फारूक एस. काझी
हिवाळा आला आणि हवेत गारवा दाटू लागला. झाडाची पानं अंग चोरून घेऊ लागली. खोडावर सरसरून काटा येऊ लागला. झाड पार गारठून गेलं. इतक्यात कसलासा आवाज झाला आणि झाडाचं लक्ष तिकडं गेलं. पक्ष्यांची एक जोडी पंख फडफडवीत मधल्या फांदीवर येऊन बसली. झाडाला आनंद झाला. कुणीतरी पाहुणा आलाय. त्याने आपल्या फांद्यांचा पाखरांभोवती घेराव घातला.
‘‘कुठून आलात तुम्ही?’’ झाडानं प्रेमळपणे विचारलं.
पक्ष्यांना आधी कोण बोलतंय, हेच कळेना. थोडा वेळ गेला आणि पक्षी भानावर आले.
‘‘खूप दूरवरनं आलोय. परदेशातून.’’
‘‘अरे बापरे! परदेश म्हणजे काय असतं?’’ झाडानं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘खूप खूप दूर आहे ते. आम्ही खूप दमलोय. आम्ही झोपतो आता. उद्या बोलू या आपण.’’
झाड थोडं हिरमुसलं. पण त्याने शांत बसायचं ठरवलं. सकाळ झाली. सूर्य वर आला. उबदार उन्हात झाड ताजं झालं. पाखरं उठली का, ते पाहण्यासाठी त्यानं फांदीवर नजर टाकली.
‘‘अरे! एवढय़ा सकाळी हे गेले कुठं?’’ झाड नवलानं म्हणालं. पाखरं थोडय़ा वेळात तिथं आली.. चोचीत काटक्या, काडय़ा घेऊन.
‘‘आम्ही घरटं बांधतोय. तू थोडं लक्ष ठेव..’’ असं म्हणून दोन्ही पक्षी उडून गेले. सांज होईस्तो घरटं बांधून झालं. काटक्याकुटक्या, गवताच्या काडय़ा असं बरंच काही वापरून घरटं तयार झालं होतं. झाडालाही खूप आनंद झाला. आता घरटं झालं.. मग अंडी, मग पिल्लं.. त्यांचा गोंधळ ऐकू येईल. दिवस कसा छान जाईल.
झाड पक्ष्यांची वाट पाहू लागलं. पण पक्षी काही परत आले नाहीत. एक दिवस झाला. दुसरा दिवस गेला. तिसरा दिवसही गेला.. पण पक्षी परत आले नाहीत.
झाड दु:खी झालं. ‘‘आपण जाऊ या का त्यांना शोधायला?’’ असा विचार करून त्याने आपली एक मुळी उचलली, मग दुसरी.. आणि असं करत करत झाड निघालं मोठमोठय़ा ढांगा टाकत.
‘झाड चालतंय’ हे बघून सगळेच आ वासून पाहू लागले. पण झाडाला जगाची चिंता वाटत नव्हती. ते आपल्याच तालात निघालं होतं. चालत चालत ते बरंच दूर आलं. रस्त्याने एक मोठा हत्ती आपल्या पिल्लाला घेऊन निघाला होता. पिल्लू खूप मस्ती करत होतं. लोळत होतं. मध्येच मागे राहत होतं. मागच्या दोन पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करत होतं.
‘‘हत्तीदादा, तुम्ही त्या पक्ष्यांची जोडी पाहिली का? खूप सुंदर होती दोघं.’’
‘‘अरे, नाही.. या पोरानं गोंधळ मांडलाय नुसता. माझं लक्षच नव्हतं.’’ हत्तीचं लक्ष पिल्लाकडेच होतं. आपण चालणाऱ्या झाडाशी बोललो हे त्याच्या लक्षातही आलं नाही. झाड पुढं निघालं. वाटेत त्याला जिराफ भेटला.
‘‘जिराफदादा, तुला एक पक्ष्यांची जोडी दिसली का? खूप सुंदर होती दोघं.’’ जिराफाने मान हलकेच खाली केली आणि तो चमकला. झाड चालतंय? हे काय नवीनच!
‘‘नाही. मी नाही पाहिलं. आज मला खूप भूक लागलेली. मी तळ्याकडे नव्हतो गेलो. आत जंगलात होतो. त्या तळ्यात आलेत नवीन पक्षी. तू जाऊन बघ.’’ जिराफ निघून गेला.
झाडाला आनंद झाला. आता ते पक्षी सापडतील असं त्याला वाटू लागलं. ऊन वाढू लागलं. झाड चालत होतं.. चालत होतं.. चालतच होतं. ते घाईत पुढं निघालं. त्याला आता थकवा जाणवू लागला होता. मुळं कुरकुरायला लागली होती.
‘‘बाबा रे, आता लवकर कुठंतरी पाणी बघून थांब, नाहीतर आम्ही मरून जाऊ. आम्ही मेलो तर तूही जगणार नाहीस.’’
झाडाला मुळांचं बोलणं पटलं.
रस्त्यात त्याला एक शहामृग भेटलं. झाडाला आनंद झाला. एक पक्षी भेटला.
‘‘अरे मित्रा, तू पक्ष्यांची जोडी पाहिलीस का? खूप सुंदर होती दोघं.’’ शहामृगाने मान थोडी खाली केली.
‘‘हे बघ, मला वेळ नाही. कालपासून पायाला आराम नाही. मी जाऊन झोपणार आहे. आणि तुझे ते दोन पक्षी का काय ते असतील तळ्यात. काल शिकाऱ्यांनी बरीच पाखरं मारली. वाचली असतील तर भेटतील तुला.’’
झाडाला हे सर्व ऐकून धक्काच बसला. त्याने हताश मनाने एकेक मूळ उचलायला सुरुवात केली. झाड तळ्याकाठी आलं. तिथं खूप सारे पक्षी होते. कुणी पोहत होते, कुणी पाण्यात बुडी मारत होते. कुणी काठावर चिखलात लोळत होते. कुणी पाण्यात काही खायला मिळतंय का ते पाहत होते. झाडाने एका सारस पक्ष्याला विचारलं, ‘‘तू त्या दोन पक्ष्यांची जोडी पाहिलीस का? खूप सुंदर होती. हे बघ, त्यांनी घरटंपण बांधलंय. पण कुठं गेले, कुणास ठाऊक. परत आलेच नाहीत.’’
सारस पक्ष्याने घरटं नीट पाहिलं. ‘‘अरेरे! त्यांनी घरटंपण बांधलं होतं का? बिच्चारे!’’
‘‘काय झालं त्यांना? कुठं आहेत ती दोघं?’’ झाडाने कातर आवाजात विचारलं.
‘‘काल ते इथं आले होते. आमच्याशी गप्पाही मारल्या. पण काल काही माणसं इथं आलेली शिकार करायला. त्यांनी त्या दोघांची शिकार केली. आमच्यातले बरेच पक्षी मारून नेले त्यांनी.’’ सारस पक्ष्याचा गळा दाटून आला.
झाडाला फार वाईट वाटलं. त्याने कितीतरी स्वप्नं रंगवली होती. पण आता ते पक्षी कधीच परत येणार नव्हते.
‘‘आम्हा पक्ष्यांना झाडाला शोधत फिरावं लागतं. तू झाड असून पक्ष्यांसाठी इथवर आलास. मानलं तुला! आता एक काम करशील का?’’
‘‘काय?’’ झाडाचा आवाज गहिवरला होता.
‘‘तू आता इथंच राहा. आमच्या जवळ. इथं बरेच पक्षी वर्षभर येतात. तुझंही मन रमेल आणि पक्ष्यांनाही लाडका निवारा मिळेल.’’
झाडाला सारस पक्ष्याचा सल्ला आवडला. त्याने तिथंच राहायचा निर्णय घेतला. आजही त्याला त्या दोन पक्ष्यांची आठवण येते. डोळे भरून येतात. मग ते त्याच्या अंगाखांद्यावरची घरटी फांद्यांनी झाकून घेतं.. कुणा शिकाऱ्याची नजर लागू नये म्हणून!
farukskazi82@gmail.com