‘‘हे Do’ s आणि Don’ts आणखी बऱ्याच गोष्टींसाठी तयार करता येतील. आपण प्लॅस्टिकचा डबा न वापरता स्टीलचा डबा वापरतो. शाळेने हा नियम करावा म्हणून आपण प्रयत्न केले. आपल्या काहींच्या शाळेत नियम करण्यात यशस्वीही झालो. ‘वाळलेली पानं जाळू नका’ असं संपदा सगळ्यांना सांगते, तेही आपल्या यादीत आलं पाहिजे.’’ गणेश म्हणाला.
‘‘तुम्हाला 7 R माहिती आहे का?’’ यतीननं विचारलं. सगळ्यांची प्रश्नार्थक नजर पाहून त्यानं सांगायला सुरुवात केली- ‘‘REFUSE, REDUCE, REUSE, REPAIR, REDISTRIBUTE, RECYCLE आणि RESTORE.’’
‘‘Recycle मला माहीत आहे. रद्दी नाही का देत आपण त्या कोपऱ्यावरच्या दुकानात.’’ संपदा पटकन म्हणाली.
‘‘ज्या क्रमाने हे ७ शब्द आहेत त्याच क्रमाने ते अमलात आणले पाहिजेत. आधी refuse चा विचार झाला पाहिजे.’’ या सर्वाची चर्चा ऐकणारा संपदाचा दादा म्हणाला.
‘‘आपण मागे सारंग दादाबरोबर चर्चा केली होती ना. ‘एखाद्या गोष्टीची आपल्या खरंच गरज आहे का?’ हा प्रश्न आपण आधी स्वत:ला विचारला पाहिजे, असं तो म्हणाला होता.’’ गणेशने आठवण करून दिली.
‘‘बरोब्बर!! हा प्रश्न म्हणजे refuse चं उदाहरण आहे. ज्याची गरज नाही ते refuse केलं पाहिजे आणि पर्यावरणपूरक पर्याय वापरले पाहिजेत. प्लास्टिक आपल्या आरोग्याला आणि निसर्गासाठी हानिकारक आहे. म्हणून मग प्लॅस्टिकचा डबा refuse करून आपण स्टीलचा डबा वापरतो. एका ठिकाणहून दुसरीकडे जाण्यासाठी वाहन गरजेचं आहे. अगदीच न वापरणं म्हणजे refuse शक्य नाही. तेथे reduce वर भर दिला पाहिजे. जेथे सायकलनं किंवा चालत जाण्यासारखं अंतर आहे तेथे गाडी वापरायची नाही. पुढचा पर्याय आहे reuse म्हणजे एकदा वापरून टाकून न देता ते परत परत वापरणं, त्यानंतर आहे repair.’’ दादानं एका दमात सगळं सांगून टाकलं.
‘‘आमचा मिक्सर बिघडला. सगळे म्हणाले दुरुस्त करण्यात कशाला वेळ घालवता, नवीन घेऊन टाका. बाबाने तो दुरुस्त करण्यासाठी नेला. एक छोटा भाग खराब झाला होता. दहा मिनिटांत दुरुस्त झाला.’’ यशनं माहिती पुरवली.
‘‘बिघडलं म्हणून टाकून देऊन नवीन आणण्यापेक्षा दुरुस्त करता येईल का हे बघायचं. दुरुस्त होणं शक्य नसेल तर दुसऱ्या गोष्टींसाठी त्यातले भाग वापरता येतील का असाही विचार करता येईल- त्याला म्हणायचे redistribute.’’ दादा म्हणाला.
‘‘शेवटी त्यावर प्रक्रिया करून नवीन काही तयार करता येईल का म्हणजे recycle ना?’’ यतीन म्हणाला.
‘‘हो. आणि Restore म्हणजे?’’ दादानं मुलांना विचारलं.
‘‘बरोबर. बिघाड व्हायच्या आधी जसं होतं तसं परत करणं म्हणजे Restore. कॉम्प्युटरवर आपण केलेला बदल आवडला नाही तर आपण Ctr+z दाबतो ना तसं.’’ संगीता म्हणाली.
‘‘फुलपाखरांसाठी आपण लोकांना होस्ट प्लांट्स बागेत लावायला सांगत आहोत ते restore मध्ये येईल. आपले सगळे Do’s आणि Don’ts या सात फ मध्ये आपल्याला बसवता येतील असं मला वाटतं.’’ यतीन विचार करत म्हणाला.