सुमारे सेहेचाळीस वर्षांपूर्वी कल्याणच्या दत्तआळीत माघी गणेशोत्सवात जादूच्या प्रयोगांचा एक फारच छान कार्यक्रम बघितला होता. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती, पण वेळेपूर्वी जाऊन पुढच्या सतरंजीवर जागा पकडल्याने अगदी जवळून प्रयोग बघता आले. त्यातील अनेक प्रयोग अजूनही स्पष्ट आठवतात. त्यामध्ये एक प्रयोग पुढीलप्रमाणे होता.
सर्वासमोर जादूगाराने मध्यम आकाराच्या एका पितळी कळशीतील पाणी एका भांडय़ात ओतले आणि ती रिकामी केली. ती पूर्ण उलटी करून दाखवली व परत सरळ करून टेबलावर ठेवली. नंतर पाच मिनिटांत त्या कळशीत पुन्हा थोडे पाणी आणून दाखविले. पाणी त्याच भांडय़ात ओतून कळशी रिकामी करून टेबलावर ठेवली. पुन्हा पाच मिनिटांत त्या कळशीत पाणी आणले. अशा प्रकारे दहा-बारा वेळा पूर्ण रिकाम्या केलेल्या कळशीत पाणी आणले.
आम्हा सर्व मुलांच्या मनात अनेक विचार येत होते-त्या कळशीत बर्फ असावा व तो वितळत असावा. पण कळशी उलटसुलट करीत असताना आवाज होत नव्हता. किंवा कळशीत स्पंज असावा आणि त्यात पाणी मुरले असावे. पण स्पंजमधून अनेक वेळा असे पाणी निघत नाही.
जादूगार प्रयोगामागचे विज्ञान कधीच सांगत नाहीत. त्यामुळे या जादूने अनेक वष्रे मनात घर केले होते. त्या काळी विज्ञान प्रयोगांची पुस्तके फारशी उपलब्ध नव्हती. पुढे अनेक वर्षांनंतर त्या प्रयोगाचे रहस्य कळले. ती कळशी म्हणजे दुहेरी भांडे होते!
तोच प्रयोग येथे देत आहे.
साहित्य- स्टेनलेस स्टीलची एक लोटी व त्यात व्यवस्थित बसणारा पण तळाला न टेकणारा स्टेनलेस स्टीलचा पेला. (आकृती १ पाहा), अ‍ॅरल्डाइट.
कृती – (१) पेल्याच्या तळाला मध्यभागी एक लहान भोक पाडा (व्यास सुमारे २ मि.मी.) तसेच एक भोक लोटीच्या तोंडाजवळ थोडे खाली पाडा (आकृती २ पाहा) अशी भोके पाडण्यासाठी तुम्हाला एखाद्या मेकॅनिकल वर्कशॉपमधे जाऊन चांगल्या ड्रील मशीनवर हे काम तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्यावे लागेल.
(२) पेला लोटीच्या आतमध्ये कायमचा घट्ट चिकटवून टाकायचा आहे. त्यासाठी अ‍ॅरल्डाइट वापरावे लागेल. अ‍ॅरल्डाइट लावण्यापूर्वी त्याच्या खोक्यावर छापलेल्या सर्व सूचना नीट वाचून घ्या.
पेल्याची वरची कडा बाहेरील व खालच्या बाजूने लोटीस जेथे स्पर्श करणार आहे तो भाग तसेच लोटीच्या तोंडाची आतली कडा कानशीने घासून थोडी खरखरीत करा. किंवा तेथे रफ पॉलिश पेपरने घासून पृष्ठभाग खरखरीत करा. कारण गुळगुळीत पृष्ठभागावर अ‍ॅरल्डाइट घट्ट पकड घेत नाही.
(३) आता अ‍ॅरल्डाइटच्या खोक्यातले थोडे रेझिन व अंदाजे तेवढेच हार्डनर पेस्टमधून एका बशीमध्ये काढून घ्या व तो नीट ढवळून चांगले एकजीव करा. (पुन्हा एकदा खोक्यावरील सर्व सूचना वाचून घ्या) नंतर पेला व लोटीला अ‍ॅरल्डाइट लावून घट्ट चिकटवून २४ तास न हलवता ठेवून द्या. पेल्यावर थोडा दाब येईल असे जड  वजन पेल्यात ठेवा.
(४) जोड पूर्ण सुकल्यानंतर पेल्यात पाणी ओता. तळाशी असलेल्या भोकातून पाणी लोटीत शिरेल. पेल्यात अजून पाणी ओतत राहा. संपूर्ण पेला व लोटी पाण्याने भरा.
(५) लोटीच्या तोंडाशी असलेल्या भोकावर अंगठा घट्ट दाबून लोटी पकडा आणि वर उचलून हळूहळू उलटी करून पेल्यातील सर्व पाणी एका भांडय़ात ओता. (लोटीच्या तोंडाजवळील भोकावर अंगठा घट्ट दाबून न धरल्यास हवा लोटीच्या आत जाईल व लोटीतील पाणी पेल्यामध्ये शिरून बाहेर पडत राहील.)आता लोटी सरळ करून टेबलावर ठेवा आणि निरीक्षण करा. लोटीच्या आतले पाणी पेल्याच्या तळाशी असलेल्या भोकातून हळू हळू वर चढते.
वैज्ञानिक तत्त्व – ज्यांचे तळ एकमेकांना जोडलेले आहेत अशा भांडय़ांमधील पाण्याची पातळी समान होते.
पुन्हा एकदा पेल्यातले पाणी काळजीपूर्वक भांडय़ात ओता व परत लोटी सरळ करून टेबलावर ठेवा. पुन्हा एकदा पेल्यात पाणी शिरेल.
अशा प्रकारे १०-१२ वेळा पाणी ओतून प्रयोगाचा आनंद घ्या व आपल्या मित्र-मत्रिणींना ही जादू करून दाखवा. तसेच त्या जादूमागील विज्ञान समजावून सांगा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा