झेरॉक्स म्हणजे एखाद्या कागदपत्राची सत्यप्रत. ही सत्यप्रत काढण्याच्या तंत्राचे नाव झेरोग्राफी आहे. (Xerography) हा शब्द मूळ ग्रीक भाषेतून आला आहे. झेरॉस (Xeros) म्हणजे कोरडे (Dry) आणि ग्राफोस (Graphos) म्हणजे लिहिणे. झेरॉग्राफीचा शब्दश: अर्थ काढायचा झाल्यास कोरडे लिहिणे असा होईल. एका कागदावरची प्रतिमा दुसऱ्यावर उमटविण्याच्या प्रक्रियेला झेरोग्राफी म्हणता येईल. ही एक प्रकाशविद्युत (Photo electric) प्रक्रिया आहे. त्यात प्रकाशवाहकता (Photo Conductivity) या तंत्राचा उपयोग केला जातो. झेरॉक्स प्रतीवर आपल्याला जी अक्षरे उमटलेली दिसतात, ती म्हणजे मूळ प्रतीतल्या अक्षरांच्या जागेवरच, पण दुसऱ्या कागदावर चिकटलेले कार्बनचे किंवा तत्सम काळ्या पदार्थाचे कण किंवा भुकटी असते. प्लास्टिकचा कंगवा डोक्यात बऱ्याचदा फिरवल्यानंतर कागदाच्या कपटय़ांवर धरला, तर ते कंगव्याला चिकटतात. या वेळी कंगव्यात ते चुंबकत्व (बल) निर्माण होते, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स (Electrostatic Force) म्हणतात. याच तत्त्वाचा वापर झेरोग्राफीमध्ये केला आहे.
झेरोग्राफीच्या मशीनमध्ये वर एक काचेचा (किंवा कोणताही पारदर्शक) पृष्ठभाग असतो. झेरॉक्स काढायची, तो कागद त्यावर ठेवला जातो. खालच्या बाजूने त्यावर प्रखर प्रकाशझोत टाकला जातो. या पृष्ठभागावरून प्रकाश परावíतत होतो. पृष्ठभागावर ठेवलेल्या कागदावरील अक्षरे पूर्ण काळी असतील, तर त्यावरून प्रकाश परावíतत होत नाही. म्हणजे कागदाच्या लिहिलेल्या भागाव्यतिरिक्त भागावरूनच प्रकाश परावíतत होतो. हा प्रकाश पृष्ठभागाच्या खाली असलेल्या अर्धवाहक (Semiconductor) ड्रमवर (अर्धवाहक रुळ) पडतो. हा ड्रम गोलाकार, फिरता असून, सेलेनियमचा बनवलेला असतो. प्रकाश पडल्यानंतर तो विद्युतवाहक बनतो. ज्या भागावर प्रकाश पडतो, त्यावरील चुंबकत्व (Electrostatic Force) नष्ट होते. परंतु पृष्ठभागावरील कागदावरच्या अक्षरांवरून परावíतत न झालेल्या प्रकाशकिरणांमुळे त्या अक्षरांच्या जागेवर (ड्रमवर) विद्युतभार म्हणजे चुंबकत्व टिकून राहते. या ड्रमवर एक टोनर बसवलेला असतो. त्यात कार्बनची भुकटी (कण) असते. हा टोनर त्याच वेळी ड्रमवरून फिरतो आणि त्यातील भुकटी चुंबकत्व शिल्लक असलेल्या भागावर चिकटते. परिणामी ड्रमवर मूळ कागदावरील अक्षरे जशीच्या तशी उमटतात. परंतु ती आरशात दिसणाऱ्या प्रतिमेसारखी उलटी असतात. झेरॉक्स यंत्राच्या एका बाजूने कोरा कागद आत जाताना गरम केला जातो आणि तो कार्बनची भुकटी चिकटलेल्या ड्रमवरून फिरून दुसऱ्या बाजूने बाहेर येतो. परिणामी ड्रमवर चिकटलेली सर्व भुकटी या कागदावर चिकटते. कागद गरम झाल्यामुळे ती पक्की होते. हल्ली कार्बनसारखे कार्य करणाऱ्या विविध रासायनिक पदार्थाचा वापर या भुकटीच्या जागी केला जातो.
आपल्याजवळच्या मूळ कागदावरील अक्षरे कोरडय़ा भुकटीच्या साहाय्याने दुसऱ्या कागदावर उमटवली जातात. म्हणूनच या प्रक्रियेला झेरोग्राफी म्हणजेच कोरडे लिहिणे असे म्हणतात. झेरोग्राफी तंत्राचा शोध चेस्टर एफ. कार्लसन या अमेरिकन शास्त्रज्ञाने १९३७ मध्ये लावला. त्यानंतर पाच-सहा वर्षांनी अमेरिकेतील २० विविध कंपन्यांनी कार्लसन यांच्याबरोबर झेरोग्राफीचे तंत्र विकसित करण्याबाबत करार केले. १९४४  मध्ये बॅटेली मेमोरियल इन्स्टिटय़ूट संशोधन संस्था कार्लसनला मदत करू लागली. पुढे १९४७मध्ये बॅटेली संस्थेनेच हेलॉईड कंपनीच्या साहाय्याने हे तंत्र अधिक विकसित केले. त्यातूनच पुढे हेलॉईड ही कंपनी झेरॉक्स कॉर्पोरेशन म्हणून प्रसिद्धीला आली.
पहिले झेरोग्राफी यंत्र १९४९मध्ये बाजारात आले, परंतु त्यातील प्रक्रिया खूपच संथ आणि वापरण्यास किचकट होती. पुढे १९५९मध्ये झेरॉक्स कॉर्पोरेशनने दी ९१४ (The 914) हे ऑफिस कॉपिअर निर्माण केले. या झेरॉक्स यंत्रामध्ये ९ बाय १४ इंच आकारापर्यंतच्या कागदाची झेरॉक्स प्रत तयार करता येई. म्हणूनच त्याचे नाव दी ९१४ असे वैशिष्टय़पूर्ण ठेवण्यात आले.
आज या तंत्रात अनेक बदल झाले असले, तरी त्यातील तत्त्व आणि प्रकिया तीच आहे. विज्ञानाने आपल्याला अनेक देणग्या दिल्यात, त्यातीलच एक झेरोग्राफी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.