काही लिहितो ते एका बटणाने जसेच्या तसे छापून घेऊ शकतो. त्यात विशेष काही वाटत नाही. पण शोध लागल्यानंतर ती गोष्ट समजून घेणे वेगळे आणि ते शोधणे वेगळे. छपाई करणे म्हणजेच एखादे चित्र किंवा वाक्य वारंवार एकाच प्रकारे उमटवता येणे.
छपाईच्या बाबतीत मान्यतेप्रमाणे चीन हा देश पहिला मानला जातो. इ.स. पूर्व ५०० ते १००० मध्ये येथे छपाई झाल्याचा पुरावा आहे. परंतु भारत व चीन या देशांचे, शोधांची नोंद, त्यांचे पुढच्या पिढीला हस्तांतर याचे रेकॉर्ड अगदी वाईट आहे. वेरूळच्या कैलासाचे मुख्य जनक कोण, लेण्याचा अभियंता कोण, याची काहीच नोंद नाही. नि:स्वार्थ वृत्ती कौतुकास्पद, पण पुढच्या पिढय़ांना त्याची पूर्वमाहितीही आवश्यक. तर खऱ्या अर्थाने पहिल्या, सतत छापू शकणाऱ्या व यांत्रिक पद्धतीने छापणाऱ्या प्रिंटरचा शोध जर्मनीच्या गुटेनबर्ग या शास्त्रज्ञाने लावला आणि जगात नव्या क्रांतीला सुरुवात झाली. त्यापूर्वी बहुतेक पुस्तके ही हाताने लिहिलेली असत. फार फार तर लाकडात कोरीव काम करून तयार केलेल्या ब्लॉकच्या ठशांद्वारे छपाई केली जात असे. अर्थात हे काम खूप अवघड, खर्चिक आणि वेळखाऊ होते. अशा पद्धतीने तयार केलेली काहीच पुस्तके त्या वेळी जगात उपलब्ध होती. ती बहुतांश श्रीमंत व्यक्ती, धर्मगुरू यांच्याकडे किंवा विद्यापीठांमध्ये असत. ही पुस्तके इतकी मौल्यवान असायची की विद्यापीठामध्ये ती बाकाला साखळीने कुलूपबंद केलेली असत. वाचणाऱ्यांनी ती तिथेच वाचावीत. त्यांची चोरी होऊ नये म्हणून हा सर्व खटाटोप असायचा. गुटेनबर्गने छपाईची पद्धत शोधून काढली आणि हे सर्वच बदलून गेले. सर्वसामान्यांना पुस्तके आणि त्या माध्यमातून ज्ञान मिळू लागले.
गुटेनबर्गचा जन्म सधन कुटुंबात झाला होता. त्याचे आडनाव गेनफ्लाईश असे होते. पण त्याने आईकडचे गुटनेबर्ग हे नाव स्वीकारले. धातुकामाचे विशेष कौशल्य त्याने आत्मसात केले होते. त्यातूनच त्याने अक्षरांचे साचे तयार करून त्यातून धातूची अक्षरे तयार केली. अशी अक्षरे एकत्र ठेवून त्यातून शब्द, वाक्ये तयार केली. त्यावर शाई लावली आणि विशेष तंत्राद्वारे हे कागदावरून फिरवले की छपाई सुरू होत असे. अशा प्रकारे त्याने अनेक माहिती छापून तयार केली, पण तो ओळखला जातो ते त्याच्या ४२ ओळींच्या बायबलच्या छपाईमुळे. लॅटिन बायबल छापण्यासाठी त्याने १४५२ मध्ये प्रारंभ केला. १४५६ मध्ये हे काम पूर्ण झाले. १२०० पानांच्या या पुस्तकासाठी त्याला खूपच परिश्रम घ्यावे लागले, पैसा खर्च करावा लागला. पण या शोधामुळे त्याला त्या काळात काहीही फायदा झाला नाही. १४६८ मध्ये हलाखीच्या स्थितीत त्याला मरण आले.
छपाई तंत्राचा जनक : जोहान गुटेनबर्ग
आज आपण कॉम्प्युटरवर जे काही लिहितो ते एका बटणाने जसेच्या तसे छापून घेऊ शकतो. त्यात विशेष काही वाटत नाही. पण शोध लागल्यानंतर ती गोष्ट समजून घेणे वेगळे आणि ते शोधणे वेगळे
आणखी वाचा
First published on: 08-12-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: View on johan gunterberg