एल्मर.. हा आहे एक हत्ती.. तोही आपल्या नेहमीच्या हत्तीसारखा नाही, तर मुलांना आवडेल असा रंगीबेरंगी.. त्याचं संपूर्ण शरीर हे पिवळा, नारंगी, लाल, जांभळा, निळा, काळा, हिरवा आणि सफेद अशा रंगांच्या पॅचवर्कनं सजलं आहे. अशा या रंगीबेरंगी एल्मरच्या गोष्टीही विविधरंगी आणि मजेशीर. ‘एल्मर’, ‘एल्मर आणि हरवलेला टेडी’, ‘एल्मर आणि वारा’, ‘एल्मर आणि विल्बर’, ‘एल्मर आणि अनोळखी पाहुणा मित्र’ हा पाच पुस्तकांचा छोटेखानी संच म्हणजे एल्मरच्या खटय़ाळ विश्वाची अनोखी सैर आहे.
पॅचवर्कसारखं अंग असणारा एल्मर नेहमीच्या काळ्या-भुऱ्या हत्तींच्या कळपात वेगळा उठून दिसायचा. त्याच्या अंगाप्रमाणेच स्वभावानेही तो इतर हत्तींपेक्षा वेगळा होता. स्वत: आनंदी राहणारा आणि इतरांनाही आनंद देणारा.. तो सदैव आपले आई-बाबा, आजी-आजोबा, मित्रांना आपल्या वागण्यातून आनंदी ठेवायचा. त्यांच्याशी हसत-खेळत राहायचा. कोणी रुसलं असेल तर ना-ना युक्त्या करून तो त्याला हसवायचा. असा हा एल्मर, सगळ्यांना हवाहवासा वाटणारा.. पण आपल्या शरीराचं वेगळंपण त्याला अनेकदा खटकायचं. त्याबाबत देवाकडे तो तक्रारही करायचा. आपलं शरीरही काळ्या-भुऱ्या रंगाचं हवं म्हणून त्याने लढवलेली नामी शक्कल, त्यातून त्याची झालेली फजिती अािण ‘एल्मर डे’चा उगम.. या गमती-जमतींचा सुखद नजराणा या गोष्टींमध्ये आहे.
एल्मरच्या या गोष्टींमधून नानाविध अनुभवांचा खजिना आपल्याला सापडतो. अनेक अविश्वसनीय गोष्टींची गंमत आपण या गोष्टीत अनुभवतो. सोसाटय़ाच्या वाऱ्याने हत्ती उडेल? ही कल्पनाच हास्यास्पद आहे, पण एल्मरच्या बाबतीत मात्र हे घडतं. तो चक्क सोसाटय़ाच्या वाऱ्याने उडून जातो आणि तोही घाबरून न जाता चक्क उडण्यातली गंमत अनुभवतो. लहानग्यांसारखंच प्राण्यांच्या मुलांनाही टेडीचं वेड असतं, हत्ती झाडाला चिकटून राहतो, अशा कल्पनाही अफलातून.. या एल्मरच्या गोष्टींमध्ये वाचायला मिळतात.
एल्मरच्या गोष्टी वाचताना आपल्याला भन्नाट कल्पनांच्या विश्वाची सफर घडतेच, पण त्याचबरोबरच एल्मरच्या स्वभाववैशिष्टय़ातून, वर्तणुकीतून त्याचं वेगळंपण जाणवतं. त्याचं सतत आनंदी राहणं, अनोळखी, वेगळ्या प्राण्यांना त्यांच्या वेगळेपणाची चेष्टा-मस्करी न करता आपल्यात सामावून घेणं, मज्जा-मस्तीबरोबरच इतरांना मदत करणं, इतरांशी हसून-खेळून वागणं आणि आपल्या जगण्यातून इतरांनाही आनंद देणं या एल्मरच्या गुणवैशिष्टय़ांची प्रामुख्याने जाणीव होते. आणि असं वागणं किती आनंददायी असतं, हेच त्याच्या गोष्टींमधून अधोरेखित होतं. कारण त्याचं असं वागणं आपल्याही चेहऱ्यावर हास्याची, प्रसन्नतेची लकेर उमटवून जातं. त्यामुळे एल्मर नक्की वाचायलाच हवा आणि अनुभवायलाही..
डेव्हिड मॅकी यांच्या अफलातून कल्पनांप्रमाणेच त्यांच्या चित्रांनीही या गोष्टी अधिक वाचनीय आणि वेधक झाल्या आहेत. एल्मरच्या गमती-जमती या चित्रांमधून ठळकपणे आपल्या भावविश्वाचा ठाव घेतात. मूळ डेव्हिड मॅकी यांच्या या गोष्टींचा मराठी अनुवाद केला आहे डॉ. वृषाली पटवर्धन यांनी. अनुवादात कुठेही भाषेतील ठोकळेबाजपणा न आणता लहानग्यांना खिळवून ठेवेल अशीच वाक्यरचना करताना त्याला लालित्याचीही जोड दिली आहे.
एल्मरच्या या आनंददायी जगाची सफर आवर्जून करायलाच हवी.
‘एल्मर’, ‘एल्मर आणि हरवलेला टेडी’, ‘एल्मर आणि वारा’, ‘एल्मर आणि विल्बर’, ‘एल्मर आणि अनोळखी पाहुणा मित्र’
मूळ लेखक – डेव्हिड मॅकी
अनुवाद – वृषाली पटवर्धन
मूल्य- ६० रुपये ( प्रत्येकी )
एल्मरसोबतची आनंददायी सफर
एल्मर.. हा आहे एक हत्ती.. तोही आपल्या नेहमीच्या हत्तीसारखा नाही, तर मुलांना आवडेल असा रंगीबेरंगी..
First published on: 22-06-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wonderful journey with elmer the elephant