आमादेर शांतिनिकेतन
मुलांनो, नुकताच शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षकांचे शिक्षक रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन हे तमाम भारतीयांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. शांतिनिकेतन नेमकं होत तरी कसं, हे शांतिनिकेतनमध्ये शिकलेल्या प्रसिद्ध िहदी साहित्यिका शिवानी यांच्या ‘आमादेर शांतिनिकेतन’ या अनुवादित पुस्तकातून दिसतं. या पुस्तकात त्यांनी शांतिनिकेतनचे अत्यंत रम्य चित्रण उभे केले आहे. हे पुस्तक वाचताना आपल्या आयुष्यात ते दिवस का आले नाहीत, याची हुरहूर वाटत राहते. अनेकदा आपण अश्रू रोखू शकत नाही.
पुस्तकात ठिकठिकाणी खूप सुंदर बंगाली गाणी आहेत. तिथलं शिकणं कसं दडपणरहित होतं हे सांगताना ती लिहिते की, वर्गात शिकताना कंटाळा आला तर पक्ष्यांकडे पाहायला बंदी नव्हती. लिहिता लिहिता हात थकले तर बासरीचे स्वर ऐकायला कुणाचीही ना नव्हती. पाठय़पुस्तकं खूपच चित्रमय होती. ती पुस्तकं न वाटता, आम्हाला मिठाईचा डबा वाटायचा. विद्यार्थ्यांवर हात उगारायचा नाही असा टागोरांचा आदेशच होता. साहित्य सभेत धोतर-कुर्ता व मुलींनी पारंपरिक पोशाख करून लेख, कविता सादर करायच्या. फाल्गुन पौर्णिमेला रात्री सर्व जण बाहेर येत. कधी मुले स्वयंपाकापासून सारी कामे करत. अधूनमधून जवळच्या खेडय़ात मुलांना कामे करायला पाठवून ग्रामीण जीवनाचा परिचय करून देत. व्यक्तिचित्रे लिहून तिने ते शिक्षक जसेच्या तसे आपल्याला भेटविले आहेत. रवींद्रनाथांचे तिने रेखाटलेले चित्र मनात रुतून राहते. केवळ पाच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सुरू केलेलं शांतिनिकेतन समजून घ्यायला हे पुस्तक वाचायलाच हवं
आमादेर शांतिनिकेतन,
मूळ लेखिका – शिवानी,
अनुवाद- आशा साठे,
पृष्ठे- ११७,  किंमत -६० रुपये.
कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे.

प्रयोगातून विज्ञान
शाळेत विज्ञान हा विषय मुलांना काहीसा कठीण वाटतो, कारण तो प्रयोगातून कमी वेळा शिकवला जातो आणि दैनंदिन जीवनाशी जोडला जात नाही. हा विषय अभ्यास न वाटता छंद कसा वाटेल, हे ‘प्रयोगातून विज्ञान’ हे पुस्तक वाचलं की कळतं. सुसान बोसॅक यांचे हे मूळ पुस्तक आहे. मराठी अनुवादामुळे हे जागतिक दर्जाचे पुस्तक मराठी मुलांना माहीत झाले आहे. ‘स्कोलॅस्टिक’ या मुलांसाठी काम करणाऱ्या जगप्रसिद्ध संस्थेचे हे पुस्तक आहे. दैनंदिन जीवनातील संबंधित अनेक प्रयोग यात आहेत. त्यात प्रामुख्याने विज्ञान, वस्तुमान व ऊर्जा, मानव, प्राणी, वनस्पती, खडक, हवामान, पर्यावरण, अवकाश अशा विषयांवर जवळपास ३०० प्रयोग दिले आहेत. या प्रत्येक विभागात सरासरी ३० ते ५० प्रयोग आहेत. अद्भुतरम्य वाटणारी वैज्ञानिक सत्ये छोटय़ा छोटय़ा प्रयोगांतून, कृतींतून वाचकांना समजाून देताना विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमधल्या मूलभूत संकल्पनाही सहजपणे हे पुस्तक उलगडत नेते. हे प्रयोग प्रत्यक्ष करून बघितल्याने ते अधिक नीट समजते.
प्रत्येक प्रयोग एक पानाचा आहे. त्यात साहित्य व कृती सविस्तर दिली आहेच, पण त्याचबरोबर चौकटीत ते तत्त्व व विशेष माहितीही दिली आहे. प्रत्येक प्रयोगात स्पष्टता येईल अशी रेखाचित्रे, आकृत्या व छायाचित्रेही दिली आहेत. यातले अनेक प्रयोग घेऊन जादूच्या प्रयोगासारखा रंजक कार्यक्रमही सादर करता येईल इतके रंजक प्रयोग आहेत. यात सहजपणे मुलांची प्रत्येक कार्यकारणभावाविषयी जिज्ञासा जागी होऊ शकते. हे प्रयोग पालकांनी मुलांसोबत करावेत असेही अपेक्षित आहे. पुस्तकाची भाषा अगदी मुलांशी गप्पा मारल्यासारखी व रंजक असल्याने जाडजूड पुस्तक असूनही दडपण येत नाही. शेवटच्या भागातले अवकाशासंदर्भातले प्रयोग व माहिती खूपच रंजक आहे.
प्रयोगातून विज्ञान-
सुसान बोसॅक,
अनुवाद- माधुरी शानबाग,
राजहंस प्रकाशन,
पृष्ठे- ३३०, किंमत – २५०.

Story img Loader