शुभांगी चेतन
shubhachetan@gmail.com
आम्ही जेव्हा लहान होतो- म्हणजे मी, तुमचे आई-बाबा तेव्हा सुटीत बाहेर जाणं म्हणजे आजी-आजोबांच्या, मामाच्या गावी. बहुतेक वेळा तिथेच सुटी पूर्ण संपायची. आत्तासारखं सुटय़ांमध्ये विविध ठिकाणी जाणं हे तेव्हा फार नव्हतं. लाल डबा म्हणजे एस.टी. आणि रेल्वेगाडीत बसून मामाच्या गावी जाणं ही मौज असे. कितीही नाकारलं तरी तिथे काकणभर जास्तच लाड होतात. खाण्या-पिण्याचे, हिंडण्याचे, गप्पागोष्टींचे ते दिवस. तेव्हा फक्त मामाचा तो गावच प्रिय होता असं नाही, तर त्या गावाकडे जातानाचा प्रवासही हवाहवासा असायचा आणि रेल्वे किंवा बसमधली ती ‘खिडकीची जागा.’
त्या खिडकीत बसण्याची ओढ प्रत्येक बालमनात कायम असते- माझ्याही आणि तुमच्याही. आजही ‘खिडकीची जागा बसायला हवी’ असं म्हणताना नजरेसमोरून अनेक डोंगर प्रवास करताना दिसतात. तर ही अशी खिडकी, जी प्रत्येकाला हवी असते बाहेरचं पाहण्यासाठी. स्वत:ला त्यासोबत जोडून घेण्यासाठी. प्रत्येक प्रवास हा आनंद, उत्साहासोबत बरंच काही देत असतो. हे ‘बरंच काही’ म्हणजे नेमकं काय? हे आत्ता जरी तुम्हाला कळलं नाही ना, तरी जे पाहताय ते साठवून ठेवा. मोठं होताना या साठवणी आठवणी म्हणून खूप खूप आनंद देतात. आपल्याला पुन्हा पुन्हा लहान करतात.
तर आजची ही जी खिडकी आहे ती तुमच्यासोबत तुमच्या आई-बाबांची, ममा-डॅडीचीसुद्धा आहे. तर आज मुद्दामच त्यांना घेऊनच हे करायचं. पण तुमचं तुम्ही आणि त्यांचं त्यांनी. कारण आपण जेव्हा सगळ्यांसोबत प्रवास करतो ना, तेव्हा आपल्यासारख्याच अनेक खिडक्या असतात. जसं तिच्याजवळ बसणारी व्यक्ती वेगळी, तसंच त्यातून त्या व्यक्तीला दिसणारं जग वेगळं. म्हणून काही गोष्टी मिळून करायच्या म्हणजे मिळणारा अनुभव, आनंदही मोठा असतो.
मोठय़ा कागदावर खिडकीचा आकार काढून घ्यायचा. पालक सोबत असतील तर दोन किंवा तीन मोठे कागद एकमेकांना जोडायचे. म्हणजे कागदाचीच रेल्वे तयार होईल. रंगवताना उरलेल्या कागदांपासून खिडकी कशी वेगळी करायची ते तुम्ही तुमच्याकडे असलेल्या रंगातून ठरवा. यासाठी पोस्टर्स कलर्स वापरलेत तर हाताने रंगवताना छान मजा येते. त्या प्रत्येक रंगाचा पोत (texture) जाणवतो. पुन्हा हात प्रत्येक वेळी वेगळ्या रंगाचा. रंगवून झालं की खिडकीच्या तीन बाजू कापायच्या. एक बाजू तशीच ठेवायची, म्हणजे
तुम्हाला ती उघडता येईल. खिडकीसोबतच गाडीचं इंजिन, चाकं तुम्हाला जे सुचेल तसं करा.
तुमचे आई-बाबाही सोबत असतील तर यात आणखी खिडक्या होतील आणि तुमची गाडी मोठी दिसेल.
तोत्तोचान नावाची एक मुलगी होती. जपानमध्ये तिच्या शाळेचं नाव ‘तोमोई’. ही शाळा रेल्वेच्या डब्यांमध्ये भरायची. ऐकून विश्वास बसणार नाही, पण होतं खरं असं. तिच्याबद्दल, तोमोईबद्दल ‘तोत्तोचान’ या पुस्तकातही तुम्हाला वाचता येईल. तिचीपण एक खिडकी होती आणि एक गोष्टही!